‘लगान’ चित्रपटासाठी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करणारी किरण राव अचानक चर्चेत आली ते आमिर खानशी विवाह झाल्यानंतर.. २००२ मध्ये आमिर आणि किरणचा विवाह झाला. त्यानंतर किरणने ‘धोबीघाट’ या चित्रपटाची कथा लिहिली आणि आमिर खान प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शनही किरणचेच होते. या चित्रपटात आमिर खाननेही भूमिका केली होती. ‘धोबीघाट’ची मांडणी आणि किरण रावचे व्यक्तिमत्त्व यामुळे एकूणच काहीशी बंडखोर, पुढारलेल्या विचारांची, नव्या फळीतील दिग्दर्शिका म्हणून तिच्याकडे सगळ्यांच्या नजरा रोखल्या होत्या. ती मात्र त्यानंतर ‘मामि’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुन्हा उभी करण्यात गुंतली. पाठोपाठ आमिर आणि त्याचा मित्र दिग्दर्शक सत्यजीत भटकळ यांच्याबरोबर ‘पानी’ फाऊंडेशनच्या कार्यक्रमात व्यग्र झाली. फाऊंडेशनचे काम वेगाने पुढे जात असल्याने त्यात पूर्णपणे गुंतलो गेलो आहे हे मान्य करतानाच निदान चित्रपट निर्मितीकडे पुन्हा वळायचं आहे, अशी भावना किरणने व्यक्त केली.

‘पानी’ फाऊंडेशनद्वारे राज्यभरात राबवली जाणारी ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१८’ ची सुरुवात होते आहे. केवळ ग्रामीण भागातील लोकांनाच पाणी साठवण्याचे, वाचवण्याचे प्रशिक्षण देत पाण्याचा प्रश्न सोडवण्यापुरतं मर्यादित न राहता आता त्यांना या टप्प्यावर ही चळवळ शहरी भागाकडेही वळवायची आहे. त्यासाठी त्यांनी ‘जलमित्र’ या नव्या संकल्पनेची, योजनेची घोषणा केली आहे. यानिमित्ताने, सेलिब्रिटी ते गावागावातून फिरणारी ‘पानी फाऊंडेशन’ची संस्थापक, कार्यकर्ती हा तिचा प्रवास खूप काही शिकवून जाणारा होता, असं किरण सांगते. दोन वर्षांपूर्वी जेव्हा हा उपक्रम सुरू केला तेव्हा महाराष्ट्रातील प्रत्येक गावापर्यंत ही योजना पोहोचवायची होती, त्यांना यात सक्रिय सहभागी करून घ्यायचं होतं. त्यासाठी ती आणि आमिर खान दोघेही सेलिब्रिटीच्या रूपातच लोकांसमोर आले होते. मात्र आता तिसऱ्या वर्षांत आम्ही सेलिब्रिटी म्हणून नव्हे तर मार्गदर्शक म्हणून गावागावांतून फिरणार आहोत, असं तिने सांगितलं. ‘‘हा बदल खूप काही शिकवणारा आहे. आमची प्रसिद्धीही बाजूला ठेवून एक माणूस म्हणून त्यांना मदत करण्याची आमची इच्छा आहे. त्यासाठी प्रत्येक गावात जाऊ न श्रमदान करणं ही गोष्ट ओघाने येतेच. त्यामुळे आमची प्रसिद्धी होत आहे हे आपल्याला अजिबात मान्य नाही,’’ असं ती म्हणते. उलट, एक कलाकार म्हणून आम्ही अशा  मोठय़ा प्रकल्पाचा भाग झालो तर ग्रामीण भागातील लोक त्याची दखल घेतील, या विचाराने आम्ही तीन वर्षांपूर्वी ‘पानी फाऊंडेशन’साठी पुढाकार घेतला, असं तिने सांगितलं.

‘‘आम्ही जेव्हा प्रत्येक गावात जात होतो तेव्हा लोकांना पाणी साठवण्याबद्दल आम्ही जे सांगत होतो, त्याचं महत्त्व कळायला लागलं. शहरात आपण पाण्यासाठी धडपडतो पण आज पाणी नसलं तर उद्या येईल हे आपल्याला माहिती असतं. आणि काही तास पाणी नाही आलं तरी आपला धीर सुटत जातो. ग्रामीण भागातलं चित्र इतकं सोपं नाही. कित्येक वर्ष पाण्यासाठी त्रासलेले हे गावकरी आमच्यामुळे का होईना निदान पाण्यासाठी श्रमदान करायला तयार झाले आणि हेच मोठं यश होतं,’’ असं ती म्हणते.

एकीकडे चित्रपट निर्मितीची जबाबदारी आणि दुसरीकडे सामाजिक कार्याबद्दल वाढत चाललेली ओढ या दोन्ही गोष्टींचा समतोल साधताना ‘पानी फाऊंडेशन’बरोबर यापुढेही त्याच वेगाने काम सुरू राहील, असं ती सांगते. त्यामागचं कारण स्पष्ट करताना, ‘‘चित्रपट व्यवसाय हा पूर्णपणे वेगळा आहे हे मान्य आहे मात्र कलाकार म्हणून आपल्यावर सामाजिक बांधिलकीही असते. या बांधिलकीच्या भावनेतूनच या कामाला सुरुवात झाली होती, मात्र आज आम्ही जे प्रयत्न करतो आहे त्यामुळे ग्रामीण भागामध्ये, तिथल्या लोकांमध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झालेली मी पाहिली, अनुभवली. त्यातून मी स्वत: खूप काही शिकत गेले आहे. मातीशी आपलं एक नातं असतं असं म्हणतात ते काय याचा अनुभव मी घेते आहे,’’ असं ती स्पष्ट करते.

अर्थातच, ‘पानी फाऊंडेशन’चे काम पुढे नेताना माध्यमांबद्दल असलेली जाण, त्या तंत्रावर असलेली हुकमत याचाही फायदा होतोच, असं ती सांगते. सध्या हा उपक्रम आणखी लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने त्यांनी नवीन संकेतस्थळ निर्माण केलं आहे. यावर पाणी साठवण्याचं तंत्र, त्यामागचं विज्ञान या सगळ्या गोष्टी ऑनलाइन क थांच्या माध्यमातून, काही व्हिडीओजच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. यामुळे शहरी भागातील लोकांनाही त्याचे ज्ञान मिळेल, तिथूनही सहभाग वाढेल, असा विश्वास किरणने व्यक्त केला. एक एंटरटेनर म्हणून आपली सामाजिक बांधिलकी असायलाच हवी. मग जे आपल्या कामाचं वेगळेपण आहे त्याचा वापर करत लोकांपर्यंत पोहोचायला हवं. आम्ही कथाकार आहोत, चित्रपटांच्या माध्यमातून लोकांना कथा सांगतो. त्यामुळे आम्ही जे काही करतो त्याचा आपसूकच त्यांच्यावर प्रभाव पडणार आहे. आणि याच गोष्टीचा विचार करून आपण सातत्याने ‘पानी फाऊंडेशन’चं काम पुढे वाढवत नेत आहोत’, असं सांगणारी किरण लोक त्यावरून काय विचार करतील, काय तर्क काढतील याबद्दल आपल्याला अजिबात भीती वाटत नसल्याचे स्पष्ट करतो. उलट, समाजमाध्यमांपेक्षाही टेलीव्हिजनच्या माध्यमातून लोकांना प्रत्यक्ष श्रमदान करताना पाहून इतरांनाही त्यासाठी उद्युक्त करत एक मोठे कार्य उभारण्यासाठी प्रेरणा देता येते आहे. ही या माध्यमाची आणि कामाचीही ताकद आहे ज्याचा पुरेपूर फायदा घेत एक मोठे कार्य उभारण्याच्या दृष्टीने पावले टाकायचा आपला मानसही तिने निर्धाराने व्यक्त केला.

‘पानी फाऊंडेशन’च्या कामात मी सध्या खूपच गुंतले आहे. त्यामुळे खरंच कुठेतरी माझं लिखाण, दिग्दर्शन फार मागे पडलं आहे. मात्र ‘सिक्रेट सुपरस्टार’ला मिळालेल्या यशानंतर पुन्हा एकदा चित्रपट निर्मितीत लक्ष घालण्याचा मी विचार करते आहे. एकीकडे चित्रपट निर्मितीची व्यवस्था सांभाळायची शिवाय, त्यातूनही वेळ काढून मी परत लिहायलाही सुरुवात करणार आहे. आमच्या व्यवसायातही आम्ही तेवढेच सक्रिय आहोत, सतर्क आहोत मात्र ‘पानी फाऊंडेशन’च्या कामाची जबाबदारीही खूप वाढली आहे. पहिल्यांदा तीन मग पंचवीस आणि आता पंच्चाहत्तर गावांमध्ये हे काम पोहोचलंय. त्यामुळे एकप्रकारे महाराष्ट्र जोडण्याचं काम वेगाने सुरू आहे. तरीही यावर्षी काही झालं तरी लिखाणाकडे वळायचा निर्धार केला आहे.     – किरण राव