जाई जोशी आणि ‘व्हिडीओ पॅलेस’ यांची प्रस्तुती असलेला आणि वैभव तत्त्ववादी, प्रार्थना बेहेरे यांच्या जोडीचा ‘व्हॉट्सअ‍ॅप लग्न’ हा चित्रपट येत्या १६ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘ओ माय गॉड’, ‘तेरे नाम’, ‘वॉन्टेड’ या हिंदी चित्रपटांचे सिनेमॅटोग्राफर सेतू श्रीराम यांनीच ‘व्हॉट्सअ‍ॅप लग्न’चे छायाचित्रण केले असून या चित्रपटाद्वारे ते मराठी रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहेत. सध्याच्या धावपळीच्या आणि स्मार्ट तंत्रज्ञानाच्या युगात परस्पर नातेसंबंधांमधील बंध अधिकाधिक कशा प्रकारे घट्ट करता येतील, ते या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न निर्माते आणि दिग्दर्शक विश्वास जोशी यांनी केला आहे. चित्रपटाच्या निमित्ताने विश्वास जोशी आणि वैभव, प्रार्थना यांच्याशी साधलेला संवाद..

सध्याचे युग हे माहितीच्या महाजालाचे, संगणक, टॅब, आयपॅड, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, स्मार्ट भ्रमणध्वनी आणि त्यावरील ‘व्हॉट्सअ‍ॅप’चे आहे. काही अपवाद वगळले तर आपल्या प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट भ्रमणध्वनीवरील ‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या संदेशांच्या देवाणघेवाणीने होत असतो. हातात आलेल्या या स्मार्ट भ्रमणध्वनीमुळे प्रत्येकजण त्यातच डोके आणि डोळे खुपसून बसलेला असतो. विविध ‘सामाजिक माध्यमे’ आणि या ‘व्हॉट्सअ‍ॅप’मुळे घराघरांतील, आपापसातील आणि परस्पर नात्यांमधील संवाद कुठेतरी कमी होत चाललाय किंवा हरवला आहे. आपली सध्याची संपूर्ण जीवनशैली आणि नातेसंबंध या स्मार्ट भ्रमणध्वनीने आणि तंत्रज्ञानाने आपल्या कवेत घेतले आहेत. ‘व्हॉट्सअ‍ॅप लग्न’हा चित्रपट याच बदललेल्या सामाजिक, कौटुंबिक नातेसंबंधांवर भाष्य करतो.

‘नटसम्राट’ या चित्रपटाच्या निर्मिती आणि अन्य प्रक्रियेत जवळून सहभागी असलेले विश्वास जोशी यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. ‘व्हॉट्सअ‍ॅप लग्न’च्या निर्मितीविषयी बोलताना जोशी म्हणाले, ‘नटसम्राट’ चित्रपटाच्या वेळेस या चित्रपटाची संकल्पना डोक्यात होती. नाटककार अभिराम भडकमकर आणि मी कथा लिहिली. महेश मांजरेकर यांच्याशीही चित्रपटाविषयी चर्चा केली होती. चित्रपटात वैभव आणि प्रार्थना हीच जोडी असावी असे काही पहिल्यापासून ठरलेले नव्हते. पण चित्रपटाची संहिता लिहून पूर्ण झाली आणि चित्रपटाच्या कथेनुसार ज्या जोडीची ‘केमिस्ट्री’ खूप चांगली जमली आहे, अशीच जोडी चित्रपटासाठी घ्यायची हे आम्ही ठरविले आणि मग वैभव-प्रार्थना या दोघांची निवड मुख्य भूमिकांसाठी केली. या जोडीने याआधी ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘ मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस सदाचारी’ या दोन चित्रपटांत काम केलेल्या या जोडीचे प्रेक्षकांनीही स्वागत केले. त्यामुळे या दोघांची निवड केली. अन्य भूमिकांमध्ये विक्रम गोखले, वंदना गुप्ते, विद्याधर जोशी, ईला भाटे हे मातब्बर आणि अन्य कलाकार आहेत.

चित्रपटाच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप लग्न’ या नावाविषयी विचारले असता त्यांनी सांगितले, आपले सध्याचे आयुष्य हे ‘व्हॉट्सअ‍ॅप’मय झाले आहे. लग्न झालेल्या आजच्या तरुण जोडप्यांची किंवा रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या जोडीची कथा, त्यांच्यातील परस्पर नातेसंबंध आणि आजच्या नात्याची, त्यांच्या लग्नाची गोष्ट वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेक्षकांना आणि आजच्या तरुणाईला चित्रपटाकडे वळवून घ्यायचे असेल तर चित्रपटाचे शीर्षक आकर्षक आणि त्यांना आपले वाटेल असेच असायला हवे. आधी काही दोन-चार नावे सुचली होती पण त्यापेक्षा ‘व्हॉट्सअ‍ॅप लग्न’ हे नाव अधिक आकर्षक वाटले आणि तेच नक्की केले.

मला हा चित्रपट ‘वेगळं व्हायचंय मला’ या पद्धतीने करायचा नव्हता. आजचे जीवन धावपळीचे आणि स्मार्ट तंत्रज्ञानाच्या आहारी गेले आहे हे सगळेच मान्य करतात. प्रश्न हा आहे की हे स्मार्ट तंत्रज्ञान आपल्याला वापरते की आपण हे स्मार्ट तंत्रज्ञान वापरतो हे सांगण्यावर तसेच या बदलत्या परिस्थितीत परस्पर नाती, नातेसंबंध कसे असले पाहिजेत, ते कसे टिकवले पाहिजेत याबद्दल सांगायला हवे, असा माझा विचार होता. ‘नटसम्राट’च्या निर्मितीत आणि अन्य संबंधित प्रक्रियेत जवळून सहभागी झाल्यामुळे दिग्दर्शन करू शकेन असा विश्वास वाटला आणि प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे असे वाटले. निर्माता म्हणून चित्रपटाच्या आशयाबाबत जो विचार केला होता तो पडद्यावर प्रत्यक्ष उतरवण्यासाठी अखेर मीच दिग्दर्शन करण्याचे ठरवल्याचे जोशी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले.

हा चित्रपट मला भावनिक नाटय़ (मेलोड्रामा) ही करायचे नव्हते किंवा कोणताही संदेश प्रेक्षकांना द्यायचा नव्हता. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षागृहातून बाहेर पडताना प्रेक्षकांनी मनोरंजनातून काही विचार घेऊन बाहेर पडावे, तसेच चित्रपट पाहताना त्याची कथा, प्रसंग प्रत्येकाला कुठेतरी आपले आणि आपल्या आयुष्याशी निगडित आहेत, असे सर्व वयोगटातील प्रेक्षकांना वाटले पाहिजे असा आमचा उद्देश आणि प्रयत्न होता असेही जोशी म्हणाले.

मराठी चित्रपटांचा प्रेक्षक चोखंदळ आणि सुजाण आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, त्याचे सादरीकरण या प्रत्येक बाबतीत तो अचूक निवड करतो. हिंदी आणि इंग्रजी चित्रपटही आजचा प्रेक्षक पाहात असल्याने मराठी चित्रपटाचे सादरीकरण गुणवत्तेबरोबरच तांत्रिकदृष्टय़ाही सरस असावे, अशी त्यांची अपेक्षा असते. त्यांना नक्कलही आवडत नाही. त्यामुळे सर्व प्रकारे हा चित्रपट उत्तम होईल, अशी काळजी आम्ही घेतली असल्याचेही जोशी यांनी सांगितले.

‘फिनक्राफ्ट मीडिया अ‍ॅण्ड एन्टरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड’च्या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटाची पटकथा, संवादलेखन मिताली जोशी, अश्विनी शेंडे यांनी केले आहे.

अश्विनी शेंडे आणि क्षितिज पटवर्धन यांनी लिहिलेल्या गाण्यांना नीलेश मोहरीर, ट्रॉय-आरिफ यांनी संगीतबद्ध केले असून हृषीकेश रानडे, निहीरा जोशी-देशपांडे, केतकी माटेगावकर, श्रुती जोशी यांनी ती गायली आहेत. चित्रपटाच्या निर्मिती आणि विपणन-प्रसिद्धीसाठी  नानूभाई सिंघानी यांचे सहकार्य मिळाले आहे.

‘आजच्या पिढीचा चित्रपट’

‘व्हॉट्सअ‍ॅप लग्न’ या चित्रपटात मी ‘अनन्या’ ही भूमिका साकारली आहे. ‘अनन्या’ ही एक अभिनेत्री असून केवळ पैसा मिळवण्यासाठी नाही तर अभिनयाची आवड म्हणून ती हे काम करत आहे. ती एका तरुणाच्या प्रेमात पडते आणि त्यांचे लग्न होते. लग्नानंतर तिच्या जबाबदाऱ्या पूर्णपणे बदलतात. करिअरलाच महत्त्व देणारे पती-पत्नी असतील तर त्यांच्या आयुष्यात काय अडचणी येतात, परस्पर नातेसंबंधांत कसा फरक पडतो, या सगळ्यातून त्यांच्यातील आणि कुटुंबातील नात्यात काय काय घडते त्याचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले असल्याचे प्रार्थना बेहेरे यांनी सांगितले.  मी आणि वैभव आम्ही दोघांनीही या आधी दोन चित्रपटांतून काम केले आहे. त्यामुळे आधीच्या दोन चित्रपटांप्रमाणेच आमच्या जोडीचा हा नवा चित्रपटही प्रेक्षकांना आवडेल. चित्रपट पाहताना त्यातील काही प्रसंग आपल्याही आयुष्यात घडले असल्याचा अनुभवही प्रेक्षकांना येईल, प्रेक्षक आपले स्वत:चे आयुष्य चित्रपटात पाहतील, असा विश्वासही प्रार्थनाने व्यक्त केला.

‘प्रत्येक पिढीची कथा..’

‘व्हॉट्सअ‍ॅपलग्न’ हा चित्रपट मनोरंजनाबरोबरच हसता हसता डोळ्यात पाणी आणणारा आणि विचार करायला  लावणारा आहे. चित्रपटाची कथा केवळ आजच्या तरुणाईची, तरुण जोडप्यांची नाही तर प्रत्येक पिढीची कथा असल्याचे वैभव तत्ववादी म्हणाला. प्रार्थना आणि आपल्या रुपेरी पडद्यावर जमलेल्या जोडीविषयी बोलताना,  प्रेक्षकांनी दोघांच्या जोडीला पसंती दिली आहे. आमच्या दोघांमध्ये चांगली मैत्री असून अभिनयाची शैलीही परस्परांना जुळणारी आहे. पडद्यामागे आणि रुपेरी पडद्यावरही आमच्या या मैत्रीचा चांगला दृश्य परिणाम प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळत असल्याचे वैभवने सांगितले. ‘चित्रपटात मी ‘आकाश प्रधान’ ही भूमिका केली आहे. आयटी कंपनीत काम करणारा आजच्या पिढीचा हा प्रतिनिधी आहे. त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध विचार, स्वभाव असलेली मुलगी त्याच्या आयुष्यात येते. दोघांचे लग्नही होते. हा चित्रपट त्या दोघांच्या लग्नाआधीच्या आणि लग्नानंतरच्या नातेसंबंधांवर तसेच कुटुंबातील अन्य नात्यांशी निगडित आहे, अशी माहितीही त्याने दिली.