मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशी यांचा ‘मुंबई पुणे मुंबई’ हा चित्रपट खूप गाजला. आता १२ नोव्हेंबर रोजी या चित्रपटाचा पुढचा भाग ‘मुंबई पुणे मुंबई-२ लग्नाला यायचं हं’ प्रदर्शित होणार आहे. त्या निमित्ताने चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे, मुक्ता बर्वे, स्वप्निल जोशी, विजय केंकरे आणि प्रशांत दामले यांनी बुधवारी ‘लोकसत्ता’ कार्यालयास भेट दिली आणि संपादकीय विभागातील सहकाऱ्यांशी गप्पा मारल्या. त्या गप्पांचा वृत्तान्त
‘मुंबई पुणे मुंबई’ या चित्रपटाला पाच वर्षे झाली तरीही प्रेक्षकांच्या मनावर या चित्रपटाचे गारुड अद्याप कायम आहे. आजही कोणत्याही वाहिनीवर चित्रपट लागला की तो आवर्जून पाहिला जातो. या चित्रपटाचा पुढचा भाग (सिक्वेल) कधी येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. ही उत्सुकता आता संपली असून १२ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. चित्रपट तरुण पिढीपासून ते आजी-आजोबांच्या पिढीपर्यंत सगळ्यांना आवडेल. प्रत्येकाला हा चित्रपट म्हणजे आपली गोष्ट वाटेल. चित्रपट पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना त्यांच्या तिकिटाचा शंभर टक्के मोबदला हा चित्रपट पाहून मिळेल. ‘मुंबई पुणे मुंबई २- लग्नाला यायचं हं’ हा ‘सुख देणारा’ चित्रपट आहे, असे चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
‘मुंबई पुणे मुंबई’चा सिक्वल तयार करावा, असे का वाटले? या प्रश्नावर राजवाडे म्हणाले, प्रेमात पडायला दोन माणसे लागतात. त्यामुळे चित्रपटाच्या पहिल्या भागात मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशी हे दोघेच होते. मुंबई व पुणे या शहराविषयीची त्यांची अस्मिता यात खुसखुशीत संवादातून व्यक्त झाली होती. आमच्या अपेक्षेपलीकडे हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला. चित्रपट जिथे संपतो तिथून पुढे गोष्ट होऊ शकते, असे वाटत होते. चित्रपटात पुढे काय घडेल ते पाहायला आम्हाला आवडेल अशी प्रेक्षकांचीही मागणी होती. चित्रपटाची पुढची गोष्ट म्हणजे त्या दोघांचे लग्न. आता लग्न म्हटले म्हणजे दोघांची कुटंबे, कुटुंबातील माणसे आली. त्या दोघांचेही आई-वडील, आजी, मावशी आणि अन्य अशी पात्रे पुढील भागात घेतली आहेत. प्रशांत दामले आणि विजय केंकरे यांचा मी जबरदस्त चाहता आहे. मला चित्रपटातील भूमिकांसाठी हे दोघेही हवेच होते. चित्रपटात सविता प्रभुणे, आसावरी जोशी, श्रुती मराठे, सुहास पान ७ पाहा
पान १ वरून जोशी हे कलाकारही आहेत. दामले आणि केंकरे यांचे काम पाहून असे ‘बाबा’ आपल्याला हवेत हे प्रत्येकाला वाटेल. ‘मुंबई पुणे मुंबई-२’ चित्रपट पाहण्यासाठी पहिला चित्रपट पाहणे गरजेचे असेल का? असे विचारले असता राजवाडे यांनी सांगितले, मला त्याची आवश्यकता वाटत नाही. पण अनेक प्रेक्षक असे आहेत की ते अद्याप ‘मुंबई पुणे मुंबई’च्या स्मरणरंजनात आहेत. त्यामुळे बरेच जण ‘मुंबई पुणे मुंबई २’ पाहण्यापूर्वी मूळ ‘मुंबई पुणे मुंबई’ पाहणार असून त्याच्या आठवणीत पुढचा भाग पाहणार आहेत. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात पहिल्या चित्रपटातील काही संदर्भ घेतले आहेत. दुसरा भाग पहिला चित्रपट पाहिलेल्यांना जुन्याची आठवण करून देईल आणि नव्याने पाहणाऱ्यांना आपण स्वतंत्र व नवा चित्रपट पाहतो आहोत, असेच वाटेल.

चित्रपटात ‘फिल गुड’ वातावरण
‘बोक्या सातबंडे’ या चित्रपटात मी एका लहान मुलाच्या वडिलांची भूमिका केली होती. ‘मुंबई पुणे मुंबई २’ चित्रपटात मी मोठय़ा मुलीच्या वडिलांच्या भूमिकेत आहे. मुलीची आई जेवढी आक्रमक स्वभावाची आहे तेवढे वडील नाहीत. समजूतदारपणा हा त्यांचा स्थायीभाव आहे. प्रशांत दामले सोडला तर मी अन्य कोणाबरोबर काम केले नव्हते. चित्रपट करताना खूप आनंद मिळाला. तोच आनंद प्रेक्षकांना हा चित्रपट पाहताना मिळेल. संपूर्ण चित्रपटात ‘फिल गुड’ वातावरण आहे. मी जास्त चित्रपट केले नाहीत, हे खरे आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कंटाळा. मला अभिनय करण्याचा खूप कंटाळा येतो. त्यापेक्षा नाटकाचे दिग्दर्शन करणे, विद्यापीठात विद्यार्थ्यांना नाटक शिकविणे हे मला जास्त आवडते. सतीश राजवाडे याचे पूर्वीचे चित्रपट पाहिले होते. त्याला चित्रपट हे माध्यम समजले आहे. त्यामुळे या भूमिकेसाठी सतीशने विचारल्यानंतर नाही म्हणताच आले नाही. चित्रपट, त्यातील व्यक्तिरेखा, प्रसंग आपल्या किंवा शेजारच्या घरात घडणारे वाटतील अशा प्रकारे प्रेक्षक या चित्रपटाशी समरस होईल.
-विजय केंकरे

माझ्यासाठी स्मरणरंजन
‘मुंबई पुणे मुंबई २’ हा चित्रपट म्हणजे माझ्यासाठी स्मरणरंजन (नॉस्टेल्जिया) आहे. त्यामुळे हा चित्रपट करताना खूप मजा आली. चित्रपट करताना खूप उत्सुकता होती. चित्रपट जिथे संपतो तिथून पुढची गोष्ट या नव्या चित्रपटात आहे. राजू पाटील यांनी मला ‘जोगवा’ चित्रपटातून वेगळ्या भूमिकेद्वारे ‘नायिका’ म्हणून तर सतीश राजवाडे यानेही ‘मुंबई पुणे मुंबई’तून शहरी नायिका म्हणून सादर केले. मुळात मी चित्रपटाची ‘नायिका’ होऊ शकते असा विश्वास त्या दोघांना वाटला आणि त्यांनी मला संधी दिली. विजय केंकरे हे ‘ललित कला केंद्र’ या संस्थेतील माझे सर. चित्रपटात मी पहिल्यांदा त्यांच्याबरोबर काम केले आहे. चित्रपटात ते माझ्या वडिलांची भूमिका करत आहेत. विद्यार्थिनी म्हणून त्यांनी माझी प्रगती पाहिली आणि चित्रपटात एक मुलगी म्हणून ते माझ्याकडे पाहात आहेत. हा एक वेगळाच आनंद आहे. ‘घना व राधा’ची मालिका आणि हा चित्रपट यात कोणतेही साम्य नाही. प्रेक्षकांनी ‘मुंबई पुणे मुंबई’ अनेक वेळा पाहिला आहे. आमचा नवा चित्रपटही त्यांना नक्कीच आवडेल. चांगला दिग्दर्शक, चांगले कलाकार, चांगले लेखन या सगळ्यांची भट्टी योग्य प्रकारे जमून आली की उत्तम चित्रपट तयार होतो. ‘मुंबई पुणे मुंबई २’च्या निमित्ताने ते सगळे जुळून आले असून त्याचे प्रतिबिंब चित्रपटात उमटलेले नक्कीच पाहायला मिळेल.
– मुक्ता बर्वे

आणि ‘गौतम’ व ‘गौरी’ घडत गेले
‘मुंबई पुणे मुंबई’ चित्रपटात काम करण्यापूर्वी मुक्ता आणि मी आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो. कधी एकत्र काम केलेले नव्हते. आमच्यात मैत्री नव्हती. पण चित्रपटाच्या निमित्ताने आमची मैत्री झाली. आम्ही एकमेकांना माणूस म्हणून ओळखायला लागलो. आम्ही पडद्यावर जसे होतो तसेच पडद्यामागेही होतो. याचा फायदा आम्हाला दोघांना आणि ‘मुंबई पुणे मुंबई’ चित्रपटालाही झाला. आमच्यातील ‘गौतम’ आणि ‘गौरी’ घडत गेले. त्याचा फायदा आता ‘मुंबई पुणे मुंबई २’ करताना झाला. सतीश राजवाडे हा उत्कृष्ट आणि अभ्यासू दिग्दर्शक आहे. काही जण नुसतेच प्रश्न निर्माण करतात तर काही जणांकडे त्या प्रश्नांची उत्तरेही असतात. सतीश हा उत्तरे असणाऱ्यांपैकी एक आहे. ‘मुंबई पुणे मुंबई २’च्या वेळेस एखादा प्रसंग चित्रित करून झाला की सतीश सांगायचा की प्रसंग चांगला झाला पण हा ‘गौतम’ किंवा ती ‘गौरी’ नाही. ते कसे यायला पाहिजेत ते तो आमच्याकडून काढून घ्यायचा. त्यामुळे चित्रपटात आम्हाला वेगळे काही करावे लागले नाही. आमच्यातून सतीशने ते वेचून काढले. चित्रपटात दिग्गज कलाकारांबरोबर आम्हाला काम करायला मिळाले हे आमचे भाग्य आहे. त्यामुळे चित्रपट करताना खूप आनंद मिळाला.
– स्वप्नील जोशी

भूमिका करताना मजा आली
चित्रपटाचा पहिला भाग हा दोघांच्या प्रेमात पडण्यापर्यंतचा असून आता पुढच्या भागात दोघांचे लग्न आहे. त्यामुळे दोघांच्याही घरचे, कुटुंब आले. चित्रपटातून आत्तापर्यंत मी प्रियकर, नवरा अशा भूमिका केल्या होत्या. ‘कार्टी प्रेमात पडली’ या नाटकात वडिलांची भूमिका करतो आहे. पण चित्रपटात ‘वडील’ही भूमिका पहिलांदा करतो आहे. मुलगा आणि मुलगी या दोघांशी वडीलांचे नाते वेगळ्या प्रकारचे असते. चित्रपटात मी स्वप्निल जोशीच्या वडिलांच्या भूमिकेत आहे. माझी ही भूमिका सकारात्मक आहे. वडील आणि मुलगा हे चांगले मित्र होऊ शकतात, हे यात पाहायला मिळते. आपल्या आजुबाजूला सतत नकारात्मक गोष्टी घडत असतात. अशा वेळी आपण स्वत: सतत आनंदी, उत्साही आणि सकारात्मक राहणे आणि समोरच्यालाही तसे ठेवणे आवश्यक असते. मी नेहमीच सकारात्मक दृष्टीने सगळ्या गोष्टींकडे बघत असतो. सतत उत्साही राहतो. त्यामुळे मी जसा आहे तशीच भूमिका मला करायला मिळाली आणि ती करताना खूप मजा आली. १९८६ ते ९० या काळात मिळतील ते अगदी वाट्टेल ते चित्रपट मी केले. १९९२ मध्ये माझे ‘गेला माधव कुणीकडे’ हे नाटक लोकप्रिय झाले आणि तेव्हा मी ठरविले की नाटक किंवा चित्रपट यापैकी फक्त एकच गंभीरपणे करायचे. मी नाटक करायचे नक्की केले. त्यामुळे नंतरच्या काळात अगदी निवडक मराठी चित्रपट स्वीकारले. मी स्वत: शिस्तबद्ध कलाकार असून अशा पद्धतीने काम करणारी माणसे मला आवडतात. सतीश हा शिस्तीने काम करणारा आहे. त्याचा अभ्यास पक्का असतो. चित्रपटाचा मसाला आणि त्याची फोडणी जमून आली आहे.
– प्रशांत दामले

मुक्ता आणि स्वप्निल यांना घेऊन दूरचित्रवाहिनीवर मालिका सादर झाली होती. त्यामुळे ‘घना आणि राधा’ची ती मालिका म्हणजे ‘मुंबई पुणे मुंबई’चा पुढचा भाग असे प्रेक्षकांना वाटले होते. पण तसे नाही. ती मालिका म्हणजे आमच्या चित्रपटाचा पुढचा भाग नव्हता. त्या मालिकेची गोष्टही माझी नव्हती. आता ती मालिका सादर झाल्यामुळे ‘मुंबई पुणे मुंबई’चा पुढचा भाग करताना काय घ्यायचे नाही हे आम्हाला नक्की करता आले. ‘मुंबई पुणे मुंबई’ प्रमाणेच हा नवा चित्रपटही लोकांना नक्की आवडेल. चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला अरे ही तर आपल्या घरात घडणारी गोष्ट आहे आणि असे कुटुंब आपलेही असावे असे नक्की वाटेल.
– सतीश राजवाडे (दिग्दर्शक)

– शब्दांकन- शेखर जोशी, छायाचित्रे- दिलीप कागडा