13 December 2017

News Flash

‘नैराश्यातून बाहेर येण्यासाठी विजय तेंडुलकरांची मदत झाली’

नैराश्य ही दुसऱ्याची जबाबदारी नसून, स्वत:ची जबाबदारी आहे.

ऑनलाइन टीम | Updated: April 11, 2017 4:16 PM

अभिनेत्री अमृता सुभाष

‘किल्ला’, ‘श्वास’ हे चित्रपट आणि ‘ती फुलराणी’सारख्या दमदार नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री अमृता सुभाष आता खडूस आईच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आगामी ‘६ गुण’ या चित्रपटातून ती पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. ‘लोकसत्ता लाइव्ह चॅट’च्या माध्यमातून अमृताने प्रेक्षकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. ‘६ गुण’मधील आईकडे पाहिल्यास ‘अशी आई नसावी असेच अनेकांना वाटेल,’ असे म्हणत तिने आजचे पालक मुलांवर स्वतःच्या अपेक्षा लादून त्यांच्या नैराश्याला कारणीभूत ठरत असल्याचे म्हटले. यावेळी प्रेक्षकांच्या विविध प्रश्नांची उत्तरं देत अमृताने सर्वांशी दिलखुलासपणे संवाद साधला.

अमृताने चित्रपट, रंगमंच आणि टेलिव्हिजन या तिन्ही माध्यमांमध्ये आपली छाप उमटवली आहे. त्याचसोबत ती उत्तम लेखिका असून, तिला वाचनाची देखील आवड आहे. या अनुषंगाने एका चाहत्याने तिला सध्या कोणते पुस्तक वाचत आहेस? असा प्रश्न विचारला. यावर अमृताने तिचा आगामी चित्रपट ज्या विषयावर भाष्य करतो त्याच विषयावरील ‘गर्ल इंट्रप्टेड’ हे पुस्तक वाचत असल्याचे सांगितले. ती म्हणाली की, ‘मी सध्या ‘गर्ल इण्ट्रप्टेड’ (girl interrupted) पुस्तक वाचतेय. हे पुस्तक मनोरुग्णालयातून परतलेल्या सुझान नावाच्या मुलीने लिहिले आहे. या पुस्तकातून मी अनेक मानसिक रुग्णांच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करते आहे. आपण शारीरिक आरोग्यावर लक्ष देतो पण मानसिक आजाराकडे बहुतेकदा दुर्लक्ष करतो. पण, मानसिक आजाराकडे दुर्लक्ष करणे ही खूप गंभीर बाब आहे.’

आताच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये अमृताचे नाव घेतले जाते. पण आज यशाच्या शिखरावर असलेली ही अभिनेत्री एकेकाळी नैराश्याला सामोरं गेली होती. याविषयी सांगताना ती म्हणाली की, ‘नैराश्य हा मनाचा आजार आहे. याचा पैसा, करिअर, यश याच्याशी कोणताही संबंध नाही. दीपिका पदुकोण यशाच्या शिखरावर असताना मानसिक आजाराची शिकार झाली होती. नैराश्य ही दुसऱ्याची जबाबदारी नसून, स्वत:ची जबाबदारी आहे. त्यामुळे मनाच्या आजारावर उपचार घेणंच हिताचे आहे.’ नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी मला विजय तेंडुलकरांची मदत झाल्याचे सांगत यासाठी मी आयुष्यभर त्यांची ऋणी राहिन, असेही ती म्हणाली.

आगामी चित्रपटाविषयी अमृता म्हणाली, “सध्या स्पर्धेच्या युगात मुलांच्या आवडी निवडी पालक ठरवताना दिसतात. यामुळे मुलांवर चांगले गुण मिळविण्याचे दडपण असते. ‘६ गुण’मध्ये मी ‘सरस्वती सरोदे’ नावाची भूमिका साकारली आहे. केवळ सहा गुण कमी मिळाल्याने सरस्वतीची काही स्वप्न अपुरी राहतात. त्यामुळे स्वतःची अपूर्ण राहिलेली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी ती मुलाला आपल्या बंधनाच्या जाळ्यात अडकवते. ‘किल्ला’ या चित्रपटात माझ्या मुलाला इतर मुलांमध्ये मिसळण्याचा सल्ला देणारी मी या चित्रपटात एकटे राहण्याचा सल्ला देताना दिसेल. ही एका अर्थाने माझी नकारात्मक भूमिकाच आहे. त्यामुळे ‘किल्ला’ चित्रपटानंतर अशी आई असावी म्हणणारे प्रेक्षक या चित्रपटातील माझ्या भूमिकेनंतर अशी आई नसावी, असे नक्कीच म्हणतील’  अमृताचा ‘६ गुण’ चित्रपट येत्या १४ एप्रिलला प्रदर्शित होतो आहे. यात सुनील बर्वे तिच्या पतीची भूमिकेत दिसतील. ‘किल्ला’नंतर बालकलाकार अर्चित देवधर पुन्हा एकदा अमृताच्या मुलाची भूमिका साकारताना दिसेल.

First Published on April 11, 2017 4:16 pm

Web Title: loksatta live chat marathi actress amruta subhash shares her depression experiences