26 September 2020

News Flash

सेलेब्रिटी लेखक : आणि कायो भेटला..!

‘थ्री इडियट्स’साठी मी असिस्टंट डायरेक्टर म्हणूनही मी काम केले.

राजेशदादाने मला त्याच्या सिनेमासाठी विचारले. तो सिनेमा होता ‘फेरारी की सवारी’.

05-lp-rohitकास्टिंगच्या कामाचा श्रीगणेशा तर झालाच, पण ‘थ्री इडियट्स’साठी मी असिस्टंट डायरेक्टर म्हणूनही मी काम केले. फारच विलक्षण अनुभव होता तो. इतक्या मोठमोठय़ा कलाकारांसोबत इतक्या जवळून काम करण्याची संधी मिळाली होती. खूप वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. ‘थ्री इडियट्स’च्या कास्टिंगचे खूप कौतुक झाले आणि त्याचबरोबर मी दिग्दर्शकीय विभागात जे काही काम करत होतो त्याचेही खूप कौतुक झाले. माझे तिकडचे काम बघून राजेशदादाने मला त्याच्या सिनेमासाठी विचारले. तो सिनेमा होता ‘फेरारी की सवारी’. राजेशदादा म्हणजेच राजेश मापुस्करचा स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा होता. या सिनेमाचे कास्टिंगसुद्धा मोठे होते आणि तितकेच आव्हानात्मक होते. आव्हानात्मक अशासाठी होते की, मला शर्मन जोशीचा मुलगा शोधायचा होता आणि हा मुलगा काही केल्या मिळतच नव्हता. कायोच्या भूमिकेसाठी मुले शोधण्याची मोहीम सुरू झाली. या भूमिकेसाठी साधारण दीड लाख मुले बघितली गेली; पण काही केल्या आम्हाला आमचा कायो मिळत नव्हता. हजारोंनी ऑडिशन्स झाले. कलाकार चांगले होते, पण लुक मॅच होत नव्हता. लुक मॅच होत होता, पण कलाकार ठिकठाक होते. अक्षरश: तारेवरची कसरत सुरू झाली होती. कायो मनासारखा मिळत नव्हता, त्यामुळे मी खूप अस्वस्थ झालो होतो. मला तर रात्री झोपसुद्धा लागायची नाही. सतत डोक्यात कायोचा विचार सुरू असायचा. एक दिवस मी माझे ऑडिशन्स संपवून एक फूड मॉलमध्ये गेलो.

रात्रीची वेळ होती. एकटाच बसलो होतो. माझ्या शेजारच्या टेबलावर एक कुटुंब बसले होते. त्या कुटुंबात एक छोटा मुलगा होता म्हणजे साधारण कायो ज्या वयाचा हवा होता त्याच वयाचा. मी तात्काळ माझ्या एका मित्राला फोन केला आणि त्याला सांगितले, ‘‘आपल्याला आपला कायो मिळाला.’’ तो म्हणाला, ‘‘तुला वेड लागलेय. तू घरी जा आणि शांत झोप.’’ मी त्याला म्हटले, ‘‘अरे नाही. खरेच माझ्या शेजारच्या टेबलावर आहे तो मुलगा.’’ माझ्या मित्राने फोन ठेवून दिला. त्याला वाटले मी खरेच काही तरी बरळतोय; पण मी जसे त्या मुलाला बघितले; त्याचे वागणे, त्याचे बोलणे, आपल्यापेक्षा वयाने मोठय़ा असलेल्या माणसांना आदर देणे. सगळे इतके चमत्कार वाटावा असे होते. चमत्कार एवढय़ाकरिताच, कारण ज्याप्रमाणे कायोची व्यक्तिरेखा होती अगदी तंतोतत तो मुलगा तसाच होता. मी ठरवले, आपण त्याला जाऊन भेटायचे; पण तेवढय़ात ते कुटुंब निघाले. मी त्यांच्या मागेमागे गेलो. पावसाळ्याचे दिवस होते. त्या मुलाचे बाबा पाìकगमधून गाडी काढत होते. तेवढय़ात मी त्या मुलाच्या आईला जाऊन भेटलो आणि स्वतबद्दलची माहिती दिली. तुमचा मुलगा आमच्या सिनेमासाठी कसा योग्य आहे ते समजावून देण्याचा प्रयत्न केला. त्या मुलाचे नाव होते. रित्विक साहोर; पण त्यांचा असा समज झाला की, असाच कुणी तरी माणूस आहे जो फ्रॉड आहे आणि आपल्याला फसवू पाहातोय. तेवढय़ात रित्विकचे बाबा गाडी घेऊन आले. त्यांनाही हा सगळा प्रकार कळला. ते तर मला अजिबातच इंटरटेन करत नव्हते. त्यांनासुद्धा मी कुणी तरी भुरटा वाटलो. मी त्यांनासुद्धा सगळे नीट समजावून सांगितले. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये वर्कशॉप असल्याचे सांगितले. रित्विकला तिकडे घेऊन येण्याची विनंती केली. माझा नंबर दिला. ते मला थँक्यू म्हणाले आणि निघून गेले. पुन्हा मला झोप नाही.

कळेच ना की आता हा उद्या येणार की नाही. मी दुसऱ्या दिवशी आतुरतेने वाट बघत होतो. माझे डोळे लागले होते ते रित्विकसाठी आणि दुसऱ्या दिवशी रित्विकचे बाबा रित्विकला घेऊन ऑफिसला आले आणि माझा जीव भांडय़ात पडला. रित्विकची ऑडिशन झाली. अप्रतिम झाली आणि आता पुढचा टप्पा समोर आला. रित्विक कधीच क्रिकेट खेळला नव्हता, त्याला क्रिकेट खेळता येत नव्हते. मग पुढचे तीन महिने त्याचे क्रिकेटचे प्रशिक्षण सुरू झाले. अशा प्रकारे अखेर आम्हाला आमचा कायो मिळाला. कास्टिंग करता करता मला रस्त्यावर येता-जाता माणसांचे निरीक्षण करण्याची सवय लागली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील गंमत, वेगवेगळेपण मी टिपू लागलो होतो आणि त्याच सवयीमुळे मी एकदा लोकांचा मार खाताखाता वाचलोही होतो. हा किस्सा फार गमतीशीर आहे. मी जेव्हा ‘थ्री इडियट्स’साठी शर्मनची बहीण कम्मो शोधत होतो. रेल्वे स्टेशनवर एका मुलीला थांबवून मी तिला सिनेमात काम करशील का, असे विचारले होते. त्या मुलीला असे वाटले की, कुणी तरी टपोरी मुलगा आहे आणि तिची छेड काढतोय. मला काही कळायच्या आत माझ्या आजूबाजूला बरीच माणसे गोळा झाली. कसेबसे मी सगळ्यांना समजावले आणि तिकडून स्वत:चा बचाव करून निघालो. असो.. ‘फेरारी की सवारी’चे कास्टिंग तर झाले होते. कोळी समाजातील लोक शोधले होते. अगदी वरळी कोळीवाडय़ातील लोक शोधले होते. कास्टिंग अगदी ओरिजनल झाले होते. आता अभिनयाचा भाग होता, कारण या लोकांनी कधी तरी शूटिंग फक्त बघितलेले होते; पण कधी शूटिंगच्या कॅमेऱ्यासमोर आले नव्हते. त्यामुळे त्यांचे दडपण दूर करणे, त्यांच्यात सहजता येणे, त्या सहजतेनेच त्यांनी कॅमेऱ्यासमोर येणे हे माझ्यासाठी एक मोठे आव्हान होते. आम्ही त्याचेही वर्कशॉप घ्यायचे ठरवले. रोज रात्री प्रत्येक जण आपापले काम संपवून बोटीवरून परत येऊन आवर्जून वर्कशॉपला हजर राहायचा आणि त्यांच्या सहकार्यामुळे आम्ही आम्हाला हवे ते आणि हवे तसे साध्य करू शकलो.

रोहन मापुस्कर – response.lokprabha@expressindia.com
@rrmapuskar
सौजन्य – लोकप्रभा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 1:05 am

Web Title: lokprabha celebrity writer rohan mapuskar ferrari ki sawaari casting experiece
Next Stories
1 संजूबाबाच्या डोक्यात हा विचारही घोळायचा
2 सुशांतसिंगचे अमेरिकन सुपर मॉडेलसोबत ‘रॉयल फोटोशूट’
3 VIDEO: Jolly LLB2.. म्हणून सुलतानच्या लग्नाचा मुहूर्त अक्कीला विचारला जातोय
Just Now!
X