मराठी चित्रपटसृष्टीत ‘चॉकलेट हिरो’ची प्रतिमा असलेला अभिनेता स्वप्निल जोशी प्रथमच ‘रणांगण’ चित्रपटाच्या माध्यमातून खलनायकी भूमिका साकारतो आहे. विशेष म्हणजे अभिनेते सचिन पिळगावकर आणि स्वप्निल जोशी यांची परस्परविरोधी भूमिकांची जुगलबंदी या माध्यमातून पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. मात्र नायक म्हणून त्यातही चॉकलेट बॉय म्हणून कारकीर्द यशस्वी केल्यानंतर उशिराने का होईना खल किंवा नकारात्मक भूमिका साकारायला मिळतायेत याचे समाधान असल्याचे मत या स्वप्निल जोशी आणि सचिन पिळगावकर या दोन्ही अभिनेत्यांनी ‘लोकसत्ता’सोबत मारलेल्या गप्पांमध्ये व्यक्त केले.

कलाकारांनी भूमिकेबाबत अभ्यासू असले पाहिजे

कलाकाराने आपण स्वीकारत असलेल्या कामाबाबत अभ्यासू असणे आवश्यक आहे. एखादे पात्र उत्तम पद्धतीने साकारून प्रेक्षकांसमोर सादर करता येईल, याचा प्रयत्न सातत्याने माझ्याकडून आजवरच्या भूमिकांच्या माध्यमातून झाला आहे. शिवाय मी आणि स्वप्निल दिग्दर्शकाला अपेक्षित असणाऱ्या दुष्टिकोनातून अभिनय करणारे अभिनेते असल्याने त्यांनी दिलेल्या सूचनांचे नेहमी पालन करतो. कारण दिग्दर्शकच खऱ्या अर्थाने चित्रपटाचा पडद्यामागील नायक असतो. चित्रपटाप्रमाणेच स्वप्निल आणि माझे खऱ्या आयुष्यात पिता-पुत्राचे वेगळे नाते आहे. मात्र ते सकारात्मक आहे. त्यामुळे ‘रणांगण’ चित्रपटात परस्परविरोधी भूमिका असूनही त्या सक्षमपणे साकारताना खऱ्या आयुष्यातील नात्यामध्ये असलेल्या समजूतदारपणाचा उपयोग झाला. माझ्या मते भूमिका कोणतीही असो, तुम्ही त्याला कितपत न्याय देता हे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच इतके वर्ष नायक म्हणून काम केल्यानंतर प्रेक्षकांनी ‘कटय़ार काळजात घुसली’ मधील माझ्या खल भूमिकेला पसंती दिली. स्वप्निलसाठी ‘रणांगण’मधील भूमिका त्याच्या अभिनयक्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा आहे. सध्या प्रसिद्ध झालेल्या प्रोमोच्या माध्यमातून स्वप्निलच्या दिसण्याबाबत बऱ्याच चर्चा होत आहेत. मात्र केवळ दिसण्यामुळे नाही तर त्याने तेवढय़ाच ताकदीने भूमिकेला न्याय दिल्यामुळे ते पात्र खुलून आले आहे. शिवाय आम्हा दोघांमधील संवादाची जुगलबंदीही सिनेमाचे आकर्षण असणार आहे.    – सचिन पिळगावकर

 

चांगला माणूस वाईट वागला की त्रास होतो..

मी प्रत्येक वेळी जे काम करतो त्याला नेहमीच उत्तम मानतो. माझ्या मागे निर्माण झालेले ‘चॉकलेट हिरो’चे वलय मी निर्माण केलेले नसून ती प्रेक्षकांनी दिलेली दाद आहे. त्यामुळे ‘रणांगण’मध्ये नकारात्मक पात्र साकारल्यामुळे त्या प्रतिमेला धक्का बसेल याची भीती वाटत नाही. कारण अभिनेता म्हणून घडवताना सचिन पिळगावकर यांनी मला वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास दिला आहे. त्यामुळे प्रत्येक भूमिका साकारताना त्यांनी दिलेल्या शिकवणीचे तंतोतंत पालन माझ्या हातून घडत असते. अभिनयाच्या क्षेत्रात काम करताना या टप्यावर मला काहीतरी चौकटीबाहेरचे मात्र, ताकदीचे करण्यात रस होता. त्यामुळे दिग्दर्शक राकेश सारंग यांनी ‘रणांगण’ मधील नकारात्मक भूमिका साकारण्याचा आग्रह धरला. त्यावेळी मानवी स्वभावदेखील नकारात्मक वृत्तीचा असतो, हा विचार करून या भूमिकेला होकार दिला. खलनायकी भूमिका हा प्रेक्षकांना धक्का आहेच मात्र गिमिक म्हणून ते वापरलेले नाही तर कथानकाची ती गरज असल्याने ती भूमिका स्वीकारली. मुळात नकारात्मक वृत्तीचा माणूस वाईट वागल्यानंतर आपल्याला काही वाटत नाही. मात्र चांगल्या माणसाने वाईट वागण्यास सुरुवात केल्यावर आपल्याला त्याचा त्रास होतो. नायकाला काही बंधने असतात, परंतु खलनायकाला कोणत्याही प्रकारच्या नैतिकतेचं बंधन नसतं. त्यामुळे ही भूमिका माझ्या दृष्टीने आत्यंतिक महत्त्वाची होती. शिरीष लाटकर यांनी संवाद लिहिले आहेत. प्रत्येक संवादाला एक विशिष्ट प्रकारचे वलय देण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे.     – स्वप्निल जोशी

 

उत्तम चित्रपट करावा या हेतूनेच दिग्दर्शनाकडे वळलो

मालिकांनंतर चित्रपटाच्या दिग्दर्शकाकडे वळत असताना केवळ कारकीर्दीमध्ये चित्रपट केला, या दृष्टिकोनामधून मिरविण्यापेक्षा चांगला आणि उत्तम चित्रपट करावा, याकडे माझा कल होता. शिवाय स्वप्निलसोबत अनेक मालिकांमध्ये काम केल्यामुळे त्याच्या अभिनयाच्या ताकदीविषयी कल्पना होती. त्यामुळे त्याला ‘चॉकलेट हिरो’च्या प्रतिमेमधून बाहेर काढण्याच्या उद्देशाने मी त्याच्यापाशी खल भूमिका साकारण्याचा आग्रह धरला. शिवाय ‘रणांगण’मधील खल भूमिकेसाठी मी कोणत्याही खलनायक साकारलेल्या अभिनेत्याची निवड करु शकलो असतो. मात्र प्रेक्षकांना स्वप्निलला या भूमिकेतून पाहणं हा मोठा धक्का असणार आहे, या धक्कातंत्राचा वापर करण्याच्या दृष्टिकोनातूनच त्याची या चित्रपटातील भूमिकेसाठी निवड करण्यात आली.   – राकेश सारंग, दिग्दर्शक 

 

वेगवेगळ्या भूमिका करायच्या आहेत

रणांगण चित्रपटाच्या माध्यमातून प्रथमच चित्रपट क्षेत्रात प्रवेश करते आहे. मात्र पहिल्याच चित्रपटात नेहमीच्या गोड गोड नायिकांपेक्षा वेगळी नायिका साकारण्याची संधी मिळाली. त्यातूनही सचिन पिळगावकर आणि स्वप्निलसारख्या मोठय़ा कलाकारांसोबत काम करण्याची संधीदेखील मिळाली. ‘रणांगण’ मध्ये साकारलेली नायिका साधी आणि ग्रामीण भागातील मुलगी आहे. त्यामुळे लग्नानंतर तिच्या आयुष्यात कोणते बदल घडतात याची रंगत प्रेक्षकांना पहायला मिळेल. भविष्यात वेगवेगळ्या भूमिका साकारायला मग ते व्यावसायिक चित्रपटातील गाणी गाणारी, नाचणारी नायिका असली तरी ती भूमिकाही करायला नक्की आवडेल.   – प्रणाली घोगरे, अभिनेत्री.

 

बालकलाकार म्हणून प्रेक्षकांच्या मनात अजूनही आहोत!

सचिन पिळगावकर आणि स्वप्निल जोशी या दोन्ही कलाकारांमधील मोठं साम्य म्हणजे हे दोघेही यशस्वी बालकलाकार आहेत. बालकलाकार मोठेपणी नायक-नायिका म्हणून सहजी यशस्वी होताना दिसत नाहीत. हे दोघेही त्याला अपवाद ठरले. त्यांनी चॉकलेट बॉय म्हणून आपली प्रतिमाही लोकांच्या मनात रुजवली. बालकलाकार ते अभिनेता या यशस्वी स्थित्यंतरामागचं कारण स्पष्ट करताना  प्रेक्षकांच्या मनामध्ये आमच्या बाल भूमिकांची छबी आजही टिकून असल्याने आम्ही यशस्वी आहोत, असे मत सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केले. आमच्यामधला हा बालकलाकार जिवंत असेपर्यंत प्रेक्षकांच्या मनात राहणार असल्याचे ते म्हणाले. या संपूर्ण प्रवासात मला आणि स्वप्निलला प्रेक्षकांचे प्रेम सातत्याने मिळते आहे. कारण त्यांनी आम्हाला घडताना पाहिल्यामुळे त्यांचे प्रेम आमच्यावर टिकून राहिले. मात्र या प्रवासात फक्त चाहत्यांचे प्रेम नाही तर कुटुंबाने दिलेले संस्कार आणि त्यांच्या मूल्यांचे महत्त्व मोलाचे आहे. आम्ही त्या संस्कारांचा विसर पडू दिलेला नाही, असेही त्यांनी सांगितले.

संकलन – अक्षय मांडवकर,  छाया – संतोष परब