दक्षिणेकडे सुपरस्टार रजनीकांत ज्या ज्या काही अचाट अ‍ॅक्शन करतात त्या तर्काच्या पातळीवर कितीही अशक्य असल्या तरी त्या पाहून पिटातील प्रेक्षक टाळ्याच वाजवतात. रांगडा नायक, वाटेल त्या गोष्टीवर मख्ख चेहऱ्याने काहीही न बोलता केवळ हातापायांनी बोलणारे दाक्षिणात्य चित्रपटातील नायक आणि त्यांच्या कथा तिथे सुपरहिट ठरल्या आहेत. मग अशा सुपरहिट चित्रपटांच्या कथा रिमेक म्हणून मराठीत आणण्याचा आणि आपल्याही नायकांना अ‍ॅक्शन हिरो म्हणून उभं करण्याचा मोह दिग्दर्शक, निर्मात्यांना झाला तर यात वावगं काही नाही. पण, दाक्षिणात्य चित्रपटांचा रिमेक करताना त्या व्यक्तिरेखांसह संपूर्ण कथा आपल्या मातीतील वाटावी, किमान एवढे भान बाळगून दिग्दर्शकाने मांडणी केली असती तर कदाचित ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’ हा वेगळा प्रयत्न म्हणून दखलपात्र तरी ठरला असता.

कन्नड चित्रपट ‘मिस्टर अँड मिसेस रामाचारी’ची मराठी आवृत्ती म्हणून आलेला ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’ हा चित्रपट म्हणजे पहिल्या फ्रेमपासून दाक्षिणात्य शैलीतील मराठी गोंधळ आहे. तोंडी सदा महाराजांचे (शिवाजी महाराज) नाव घेणारा नायक शिवा (वैभव तत्त्ववादी), त्याला कधीही समजून न घेणारे आणि सतत दोन मुलांची तुलना करत राहणारे वडील (मोहन जोशी), मुलगा आणि नवरा यांच्या कात्रीत सापडलेली आई असं कुटुंब आहे. शिवाला प्रेमात पाडू शकेल अशी नायिका गार्गी (प्रार्थना) आहे. शिवा लहानपणापासूनच इतरांशी फटकून वागतो, सर्वसामान्यांच्या जगण्याची चौकट त्याला मान्य नाही. त्याचे दोन लंगोटी यार, टेरेसवरची त्यांची दारूपार्टीवाली मैत्री अशा सगळ्या मसाला गोष्टी चित्रपटात ठासून भरल्या आहेत. मात्र चित्रपटभर एकमेकांशी आटय़ापाटय़ा खेळतायेत जणू या धर्तीवर एकमेकांच्या कानाखाली काढलेले आवाज, त्याच त्याच खलनायकाला आणि त्याच्या त्याच त्याच पंटरना सतत हवेत लाथा मारून गोल फिरवत पाडणारा आपला रांगडा नायक, त्याच्या छातीवर गोंदवलेला महाराजांचा टॅटू याच गोष्टी आपल्याला दिसतात, ऐकू येतात आणि लक्षात राहतात. एखाद्या चित्रपटाचा रिमेक करताना त्यातलं दिग्दर्शक म्हणून काय आवडलं आणि नेमकं प्रेक्षकांपर्यंत काय पोहोचवायचं आहे, याचा बारीकसाही विचार दिग्दर्शकाने केला नसावा असंच चित्रपटभर जाणवत राहतं. त्यामुळे नायिकेबरोबर प्रेमाच्या आणाभाका, गाणी-बजावणी, उरलेल्या वेळेत आपल्या गर्लफ्रेंडकडे वाकडय़ा नजरेने बघणाऱ्यांना फोडून काढणं, वडील आपल्याला मायेने जवळ कधी घेणार याची वाट पाहत राहणं याशिवाय नायक काहीच करताना दिसत नाही.

marathi actress smita shewale shares experience about yanda kartavya aahe movie
‘यंदा कर्तव्य आहे’ला १८ वर्षे पूर्ण! नवख्या स्मिता शेवाळेला कशी मिळाली होती भूमिका? तिनेच सांगितला अनुभव
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”

त्याची प्रेमिका म्हणून शिवाचं आयुष्य बदलून दाखवेन या हेतूने प्रेमाच्या रणांगणात उतरलेली नायिकाही सतत भेदरलेल्या चेहऱ्याने त्याच्या हाणामाऱ्या पाहत राहण्याशिवाय काहीच करत नाही. किंबहुना, नायकाचं आयुष्य बदलण्याचा तिने घेतलेला ध्यासही ती (म्हणजे पर्यायाने दिग्दर्शक) विसरून गेली असावी की काय अशी शंका येते. कारण, चित्रपट शेवटाकडे येत असताना नायकाला बदलण्याची भाषा करणारी नायिका रडत रडत मी तुझ्यासाठी बदलेन, असं काकुळतीने सांगताना दिसते. त्यावर नायकही तू बदललीस तर तू माझी गार्गी कशी असशील? असे काहीतरी तद्दन उलट प्रश्न विचारून कथेला वाटाण्याच्या अक्षता लावताना दिसतो. कथा आणि संवादाच्या बाबतीतही अगदीच सुमार असा हा चित्रपट आहे. ‘कॉफी आणि बरेच काही’ या चित्रपटाचे यश आणि ‘बाजीराव मस्तानी’तील चिमाजी अप्पा साकारल्यानंतर वैभव तत्तवादीचा हा चित्रपट अभिनयाची आणखी एक पर्वणी असेल, हा अंदाज अक्षरश: फोल ठरला आहे. अ‍ॅक्शन हिरो म्हणून वैभव एका वेगळ्या लुकमध्ये प्रेक्षकांसमोर आला आहे. त्याने त्यासाठी घेतलेली मेहनतही दिसून येते. मात्र मुळातच कथा नसलेल्या या चित्रपटात वैभवच्या या लुकचा, स्टंटगिरीचा म्हणावा तसा प्रभाव पडत नाही. प्रार्थना बेहरेलाही त्यात मिरवण्यापलीकडे फारसे काही काम नाही. मोहन जोशी यांनी वडिलांच्या भूमिकेला आपल्या पद्धतीने न्याय दिला आहे. त्यामुळे त्यांच्यातले आणि वैभवमधले काही प्रसंग खूप छान जमले आहेत. बाकी प्रदीप वेलणकर, अनुजा साठे, सुमुखी पेंडसे अशी अनेक कलाकार मंडळी चित्रपटात नावापुरती आहेत, मात्र ती का आहेत, असा एकच प्रश्न प्रेक्षकांना छळत राहतो. भरमसाटी गाणी आणि भरमसाटी हाणामारी, त ला प जोडून केलेले संवाद यामुळे दाक्षिणात्य रामाचारीचा मराठीत सदाचारी होताना एकच सावळागोंधळ उडाला आहे आणि दुर्दैवाने तो असह्य़ असा आहे.

मिस्टर अँड मिसेस सदाचारी

दिग्दर्शक – आशीष वाघ

निर्माता – उत्पल आचार्य, आशीष वाघ

कलाकार – वैभव तत्त्ववादी, प्रार्थना बेहरे, मोहन जोशी, प्रदीप वेलणकर, सुमुखी पेंडसे, अनुजा साठे, प्रसाद जवादे, विजय आंदळकर, उमा सरदेशमुख.

संगीत – पंकज पडघम, व्ही. हरिकृष्णा