चित्रपट : बघतोस काय..मुजरा कर!

शिवरायांबद्दलचे जाज्वल्य प्रेम आणि अभिमान बाळगणारी अनेक तरुण मने आजूबाजूला दिसतात, मात्र या प्रेमाची परिणती शिवरायांप्रमाणे त्यांचे कार्यकर्तृत्व जाणून घेऊन ते आपल्या अंगी बाणवण्याच्या दृष्टीने कधीच होत नाही. एकीकडे वैचारिक पातळीवर सळसळत्या उत्साहाने दौडणाऱ्या या तरुणाईत बदल हवा आहे, तर दुसरीकडे याच शिवरायांच्या वैभवी इतिहासाचा, त्यांच्या गडकि ल्ल्यांचा दाखला देत तरुणाईची मते जिंकत सत्तेचे इमले रचणाऱ्यांनाही शिवरायांच्या विचारांशी देणेघेणे नाही. त्यांना केवळ त्यांची स्मारके बांधण्यात रस आहे. या दोन विषयांची समांतर मांडणी करीत दिग्दर्शक हेमंत ढोमेने अत्यंत संयत पण रंजक मांडणीचा हा ‘मुजरा’ दिला आहे.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
Mrunmayee Deshpande talks about her character in Swargandharva Sudhir Phadke Movie
इन्स्टाग्रामवरील ‘या’ रीलमुळे मृण्मयी देशपांडेला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात मिळाली भूमिका, म्हणाली, “माझ्याबाबतीत…”
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

शिवाजी महाराजांनी उभारलेल्या साम्राज्याची साक्ष देण्यासाठी राजकीय व्यवस्थेकडून अनेकदा गडकिल्ल्यांचे दाखले दिले जातात. मात्र काळाच्या ओघात केवळ भग्नावशेषांच्या रूपात उरलेला हा वैभवी इतिहास जपण्याच्या दृष्टीने काहीच प्रयत्न त्यांच्याकडून केले जात नाहीत. ढोबळमानाने या विषयावरची मांडणी तीही चित्रपटातून करायची झाली तर तो उपदेशात्मक होईल, ही भीती असते. त्यामुळे विषयाचे गांभीर्य जपताना हेमंतने एका रंजक कथेची जोड देत आपल्याला हवा तो विषय मांडला आहे. गावागावांतील सरपंच, आमदारकीच्या जागांसाठीचे राजकारण, दोन गटांमधील शत्रुत्व याचा पुरेपूर वापर कथेसाठी केला आहे. गावचे सरपंच नानासाहेब देशमुख (जितेंद्र जोशी) आणि त्यांचे दोन विश्वासू सहकारी पांडाशेठ (अनिकेत विश्वासराव) आणि शिवा (अक्षय टाकसाळे) या तिघांचे शिवरायांबद्दलचे प्रेम, गडकिल्ल्यांच्या दुरवस्थेबद्दल त्यांना असलेला राग, आपल्या किल्ल्यावर कोणी धांगडधिंगा करू नये म्हणून ते नेहमी जागरूक असतात. कि ल्ल्यांची ही रोजची दुर्दशा थांबवायची असेल तर राजकारणात शिरले पाहिजे, गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकारदरबारी धूळ खात पडलेली योजना कार्यान्वित करीत गडाबरोबरच गावाचाही विकास करण्याची कल्पना नानासाहेबांच्या मनात येते. गावात नानासाहेबांचा एकच शत्रू आहे तो म्हणजे आमदार समशेर पाटील (हेमंत ढोमे). समशेरला निवडणुकीत मात देऊन नानासाहेब आमदार व्हावेत, यासाठी हे तिघेही योजना आखतात. एकातून दुसरे, दुसऱ्यातून तिसरे असे करीत आपले शक्तिप्रदर्शन करण्यासाठी म्हणून थेट लंडनमध्ये असलेली शिवाजी महाराजांची जगदंब तलवार इथे आणायच्या ध्यासाने ते तयारीला लागतात. ही तलवार आणण्यासाठी ते लंडनला जातात का? तलवार भारतात येते का? नानासाहेबांचे गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचे स्वप्न पूर्ण होते का? या प्रश्नांची उत्तरे चित्रपटातच पाहायला हवीत.

चित्रपटाचा विषय, त्याचा हेतू सरळ-साधा, स्पष्ट असतानाही ज्या रंजक पद्धतीने आणि वळणावळणाने कथा फिरते, त्यामुळे हा चित्रपट वेगळा ठरतो. त्यासाठी लेखन आणि दिग्दर्शन या दोन्ही पातळीवर हेमंत ढोमेला श्रेय द्यायला हवे. जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव आणि अक्षय टाकसाळे ही त्रिमूर्ती चांगली जमून आली आहे. फार बडबड न करता केवळ चेहऱ्यावरच्या हावभावांतून जास्त व्यक्त होणारा जितेंद्र जोशीचा नानासाहेब अफलातून आहे. त्याचप्रमाणे अनिकेतकडे गेल्या काही वर्षांत एकाच साच्याच्या भूमिका आल्या आहेत, तरीही त्याने लुकपासून संवादफेकीपर्यंत मुद्दामहून बदल करीत पांडाशेठ ही व्यक्तिरेखा साकारली आहे. अक्षयनेही आपल्या वाटय़ाला आलेली शिवाची भूमिका प्रामाणिकपणे केली आहे. त्यातच ‘शिवा’ला त्याच्या प्रेयसीच्या रूपात पर्ण पेठेची साथ मिळाली असल्याने ही जोडी उठून दिसते. चांगले कलाकार ही या चित्रपटाची ताकद आहे. राजकारणातील मोहरे म्हणून अश्विनी काळसेकर आणि विक्रम गोखले दोघेही छोटय़ाशा भूमिकेत भाव खाऊन जातात. तीच गोष्ट इतिहासतज्ज्ञाची भूमिका साकारणाऱ्या अनंत जोग यांच्याबाबतीत म्हणता येईल. नेहा जोशी आणि रसिका सुनील या दोघींनीही आपल्या वाटय़ाला आलेल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. गडकिल्ल्यांचा विषय असल्याने त्याचे नेत्रसुखद चित्रण ही जमेची बाजू चित्रपटात आहे. मात्र किल्ल्यांबद्दल समाजातच असलेली अनास्था, शिवाजी महाराजांबद्दलचा अभिमान वेगळा आणि त्या दृष्टीने स्वराज्यासाठी लोकांकडून होणारे प्रयत्न फारच तोकडे आहेत यावर दिग्दर्शकाने नेमके बोट ठेवले असले तरी त्याची मांडणी आणखीन प्रभावी करता आली असती. अमितराज यांनी संगीत दिलेली चित्रपटातील गाणी सुमधूर असली तरी शिवाजी महाराजांचे पोवाडे, गाणी हीसुद्धा थोडी उठावदार असायला हवी होती तर कदाचित वेगळा परिणाम झाला असता.

बघतोस काय.. मुजरा कर!

  • निर्माता – एव्हरेस्ट एन्टरटेन्मेन्ट
  • दिग्दर्शक – हेमंत ढोमे
  • कलाकार – जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, अक्षय टाकसाळे, हेमंत ढोमे, नेहा जोशी, पर्ण पेठे, रसिका सुनील, अश्विनी काळसेकर, विक्रम गोखले, अनंत जोग आणि सोनाली कुलकर्णी.