महाविद्यालयीन तरुणाईच्या विश्वात आपला स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची महाअंतिम फेरी विद्यार्थ्यांच्या सळसळत्या उत्साहात आणि रसिक प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात शनिवारी माटुंगा येथील यशवंत नाटय़ मंदिरात पार पडली.

सकाळी साडेनऊ वाजता सुरू झालेल्या या स्पर्धेसाठी उपस्थितांनी सकाळी सातपासूनच रांगा लावल्या होत्या. यात केवळ मुंबईकरच नव्हे तर ठाणे, पुणे आणि नाशिककरही मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. कोणतेही नावाजलेले   कलावंत नसतानाही महाविद्यालयीन तरुणांचा कलाविष्कार पाहण्यासाठी झालेली ‘हाऊसफुल्ल’ गर्दी मराठी मनाच्या रसिकतेची आणि ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेने महाविद्यालयीन तसेच रसिकांच्या मनात मिळविलेल्या लोकप्रियतेची मोठी पावतीच होती.

या महाअंतिम सोहळ्यात ज्याप्रमाणे स्पर्धक संघाला सादरीकरणाची उत्कंठा असते त्याचप्रमाणे उपस्थितांमध्ये एकांकिका पाहण्याची प्रचंड उत्कंठा दिसली. सकाळी सातपासून लागलेल्या रांगा आणि सर्व वयोगटांतील दर्दीची झालेली ही गर्दी हा सोहळा दिमाखदार होणार याचे संकेत देत होती. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, रत्नागिरी, नागपूर या आठ विभागांतून प्राथमिक आणि विभागीय अंतिम फेरीचे आव्हान पार करत सर्वोत्कृष्ट ठरलेल्या आठ एकांकिकांनी महाअंतिम फेरीत आपल्या सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली.

एकांकिकांच्या सादरीकरणादरम्यान विद्यार्थ्यांची होणारी लगबग, बॅकस्टेजची गडबड आणि कलाकारांच्या धावपळीने यशवंत नाटय़मंदिर गजबजून गेले होते. ‘एकमेका साहाय्य करू’ या  उक्तीचा या स्पर्धेदरम्यान पुरता प्रत्यय आला. वेशभूषा, रंगभूषा, नेपथ्याची ने-आण या सगळ्या कामात महाविद्यालयीन मंडळी एकमेकांना आपापसात असलेली स्पर्धा विसरून मदत करत होती. एकीकडे मनातली धाकधूक शमवण्यासाठी, स्वतत आत्मविश्वास आणि ऊर्जा निर्माण करण्यासाठी हातात हात धरून प्रार्थना म्हटल्या जात होत्या तर काही ठिकाणी आपल्या श्रद्धास्थानाच्या नावाचा जोरदार जयघोष केला जात होता. या सर्व घडामोडीत महाविद्यालयीन तरुणांनी नाटकाची शिस्तही प्रकर्षांने पाळली. आपल्याकडून कुणालाही त्रास होणार नाही याची प्रत्येक जण काळजी घेत होता. तर एकमेकांना कमी पडणाऱ्या सामानाची देवाण-घेवाण करून या तरुण कलाकारांनी खिलाडू वृत्तीही जोपासली. धार्मिक, सामाजिक, कौटुंबिक, पर्यावरण आणि सामजिक विषयांवर चपखल भाष्य करणरया या आठही एकांकिकांनी नव्या विचारसरणीचे विविधांगी दर्शन घडवले. उत्तम अभिनय, प्रकाश योजनेने बहरलेले अवकाश, प्रत्यक्ष सादर केलेले संगीत आणि कल्पनाशक्तीचा कस लावून केलेले नेपथ्य पाहून रसिकवर्ग भारावून गेला. त्यामुळे प्रत्येक एकांकिकेसाठी प्रेक्षकांनी तितक्याच टाळ्या आणि शिटय़ांची दाद दिली.

नवोदित कलाकारांच्या कलागुणांचा आविष्कार पाहण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अभिनेते मकरंद अनासपुरे, भरत जाधव, राजन भिसे, विद्याधर जोशी, अविनाश नारकर, दिग्दर्शक राजेश देशपांडे, चंद्रकांत कुलकर्णी, कुमार सोहनी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, कवयित्री नीरजा, ज्येष्ठ रंगकर्मी कमलाकर सोनटक्के असे अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते.

‘लोकाभिमुख विषय मांडण्याची संधी’

‘लोकसत्ता’तर्फे आयोजित एकांकिका स्पर्धासाठी ‘लोकांकिका’ हे नाव अगदी सूचक आहे. कारण या स्पर्धेतून लोकाभिमुख विषय मांडण्याची संधी तरुणांना मिळते. आजचे समकालीन विषय निर्भीडपणे मांडण्याची संधी येथून उपलब्ध होते. या व्यासपीठाचा युवा पिढी उत्तमरीत्या वापर करत आहे. राज्याच्या आठ केंद्रांवरून विद्यार्थी येतात. विविध विषय मांडतात, नव्या शक्यता शोधतात ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणूनच मी सलग सहा वर्षे लोकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला आवर्जून उपस्थित राहतो.

-अविनाश नारकर

‘एकांकिकांचा उत्सव’

गेल्या चार ते पाच वर्षांपासून ‘लोकांकिका’ स्पर्धेच्या लोकप्रियतेबद्दल ऐकले आणि वाचले असल्याने राज्यभरातील महाविद्यालयांच्या एकांकिका पाहण्याची उत्सुकता होती. परंतु काही कारणाने यापूर्वी ‘लोकांकिका’ स्पर्धेस उपस्थित राहता आले नव्हते. महाविद्यालयीन स्तरावरील ही स्पर्धा म्हणजे एकांकिकांचा उत्सवच आहे. मी अशाच एकांकिका स्पर्धातून व्यावसायिक नाटकांकडे वळल्याने यातील वातावरण माझ्या परिचयाचे आहे. आज रंगभूमीवर जे यशस्वी अभिनेते आहेत त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात अशाच एकांकिका स्पर्धेतून झाल्याने ही स्पर्धा मला महत्त्वाची वाटते. त्यामुळे आज वेळात वेळ काढून मी महाअंतिम फेरीसाठी उपस्थित राहिलो आहे.

-भरत जाधव

‘सामाजिक विषयांवर सडेतोड भाष्य’

‘लोकसत्ता’ने हे फार महत्त्वाचे रंगपीठ महाराष्ट्रभरातील तरुण रंगकर्मीना उपलब्ध करून दिले आहे. खुल्या गटासाठीही असे रंगपीठ उपलब्ध करून दिले तर अशा प्रकारच्या रंगकर्मीच्या सोहळ्यातून सामाजिक भाष्य नेमके आणि सूचक होईल. एकांकिका पाहायला इथे मोठी रांग लागली आहे. इतके लोक ही लोकांकिका पाहत आहेत, ही महत्त्वाची गोष्ट आहे. ‘लोकसत्ता’चे फक्त एकांकिकेसाठी नाही तर ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ या उपक्रमासाठीही अभिनंदन करतो. फार सजगपणे माध्यमांनी समाजात उभे राहायला पाहिजे आणि लोकसत्ता ते करत आहे. या स्पर्धेत विद्यार्थी सामाजिक विषयांवर सडेतोड भाष्य करताना दिसत आहेत. काश्मीर प्रश्न, समलैंगिकता आणि अभिव्यक्तीच्या प्रश्नांवर ते भाष्य करत आहेत. आज ते धाडसी काम करत असले तरी उद्या ते जास्त मजबूत होणार आहे, याची मला खात्री आहे.

-मकरंद अनासपुरे

‘सांस्कृतिक महोत्सव’

‘लोकांकिका’ हा एकांकिकेपुरता मर्यादित महोत्सव राहिला नाही. एक सांस्कृतिक महोत्सव म्हणून त्याला महत्त्व प्राप्त होत आहे. नाटक असो वा एकांकिका.. ज्या प्रकारच्या स्पर्धा महाराष्ट्रात होतात तशा संपूर्ण भारतात होत नाहीत. मात्र ‘लोकसत्ता’ने हा उपक्रम उत्तम प्रकारे राबविला आहे. या ‘लोकांकिकां’नी सादरीकरणात, लेखनात नवनवे उच्चांक निर्माण केले आहेत. असे फतवे अधूनमधून निघतात की अमका विषय करू नका, मात्र हा अविश्वास कशासाठी? महाराष्ट्रातील युवक हा प्रतिष्ठित लोकांपेक्षा जास्त जबाबदार आहे या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहा, तेव्हाच तो तुम्हाला काहीतरी नवे देऊ  शकेल.

-कमलाकर सोनटक्के

प्रायोजक : ‘लोकसत्ता’ आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत लोकांकिका स्पर्धा ‘अस्तित्व’च्या सहकार्याने पार पडत आहे. ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘कमांडर वॉटर टेक प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ पावर्ड बाय असलेल्या या स्पर्धेसाठी ‘मे. बी. जी. चितळे डेअरी’ आणि ‘झी टॉकीज’ असोसिएट पार्टनर आहेत. ‘झी टॉकीज’ या स्पर्धेसाठी प्रक्षेपण भागीदारदेखील आहे. तर ‘एबीपी माझा’ न्यूज पार्टनर आहे. लोकांकिकाच्या मंचावरील कलाकारांना चित्रपट-मालिकेत संधी देणारे ‘आयरिस प्रोडक्शन’ टॅलेंट पार्टनर आहेत.