27 November 2020

News Flash

नाट्यरंग : सवाई नाटकं, सवाई प्रेक्षक

चतुरंग प्रतिष्ठान ‘सवाई एकांकिका स्पर्धा २०१७’

महाराष्ट्रातल्या तमाम तरुण रंगकर्मीचं ज्याकडे लक्ष लागून राहिलेलं असतं अशा ‘सवाई एकांकिका’ स्पर्धा नुकत्याच पार पडल्या.

महाराष्ट्रातल्या तमाम तरुण रंगकर्मीचं ज्याकडे लक्ष लागून राहिलेलं असतं अशा ‘सवाई एकांकिका’ स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. यंदाच्या या स्पर्धाचा माहोल टिपणारा लेख –

दिनांक २५ जानेवारी रोजी साधारण रात्रौ आठच्या सुमारास तुम्ही दादर स्थानकापासून प्रवास करत सिद्धिविनायक मंदिराजवळून जात असाल तर तुम्हाला हमखास ३०-४० जणांचा घोळका मंदिरातून बाहेर येताना दिसेल. असा एक किंवा अनेक कितीही घोळके दिसू शकतात. पण सगळ्यांच्या हातात नाटकाची प्रॉपर्टी, सामान, आणि हातात सिद्धिविनायकाचा नारळ आणि प्रसाद दिसेल. हळूहळू तुम्ही पुढे जाता आणि गर्दी वाढताना दिसू लागते. सिद्धिविनायक मंदिर पाठीमागल्या बाजूस असताना इथे एवढी गर्दी कसली असा प्रश्न जर तुम्हाला रवींद्र नाटय़ मंदिराच्या दाराशी येऊन २५ जानेवारी रोजी पडला तर तुम्ही महाराष्ट्रात राहून तुमचा सांस्कृतिक अभ्यास कमी पडला असं मनाशी ठरवून टाकावं, कारण ती गर्दी असते ‘चतुरंग प्रतिष्ठान’तर्फे भरविण्यात येणाऱ्या ‘सवाई एकांकिका’ स्पध्रेची. नाटय़ मंदिराच्या दोन्ही प्रवेशद्वारांपाशी तरुण-तरुणींची प्रचंड गर्दी, सिने-मालिका-नाटय़सृष्टीत दिसणारे ओळखीचे चेहरे घोळक्यांत उभे आणि ज्यांना आपली कुठूनही ओळख निघणार नाही असा स्वतवर ठाम विश्वास असतो असे तिकिटाच्या रांगेत उभे असं काहीसं चित्र तिथे असतं. अशा वेळेस ‘मी याला ओळखतो, त्याला ओळखतो, हा तर माझा लंगोटीयार आहे’ असं म्हणणाऱ्या दोस्त मंडळींना येथे आणून त्यांचा पर्दाफाश करण्यास हरकत नाही. आता एवढं सगळं जमत नसताना आíथक सुबत्ता असलेले लोक काही वेगळ्या मार्गाचा प्रयत्न करताना दिसतात. ‘देशातला काळा पसा बाहेर आला पाहिजे’ अशी तावातावाने चर्चा करणारे तरुण काळ्या बाजाराला महत्त्व देताना दिसतात. आणि भर काळोखात मराठी एकांकिकांसाठी काळ्या मार्गाने तिकीट विक्री होताना पाहून मराठी रंगभूमी ‘ब्लॅकआउट’नेच जास्त समृद्ध होतेय असं दिलासामय सुख मनाला मिळतं. येनकेनप्रकारेण तुम्ही तिकीट मिळवून आत जाता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर एखादा गड जिंकल्यापेक्षा कमी आनंद नसतो. (निवडणुकांचा काळ पाहता ; तुम्हाला ‘तिकीट’ मिळाल्यावर ‘सीट’ जिंकून आल्यासारखं वाटतं.) नाटय़गृहात कमालीची ऊर्जा खेळताना दिसते. तरुण- तरुणी आपापल्या महाविद्यालय, संस्थांच्या नावाने ओरडत असतात. आता या संस्था म्हणजे वेगळंच प्रकरण आहे. एखाद्या महाविद्यालयाने आपल्या मनासारखं ‘बजेट’ न दिल्यास बंडखोर वृत्तीने स्वतचा पक्ष काढावा तशी स्वतच्या जिवावर जी काढली जाते त्याला ‘संस्था’ म्हणतात. तसंही नावात काय आहे? तर अचानक पडदा उघडतो, औपचारिक सुरुवात होते. पण त्या औपचारिक सुरुवातीतही प्रचंड साधेपणा. ३० वं वर्ष आहे म्हणून कसलाही बडेजाव नाही, भव्यदिव्यता नाही. एक मोकळेढाकळेपणा आणि सहज सुंदरता होती. प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत कुलकर्णी आणि विनोद तावडे यांनी आपापली जवाबदारी सूचक हाताळून कार्यक्रमाचे उदघाटन केले आणि सुरू झाली सवाई कोण ठरणार याची चढाओढ.
पहिल्या एकांकिकेसाठी नाटकाचा पडदा उघडतो तेव्हा प्रचंड टाळ्या आणि शिट्टय़ा यांचा खच पडतो. ‘ग्रीड अँड फिअर’ हे नाटक रंगू लागतं.

या नाटकांची अनाउन्समेन्ट विशेष लक्ष वेधून घेते. कुठेही लेखक किंवा दिग्दर्शकाचं नाव न घेता, लेखक : उजवा, दिग्दर्शक : डावा, अशी सुरुवात झाल्याने काही आगळंवेगळं पाहायला मिळणार अशी आशा पल्लवित होते. आणि तसंच घडतंसुद्धा. या नाटकाचे लेखक प्रसाद थोरवे आणि दिग्दर्शक सुमेध म्हात्रे यांनी कमाल केलीये. नाटकातले उत्तम संवाद विशेष आकर्षून घेतात आणि प्रेक्षकांच्या मनात विविध प्रश्न निर्माण करतात. ‘ना नर, ना मादी आणि म्हणे आम्ही समाजवादी’ यांसारखे संवाद किंवा ‘नमोरुग्ण’ असा शब्दांचा केलेला वापर आणि खेळ प्रेक्षकांची वाहवा मिळवतो आणि ‘आजचा सवाल’ उठवणाऱ्या ‘इंटलेक्चुअल फेक्युलर’ लोकांना सवाल करत सामाजिक प्रश्नांना वाचा फोडतो. नाटकाच्या दिग्दर्शनातील बारकावे टिपण्याजोगे होते. एकूणच तरुणांचा एक उत्तम प्रयत्न आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी नाटय़ माध्यमाचा केलेला वापर वाखाणण्याजोगा होता. एकांकिका संपल्यावर दुसरी सुरू होण्यापूर्वी काही वेळ जातो. त्या वेळेत नाटकाच्या यशस्विततेबद्दल साधकबाधक चर्चा होते. यावरून प्रेक्षकही तितक्याच ताकदीचे असतात याची जाणीव झाल्यासारखी राहत नाही. त्यानंतर ‘श्यामची आई’ ही दुसरी एकांकिका सुरू होते. आई आणि मुलाच्या नातेसंबंधांवर हळुवारपणे भाष्य करणारं एक उत्तम विनोदी पण काळजाला हात घालणारं असं या नाटकाचं वर्णन करता येईल. या नाटकात ‘आई’ची भूमिका साकारणाऱ्या ‘मृणाली तांबडकर’ हिने कमाल केलीये. तिने आवाजात आणलेली विविधता आणि शारीरिक चपळता नाटकाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते. शेजारणीची भूमिका साकारणाऱ्या ‘प्रियांका शिस्रेकर’ हिनेसुद्धा तिच्या छोटय़ाशा भूमिकेत अभिनयाची लक्षवेधक चुणूक दाखवली आहे.

‘दप्तर’ ही तिसरी एकांकिका जेव्हा सुरू होते तेव्हा प्रेक्षकांचा प्रचंड पािठबा त्या एकांकिकेला जाणवतो. नाटकाचे लेखक ओंकार राऊत यांनी एकांकिका छान लिहिली आहे; पण एकांकिकेचा प्रयोग रंगण्यात कमी पडला असं राहून राहून वाटत होतं. इतर स्पर्धामध्ये वरचष्मा दाखवणाऱ्या या एकांकिकेला सवाईमध्ये कमाल करता आली नाही हे मात्र खरं. एव्हाना मध्यरात्र झाली असल्याने एखादं नाटक छान झोप काढण्यास प्रोत्साहन देऊ शकतं अशी परिस्थिती निर्माण झालेली असते. प्रेक्षक चहाचा मारा करून स्वत:ला जागं ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यात चौथी एकांकिका सुरू होते ‘थ्री हंड्रेड मिसिंग’. या नाटकात बरंच काही काही ‘मिसिंग’ जाणवलं. एक क्षण तर आपण चुकून सवाईऐवजी इंग्रजी एकांकिका स्पध्रेला बसलो की काय, असा प्रश्न डुलक्या काढणाऱ्या प्रेक्षकाला पडतो. नाटकाचा विषय कदाचित सर्वसामान्यांना अपरिचित असल्याने समोर जे दाखवतील त्यावर विश्वास ठेवण्याशिवाय विकल्प नसतो; पण या नाटकाने सामान्य प्रेक्षकाच्या मनातील थॉमस अल्वा एडिसनच्या प्रतिमेला धक्का दिला एवढं निश्चित. सामान्य माणूस या धक्क्याने का होईना एडिसनबद्दल अधिक वाचू लागला तर त्याचं श्रेय या नाटकाला जाईल. बाकी या नाटकाची अनाऊन्समेंट ‘विद्यार्थी लेखक’ आणि ‘विद्यार्थी परीक्षक’ अशा स्वरूपात केल्याने ती तंतोतंत जुळल्याचं जाणवतं. पाचवी सादर झालेल्या ‘असणं-नसणं’ या नाटकाचा विषय चांगला होता. लेखक श्रेयस राजे यांनी तो चांगला हाताळलासुद्धा. मात्र अभिनयात नाटकाने कच खाल्ली. नाटकाची कािस्टग प्रचंड चुकलेली. अनंता या व्यक्तिरेखेत जो बाप दाखवलेला तो कुठल्याही दृष्टिकोनातून बाप वाटत नव्हता; पण बाप साकारणाऱ्या ‘नितेश लांडगे’ या व्यक्तिरेखेचं मोठेपण एवढंच की, त्याने ज्या मोठय़ा मनाने कानाखाली खाल्लीये ती लाजवाब. एकांकिकेच्या मधल्या काळात प्रेक्षकांचं ‘असं झणझणीत काही पाहायला नाही मिळालं’ असं दु:ख सतत बोलण्यातून जाणवत होतं आणि अशाच वेळेस, ज्याला राइट टाइम म्हणतात अशा प्रहरी सहावी एकांकिका सुरूझाली ‘इन सर्च ऑफ’. संपूर्ण नाटय़गृह जिने डोक्यावर घेतलं अशी ही एकांकिका. प्रचंड ऊर्जा, अचूक टायिमग आणि विनोदाचा सिक्स्थ सेन्स या त्रिसूत्रीवर डॉ. सिद्धेश्वर हेळवीची भूमिका साकारणारा ओमकार भोजने प्रचंड भाव खाऊन गेला.

या एकांकिकेची संपूर्ण टीमच कमाल होती. आडनाव – जात असे विषय एका वेगळ्या खुबीने हाताळण्याचं कसब लेखक आणि दिग्दर्शक संजय जमखंडी आणि राजरत्न भोजने यांच्याकडे असल्याचं जाणवलं. उत्तम लिखाण, अचूक दिग्दर्शन आणि त्याला उत्तम जोड देणारे कलाकार याने हे नाटक प्रेक्षकांच्या हृदयावर कोरलं गेलं आणि साहजिक सवाई प्रेक्षकपसंतीचा मानाचा किताबसुद्धा मिळवला आणि आता शेवटची एकांकिका ‘पाझर’. खरंच या नाटकाने प्रेक्षकांना पाझर फोडला. पडदा उघडताच एका लहानग्या बालकलाकाराने ‘कुणी पाणी देता का?’ अशी घातलेली आर्त साद प्रेक्षकांना हेलावून टाकणारी निघाली. जसं नाटक रंगत गेलं तेवढी त्याची खोली जाणवली. त्यातील ‘जिजा’ हे पात्र रंगवणाऱ्या शुभम खरे यांचा अभिनय लक्षवेधी होता. एक उत्तम नाटय़ नजराणा शेवटच्या दोन्ही एकांकिकेने दिला.

आता वेळ झाली होती निकालाची. त्या वेळेआधी प्रत्येकाने आपले आडाखे बांधण्यास सुरुवात केली. प्रेक्षकांचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा होता. थोडय़ाच वेळात त्या आत्मविश्वासाचा कस लागणार होता. प्रत्येक नाटय़ संस्था आपल्या माथी सवाईचा टिळा लावून घेण्यास उत्सुक झाली होती आणि निकाल घोषित होण्यास सुरुवात झाली..!

चतुरंग प्रतिष्ठान ‘सवाई एकांकिका स्पर्धा २०१७’
प्रेक्षक पारितोषिक : ‘इन सर्च ऑफ’ – अनुभूती, बदलापूर
सवाई नेपथ्यकार : अनिल घेरडे ‘थ्री हंड्रेड मिसिंग’ –
सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे
सवाई ध्वनी संयोजक : अर्जुन टाकरस, बिपीन घोबाळे ‘पाझर’ – नाटय़वाडा, औरंगाबाद
सवाई प्रकाशयोजनाकार : चेतन ढवळे ‘पाझर’ –
नाटय़वाडा, औरंगाबाद
सवाई अभिनेत्री : मृणाली तांबडकर ‘श्यामची आई’ – सिडनेहॅम महाविद्यालय, मुंबई
सवाई अभिनेता : गौरव बर्वे ‘थ्री हंड्रेड मिसिंग’-
सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे
सवाई दिग्दर्शक : यश रुईकर ‘थ्री हंड्रेड मिसिंग’ –
सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे
सवाई लेखक : संजय जमखंडी, राजरत्न भोजने ‘इन सर्च ऑफ’ – अनुभूती, बदलापूर
सवाई द्वितीय एकांकिका : ‘इन सर्च ऑफ’ –
अनुभूती, बदलापूर
सवाई प्रथम एकांकिका : ‘पाझर’ – नाटय़वाडा, औरंगाबाद
सौरभ नाईक – response.lokprabha@expressindia.com

सौजन्य – लोकप्रभा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2017 1:25 am

Web Title: lokprabha natyrang sawai play and sawai audience
Next Stories
1 चित्रिकरण सुरु असताना श्रद्धाला अश्रू झाले अनावर
2 सिने ‘नॉलेज’: जॅकी श्रॉफला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक कोणी दिला होता?
3 बॉलीवूड अभिनेत्याने तब्बल एक वर्षानंतर केला लग्न केल्याचा खुलासा
Just Now!
X