22 January 2021

News Flash

सबुरीवरच श्रद्धा!

गेल्यावर्षी चित्रपटसृष्टीचे सगळेच व्यवहार थंडावले.

|| रेश्मा राईकवार

गेल्यावर्षी चित्रपटसृष्टीचे सगळेच व्यवहार थंडावले. चित्रीकरण थांबले, चित्रपटांचे प्रदर्शन रखडले आणि कधी नव्हे ती इंडस्ट्री ठप्प झाली. ८ हजार कोटींच्या आसपास आर्थिक नुकसान सोसून नव्या वर्षी पुन्हा उभी राहू पाहणाऱ्या चित्रपट उद्योगाची नेमकी स्थिती काय आहे? चित्रपटगृहे सुरू झाली असली तरी त्यांच्याकडे दाखवायला मोठे चित्रपट नाहीत आणि मोठे चित्रपट नाहीत तर प्रेक्षक नाहीत, अशा विरोधाभासात अडकलेल्या चित्रपटसृष्टीची कोंडी कशी फुटणार? अशा अनेक प्रश्नांसह नव्या वर्षांत चित्रपटांमध्ये काय काय बदल दिसू शकतील याविषयी ‘वायकॉम १८ स्टुडिओ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित अंधारे यांच्याशी के लेली बातचीत..

नवीन वर्षांत चित्रपट व्यवसायाची घडी लवकर बसायला हवी, यासाठी सगळेच प्रयत्नशील आहेत, मात्र तरीही मोठे चित्रपट प्रदर्शनासाठी अजून तयार नाहीत, याचे कारण निर्माते खूप सावधपणे जगभरातील परिस्थितीचे अवलोकन करत आहेत, असे अजित अंधारे सांगतात. ‘सगळीकडे करोनाची स्थिती वेगवेगळी आहे. अमेरिके त अजूनही करोनाचा प्रकोप आहे, युरोपमध्ये कमी झाला होता मात्र तो पुन्हा वाढला. आपल्याकडे दिल्लीत परिस्थिती वेगळी होती, मुंबईत त्यामानाने बरी आहे. एखादा मोठा चित्रपट प्रदर्शित करायचा असेल तर सगळीकडे दैनंदिन व्यवहारांमध्ये सुरळीतता यायला हवी असते. आजूबाजूला परिस्थिती कशीही असली तरी चित्रपट प्रदर्शित करताना लोक तो पाहायला येतील का? हा निर्मात्यांना पडणारा पहिला प्रश्न असतो. आता या प्रश्नाचे गांभीर्य अधिक आहे. लोक धोका पत्करून चित्रपट पाहायला येतील का? की ते लस येण्याची वाट पाहतील? याचे उत्तर अनिश्चित आहे’, असे त्यांनी सांगितले. मात्र सद्य:परिस्थिती पाहता मार्चच्या सुमारास मोठे हिंदी चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपल्याक डे ‘८३’, ‘सूर्यवंशी’, ‘राधे’ असे अनेक मोठे चित्रपट प्रदर्शनासाठी थांबलेले आहेत, अद्यापपर्यंत हे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झालेले नाहीत कारण त्यांच्यासाठी तिकिटबारीवर होणारी कमाई मोठी आहे. त्यांना ती गमवायची नाही. अशावेळी इतके दिवस थांबून, वाट पाहून चित्रपट प्रदर्शित के ल्यावरही प्रेक्षक आले नाहीत म्हणून उत्पन्न नाही, ही परिस्थिती निर्मात्यांसाठी निराशाजनक असेल, असे ते सांगतात. देशात दिवाळीच्या सुमारास चित्रपटगृहे सुरू झाली, त्यानंतर साधारण महिनाभर उलटून गेला आहे. इतक्या लवकर चित्रपटांना प्रेक्षक प्रतिसाद मिळेल हे गृहीत धरणे योग्य होणार नाही. सध्या ‘वंडर वुमन १९८४’ प्रदर्शित झाला आहे, त्याला देशभरातून प्रेक्षक प्रतिसाद किती मिळतो आहे हे लक्षात येईलच. त्यानंतर तमिळमध्ये सुपरस्टार विजयचा ‘मास्टर’ हा मोठा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. ट्रेडच्या भाषेत सांगायचं तर लोकप्रिय ठरू शकतील अशा या चित्रपटांना किती प्रतिसाद मिळतो आहे हे लक्षात घेऊनच मोठय़ा हिंदी चित्रपटांचा विचार के ला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या वर्षभरात ओटीटीचा प्रेक्षकवर्ग वाढला आहे, अगदी ग्रामीण भागातही प्रेक्षकसंख्या ६५ टक्क्यांहून अधिक आहे. ओटीटीच्या बाजूने प्रेक्षकांचा कल वाढतो आहे, तिथे चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या मोठी आहे हे वास्तव असले तरी त्याचा चित्रपटांच्या व्यवसायावर फारसा परिणाम होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट के ले. चित्रपट हे मोठय़ा पडद्यावरच अनुभवण्याची गोष्ट आहे, आपण ओटीटीवर चित्रपट पाहिले तरी अनेकदा चांगला चित्रपट मोबाइलवर पाहण्याचे समाधान मिळत नाही. त्यामुळे प्रेक्षक चित्रपटगृहांकडे परतणार यात शंका नाही. अर्थातच ओटीटी असो वा टेलिव्हिजन तिथे प्रेक्षकांना प्रत्यक्षात घराबाहेर पडावे लागत नाही, त्यामुळे टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर टेलिव्हिजन इंडस्ट्री वेगाने रुळावर आली. तर ओटीटी उद्योगही एका स्थिर वेगाने पुढे जातो आहे, मात्र चित्रपटांना वेळ लागणार आणि त्यासाठी संयम ठेवणेच गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

गेल्या वर्षी रखडलेले चित्रपट आणि यावर्षी प्रदर्शित होणारे चित्रपट यामुळे एकच गर्दी होऊन एकमेकांच्या व्यवसायावर परिणाम होईल ही शक्यताही त्यांनी खोडून काढली. गेल्या वर्षी चित्रीकरणच बंद होते त्यामुळे अनेक चित्रपटांचे चित्रीकरण आणि पोस्ट प्रॉडक्शन रखडले. यावर्षी त्या रखडलेल्या चित्रीकरणाला वेग येईल, मात्र ते चित्रपट पूर्ण व्हायला वेळ लागणार असल्याने तोपर्यंत गेल्या वर्षीचे चित्रपट व्यवस्थित प्रदर्शित होऊ शकतील, अशी माहिती अंधारे यांनी दिली. उलट, दोन्हींचा तोल सांभाळला गेला असल्याने ती निर्मात्यांसमोरची मोठी अडचण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठीचा प्रेक्षक चोखंदळ

हिंदी चित्रपट, हॉलीवूडपटांची गर्दी नसल्याने प्रादेशिक चित्रपटांना प्रदर्शनासाठी आणि कमाईसाठी अधिक वाव असल्याचे सातत्याने बोलले जाते आहे. मराठी चित्रपटांना आता प्रेक्षकवर्ग मिळू शके ल, अशी स्थिती असताना या संधीचा फायदा निर्माते घेताना दिसत नाहीत, याकडे लक्ष वेधले असता मराठी चित्रपटांची स्थिती इतरांपेक्षा अधिक बिकट असल्याचे त्यांनी सांगितले. हिंदी असो वा दाक्षिणात्य चित्रपट असोत त्यांचा प्रेक्षकवर्ग खूप मोठा आहे. तिथे लोकप्रिय कलाकाराच्या प्रेमाखातर चित्रपट पाहायला जाणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे, मराठीचा प्रेक्षक मात्र चोखंदळ आहे. एखादा चित्रपट खूपच सुंदर आहे आणि तो चुकवता कामा नये हे पटले तरच मराठी प्रेक्षक धोका पत्करून चित्रपटगृहात येईल, असे अजित अंधारे यांनी सांगितले. के वळ चित्रपटगृहातील प्रदर्शनच नाही तर ओटीटी माध्यमावरही मराठी चित्रपटांची संख्या कमी आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. हिंदीनंतर ओटीटी माध्यमांनी जास्त भर दिला आहे तो दाक्षिणात्य चित्रपटांवर कारण, अर्थातच त्यांची प्रेक्षकसंख्या ओटीटीवरही जास्त आहे. मराठी प्रेक्षक ओटीटीवर फारसा नाही आणि जो आहे तो हिंदी, इंग्रजी, दाक्षिणात्य सगळेच चित्रपट पाहणारा आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांकडे ओटीटीचे दुर्लक्षच होते आहे, हे मान्य करतानाच उशिराने का होईना मराठी चित्रपटांसाठी ओटीटीवरची प्रेक्षकसंख्याही वाढणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त के ला.

ओटीटीवरील आशयनिर्मितीचा चित्रपटांवर परिणाम

ओटीटीवर स्पर्धा वाढली असल्याने तिथे सातत्याने सकस आणि वैविध्यपूर्ण आशयनिर्मिती होते आहे. किं बहुना, याच सकस आणि दर्जेदार आशयामुळे प्रेक्षक तिथे ओढला गेला आहे, हे वास्तव नाकारता येत नाही. त्यामुळे हिंदी चित्रपटांवर याचा निश्चितच परिणाम होऊ शकतो, असे मत अंधारे यांनी व्यक्त के ले. हिंदी चित्रपटांना ठोकळेबाजपणा सोडून आशयघन चित्रपटनिर्मितीसाठी अधिक प्रयत्न करावे लागतील, असे त्यांनी सांगितले.

हॉलीवूडपटांना पहिली पसंती

गेल्या वर्षी रखडलेल्या मोठय़ा चित्रपटांपैकी एखाददुसरा हिंदी चित्रपट मार्चमध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. मात्र वायकॉम १८ स्वत: हिंदी चित्रपट प्रदर्शित करण्याऐवजी त्यांच्याकडे असलेले हॉलीवूडपट प्रदर्शित करण्याला प्राधान्य देणार असल्याचे अंधारे यांनी स्पष्ट के ले. हिंदीत सध्या ‘वायकॉम १८’कडे आमिर खानचा ‘लालसिंह चढ्ढा’ हा मोठा चित्रपट आहे तो यावर्षीच्या अखेरीस प्रदर्शित होईल. त्याशिवाय मोठा हिंदी चित्रपट यावर्षी आमच्याकडे नाही, त्यामुळे टॉम क्रुझ अभिनीत ‘टॉप गन : मॅव्हरिक’ हा हॉलीवूडपट पहिले प्रदर्शित होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, ‘व्हायकॉम १८’ ने ‘टिपिंग पॉइंट’बरोबर तीन वेबमालिकांसाठी करार के ला होता. त्यानुसार ‘जमतारा – सबका नंबर आएगा’, ‘शी’ आणि ‘ताजमहल १९८९’ या तिन्ही वेबमालिकांचे दुसरे पर्व यावर्षी ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित होणार आहेत. त्याचबरोबर सत्यजित रे यांच्या लघुकथांवर आधारित ‘एक्स रे’ हा लघुकथापटही लवकरच प्रदर्शित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2021 1:11 am

Web Title: loksatta interview with ajit andhare mppg 94
Next Stories
1 सासू-सुनांचा नवा खेळ
2 ‘२०२१मध्ये मी तुम्हाला…;’ शाहरूखने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी
3 ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ मालिकेचा भव्यदिव्य सेट; कलाकारांनी अशी घेतली मेहनत
Just Now!
X