कोणत्याही गायकाची मफल रंगण्यासाठी सुरुवातीलाच त्याचा षड्ज लागणे जसे महत्त्वाचे तसेच एखादा स्वरमहोत्सव जमून येण्यासाठी सर्व सहभागी प्रतिभावंतांचा कलाविष्कार उच्च कोटीचा होणे आवश्यक. विलेपाल्रे पूर्व येथील साठय़े महाविद्यालयाच्या प्रांगणात शुक्रवारपासून सुरू झालेल्या तीन दिवसीय हृदयेश फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी याची प्रचीती आली. पं. जयतीर्थ मेवुंडी, पं. रुपक कुलकर्णी, कला रामनाथ आणि उस्ताद राशिद खान या नामांकित रसिकप्रिय कलाकारांच्या अत्युच्च सादरीकरणामुळे या महोत्सवाला सूर गवसला. मुंबईतील सवाई गंधर्व महोत्सव अशी ख्याती असलेला हा सोहळा ‘लोकसत्ता’तर्फे प्रस्तुत होत आहे.
या महोत्सवाचे हे सव्विसावे वर्ष असून नामांकित व रसिकप्रिय कलाकारांच्या सहभागाची परंपरा यंदाही हृदयेशने जपली आहे. किराणा घराण्याची गायकी समर्थपणे पुढे नेणारे सध्याचे लोकप्रिय गायक पं. जयतीर्थ मेवुंडी यांनी मंचावर प्रवेश केला आणि माजी प्राचार्य पी. एन. पोतदार यांच्या नावाने उभारलेल्या प्रेक्षागारातील अवघ्या रसिकांनी त्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. मेवुंडी यांनी मधुवंती रागातील ख्याल विस्ताराने सादर करून मफल ताब्यात घेतली. त्यानंतर समायोचित अशा पुरिया रागातील बंदिश गाऊन त्यांनी मावळतीचे रंग गहिरे केले. पं. भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेले सौभाग्यदा लक्ष्मी हे भजन प्रभावीपणे गात त्यांनी रसिकांची मने जिंकली. पं. मेवुंडी यांना संवादिनीवर सतीश कोळी व तबल्यावर अविनाश पाटील यांनी उत्तम साथ केली.
पं. रुपक कुलकर्णी आणि कला रामनाथ यांच्या सहवादनाने महोत्सवाची रंगत वाढत गेली. पं. हरिप्रसाद चौरासिया यांचे लाडके शिष्य असणाऱ्या रुपक यांनी शुद्ध कल्याण राग ख्याल अंगाने सादर केला. रुपक यांच्यासोबत प्रसिद्ध व्हायोलीनवादक एन. राजम यांची भाची व पं. जसराज यांचे मार्गदर्शन लाभलेल्या कला रामनाथ यांनी व्हायोलिनवर हा राग तितक्याच ताकदीने वाजवून रसिकांना आगळ्यावेगळ्या सहवादनाचा आनंद दिला. या दोघांनी कल्याण रागाची विविध रूपे तपशिलाने उलगडली. अखेरच्या टप्प्यात उभय कलाकारांनी द्रुतगतीत वादन करीत मफलीचा सर्वोच्च िबदू गाठला. ज्येष्ठ तबलावादक पं. आिनदो चटर्जी यांचे सुपुत्र अनुव्रत चटर्जी यांनी या दोघांना तबल्यावर तोलामोलाची साथ केली, तर अखिलेश गुंदेचा यांनीही पखवाजवर उत्तम कामगिरी केली.
या कार्यक्रमाला सहकार्य करणारे आशालता घैसास ट्रस्ट, जयसत्य चॅरिटेबल ट्रस्ट, स्टेट बँक इंडिया व अन्य प्रायोजक आणि ‘लोकप्रभा’चे कार्यकारी संपादक विनायक परब यांचा आयोजकांतर्फे उत्तरार्धापूर्वी सत्कार करण्यात आला.
पहिल्या दिवसाचे अखेरचे सत्र गाजवले ते उस्ताद राशिद खान यांनी. राशिद यांची प्रकृती ठीक नाही, त्यांच्या अंगात ताप आहे, तरीही ते आपल्या सर्वाच्या प्रेमाखातर हट्टाने येथे आले आहेत, अशी माहिती हृदयेशचे अविनाश प्रभावळकर यांनी दिली तेव्हा रसिकांनी टाळ्यांच्या गजरात या कलाकाराला मानवंदना दिली. नवीन पिढीतील आश्वासक स्वर या शब्दांत पं. भीमसेन जोशी यांनी ज्यांचे कौतुक केले त्या रामपूर सहास्वान घराण्याच्या या गायकाने पुरिया कल्याणमधील ख्यालाने मफलीची सुरुवात केली. हा ख्याल अर्धा तास गायल्यानंतर ‘बहोत दिन बिते’ आणि ‘करम करो दीन’ या बंदिशी सादर करून त्यांनी रसिकांना तृप्त केले. कार्यक्रम संपण्याची वेळ एव्हाना उलटून गेली होती, मात्र ‘का करू सजनी आए न बालम’ ही लोकप्रिय रचना गाऊन त्यांनी रसिकांना आश्चर्याचा धक्का दिला. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या मफलीचा हा कळसाध्याय ठरला.

ख्याल गायल्यानंतर ‘बहोत दिन बिते’ आणि ‘करम करो दीन’ या बंदिशी सादर करून उस्ताद राशिद खान यांनी रसिकांना तृप्त केले.