महाविद्यालयीन वयातच रंगभूमीचे संस्कार तरुणांवर होण्यासाठी नाटकाची जाण असलेल्या अनेक संस्था एकांकिकेच्या माध्यमातून अभिनयाची पिढी घडवण्याचे काम कसोशीने करत आहेत. नाटकाची आवड असलेले अनेक ध्येयवेडे तरुण या एकांकिकेच्या पायऱ्या चढतात आणि भविष्यात यशस्वी कलाकार होतात. चार वर्षांपूर्वी ‘लोकसत्ता’ने हे स्वप्न पाहिले. एकांकिका स्पर्धेविषयी तरुणांची असलेली आत्मीयता, त्यांचे विचारविश्व, कलेविषयीचा असलेला जिव्हाळा हे सर्व उत्साहाने भारलेले वातावरण लोकसत्ताला प्रत्यक्ष अनुभवायचे होते. तरुणांच्या या अभिनय क्रियेचे कौतुक करतानाच दाद द्यायची होती त्यांच्या जिद्दीला, मेहनतीला. या विचारातूनच साकारली गेली ‘लोकसत्ता लोकांकिका आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा.’ गेल्या चार वर्षांत या स्पर्धेमुळे अनेक तरुण रंगकर्मी लोकसत्ताशी जोडले गेले. रंगभूमीवरच्या दिग्गजांचे तरुण स्पर्धकांना मार्गदर्शन लाभले. सादरकर्त्यांच्या भूमिकेत असणाऱ्या ‘लोकांकिका’ स्पर्धेने एक प्रेक्षक म्हणून लोकसत्ता परिवाराला प्रत्येक वर्षी काहीतरी नवा विचार दिला. ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेचा यंदाचा पडदा लवकरच उघडणार असून या उपक्रमाशी सातत्याने जोडलेल्या काही रंगभूमीवरील कलाकारांनाही ही स्पर्धा आपलीशी वाटते.

‘लोकसत्ता’सारख्या नाटय़बाह्य़ संस्थेचे प्रोत्साहनकार्य महत्त्वाचे’ : चंद्रकांत कुलकर्णी

‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेला महाराष्ट्रात खूप मोठी ओळख मिळाली आहे. महाविद्यालयीन पातळीवर ही स्पर्धा असल्याने तीन ते चार वर्षांच्या सातत्यानंतर संबंधित शहरात कलाकार, दिग्दर्शकांचा एक समूह तयार होतो. गेल्या वर्षी या स्पर्धेत विजयी ठरलेल्या एकांकिकेचे दिग्दर्शक ऋषी मनोहर, समीर देव यांनी खूप चांगल्या पद्धतीची चळवळ पुण्यात राबवली आहे. मुंबईतही असेच कलाकार एकत्रित काम करत आहेत. महाविद्यालयीन एकांकिकेच्या वयात तरुणांना घडता येते. चुकांमधून शिकता येते. ‘लोकसत्ता’सारखी नाटय़बाह्य़ संस्था तरुण रंगकर्मीना प्रोत्साहन देत आहे, हे या स्पर्धेचे वैशिष्टय़ आहे. तरुणांमध्ये रंगजाणीव व्हावी याची जाणीव ‘लोकसत्ता’ समूहाला आहे. यासाठीच एकांकिका, वक्तृत्व यासारख्या स्पर्धा ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित करण्यात येतात. महाराष्ट्रात वेगवेगळ्या केंद्रांवर ही स्पर्धा होत असल्याने दोन ते तीन महिने या स्पर्धेचे वातावरण निर्माण होते. महाअंतिम फेरीत कोल्हापूर, औरंगाबाद, पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक यासारख्या केंद्रातून येणारी तरुणांची कला पाहायला मिळत असते. या वेगवेगळ्या ठिकाणांमधील लेखक, दिग्दर्शक विषयावर कसा विचार करतात याचा अंदाज येतो. या अर्थाने हा उपक्रम मला महत्त्वाचा वाटतो. गांभीर्याचा वाटतो. या स्पर्धेशी पहिल्या वर्षांपासून मी सातत्याने जोडलो आहे. या स्पर्धेत सहभागी होणारे कलाकार, लेखक, दिग्दर्शक यांच्याशी मी चर्चा करत असतो. मला बक्षिसासाठी योजलेले काम आवडत नाही. एकांकिका सादरीकरणातील कच्चेपणा मला भावतो. सादरीकरणातील चटपटीतपणा आवडत नाही. या चटपटीतपणापेक्षा लिखाणातील, अभिनयातील, दिग्दर्शनातील समज वाढली पाहिजे. ही समज गेल्या चार वर्षांच्या स्पर्धामधील कलाकार, लेखक, दिग्दर्शकांमध्ये वाढताना दिसते. एखाद्या वर्षी सादर केलेल्या एकांकिका पुढच्या वर्षी पाहताना त्यात बदल जाणवतो. वेगळ्या पद्धतीने सादरीकरणाचा प्रयत्न दिसतो. दरवर्षी हा बदल जाणवतो. प्रत्येक वर्षी एखादी एकांकिका नव्याने प्रगल्भ होणार किंवा नवखे कलाकारही असणार. इथे कनिष्ठ आणि वरिष्ठ ही तफावत राहात नाही. पहिल्यांदाच एकांकिका सादर करणारे अतिशय आत्मविश्वासाने कला सादर करत असतात, ही कौतुकाची बाब आहे. एखादा नवीन विचार ऐकायला मिळणे, पाहायला मिळणे हे एकांकिकेचे यश आहे. एखादा विषय घेऊन प्रेक्षकांना ४५ मिनिटे खिळवून ठेवण्याचे कसब एकांकिका सादरीकरणात असते. यासाठीच एकांकिका ही लहान प्रयोगशाळा आहे.

‘लोकसत्ता लोकांकिका’मुळे स्पर्धा जिंकण्याची जिद्द मुलांमध्ये निर्माण झाली’ -अजित भुरे

गेली चार वर्ष मी ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा वेगवेगळ्या भूमिकेतून अनुभवतो आहे. त्यांना या स्पर्धेसाठी मार्गदर्शन करण्याच्या निमित्ताने, कार्यशाळेच्या निमित्ताने त्यांच्याशी संवादही साधला आहे. या स्पर्धेबद्दल मुलांमध्ये कायम उत्सुकता दिसून आली आहे. दरवर्षी नवीन काहीतरी करायचं आणि त्यातून नवं काही शिकायचं यासाठी हे विद्यार्थी उत्सुक असतात. त्यांची एकांकिका चांगली व्हावी, यासाठीही ते सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. दर्जेदार एकांकिका करण्याचा त्यांचा ध्यास आणि सततचे प्रयत्न यामुळे गेल्या चार वर्षांत त्यांच्या एकांकिकांमध्ये, त्यांच्या विचारांमध्ये, कामामध्ये प्रगती दिसून आली आहे. कुठलीही स्पर्धा जिंकण्यासाठी मुळात तुमच्याकडे जिद्द असावी लागते. ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा जिंकण्याची जिद्द आता या मुलांमध्ये निर्माण झाली आहे. वेगवेगळे जॉनर विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये दिले आहेत. मला ‘ओवी’ ही एकांकिका खूप आवडली होती. पूर्णपणे वेगळा असा प्रयोग होता तो. एकांकिकांसाठी विषय निवडतानाही त्यांनी त्यामागे केलेले विचार जाणवल्याशिवाय राहात नाहीत. गेल्या वर्षी पुण्यातील महाविद्यालयाने सादर केलेल्या एकांकिकेचा विषय महत्त्वाचा होता. एकांकिकांमधलं वेगळेपण, विषयांची जाणीवपूर्वक केलेली निवड आणि त्याची वैचारिक पद्धतीची मांडणी हे फक्त मुंबई-पुण्यातील विद्यार्थ्यांपुरतं मर्यादित नाही. मला नाशिकमधल्या एकांकिका खूप आवडल्या. त्यांचे विषय वेगवेगळे होते. नागपूरच्या एकांकिकांसाठीही तिथल्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली होती. अर्थात, नागपूर किंवा अन्य लांबच्या शहरातील महाविद्यालयीन विद्यर्थ्यांच्या एकांकिका संख्येने कमी असतील पण गुणवत्तेत ते कमी पडत नाहीत. ज्या महाविद्यालयीन तरुणांना खरोखरच नाटय़ क्षेत्रात काही करायचे आहे, त्यांच्यासाठी ‘लोकसत्ता लोकांकिका’ हे निश्चितच मोठे व्यासपीठ आहे. ‘लोकसत्ता’सारख्या वर्तमानपत्राच्या व्यासपीठावर त्यांच्या एकांकिका सादर करायची संधी त्यांना मिळते. तुमच्या एकांकिका जाणकारांकडून पाहिल्या जातात. त्यांना प्रसिद्धी मिळते. त्यांचे काम कसे झाले हेही ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचते. यापेक्षा मोठं व्यासपीठ विद्यार्थ्यांसाठी असूच शकत नाही. एक नाटय़ व्यावसायिक म्हणून प्रेक्षक अजूनही नाटकांकडे येत नाहीत ही माझी खंत आहे. मराठी नाटकांनी चौकटीपलीकडे गेले पाहिजे. नाटकांचा जुना प्रेक्षकवर्ग अजूनही येतो. पण नवीन किंवा तरुण प्रेक्षकवर्ग नाटकांना येत नाही. त्यांना नाटय़गृहापर्यंत आणण्याच्या दृष्टीने ही मुलं एकांकिकांमधून यावर्षी नवीन काय घेऊ न येतायेत, याबद्दल मला कुतूहल आहे.