News Flash

सर्जनशील विचारनिर्मितीचे व्यासपीठ

कलाविश्वात नवनिर्मिती ही नेहमीच महत्त्वाची असते. कलेचे माध्यम कोणतेही असो नवीन, सर्जनशील विचारांची निर्मिती आणि त्याची देवाणघेवाण हा त्याचा मूळ गाभा असतो.

| November 16, 2014 06:46 am

कलाविश्वात नवनिर्मिती ही नेहमीच महत्त्वाची असते. कलेचे माध्यम कोणतेही असो नवीन, सर्जनशील विचारांची निर्मिती आणि त्याची देवाणघेवाण हा त्याचा मूळ गाभा असतो. तो यशस्वी ठरला तर ती कलाही यशस्वी ठरते. नाटक आणि चित्रपटांच्या बाबतीत तर हे सातत्याने घडणे आवश्यक असते. नवीन विचार, नवीन कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांची एक पिढी सातत्याने घडत जाते तेव्हाच नाटय़सृष्टीची खुंटी बळकट होते. ही खुंटी बळकट करण्याचे काम नाटय़क्षेत्रात आजवर ‘एकांकिका’ स्पर्धानी केले आहे. ‘लोकांकिका’ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धाच्या माध्यमातून ‘लोकसत्ता’ने सर्जनशील विचारनिर्मितीचे एक नवे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ३० नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि अहमदनगर अशा आठ शहरांमधून या एकांकिका स्पर्धा घेण्यात येणार असून त्यातून सर्वोत्तम एकांकिकेची निवड करण्यात येणार आहे. ‘लोकांकिका’च्या निमित्ताने एकांकिकांच्या व्यासपीठावरून पुढे आलेल्या आणि आज नाटय़क्षेत्रात आघाडी घेतलेल्या कलाकार, दिग्दर्शकांबरोबरच नाटय़निर्मात्यांचाही एकांकिका स्पर्धाकडे बघण्याचा नेमका दृष्टिकोन काय आहे? एकांकिकांकडे रंगभूमीचा पाया म्हणून बघितले जाते का? आणि एकांकिकांमधून व्यावसायिक रंगभूमीला निश्चित कशा प्रकारे फायदा होतो, अशा विविध प्रश्नांची उत्तरे
त्यांच्याच शब्दांत..

मराठी एकांकिका आणि व्यावसायिक रंगभूमी एकमेकांना पुरक
– प्रसाद कांबळी (भद्रकाली प्रॉडक्शन)
गेल्या काही वर्षांपासून स्पर्धामध्ये सादर होणाऱ्या एकांकिका पाहतो आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या या मुलांमध्ये प्रचंड उत्साह आणि ऊर्जा पाहायला मिळते.
वेगवेगळ्या स्पर्धामधून सहभागी झाल्यामुळे या मुलांना सातत्याने बॅकस्टेजपासून ते प्रत्यक्ष रंगमंचावर काम करण्याचा अनुभव मिळतो. यातून ते घडत जातात आणि याचा प्रत्यक्ष फायदा त्यांना पुढे व्यावसायिक रंगभूमीवर काम करताना किंवा दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका, चित्रपट यात काम करताना होतो.
शाळा आणि महाविद्यालयांत असताना या एकांकिका स्पर्धामध्ये सहभागी झाल्यामुळे या मुलांमध्ये आत्मविश्वासही वाढतो. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाच्या एकांकिका स्पर्धा या मुलांची रंगभूमीविषयक जाणीव आणि पाया पक्का करण्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे वाटते.
‘गमभन’, ‘मंजुळा’, ‘ऑल दे बेस्ट’ या सुरुवातीला एकांकिका म्हणूनच सादर झाल्या होत्या. त्यानंतर या एकांकिका व्यावसायिक रंगभूमीवर नाटक म्हणून आल्या. भद्रकाली प्रॉडक्शनतर्फे आम्ही नुकतेच ‘बीपी’हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर सादर केले आहे. हे पहिल्यांदा एकांकिका म्हणूनच सादर झाले होते.   
व्यावसायिक मराठी रंगभूमी आणि एकांकिका या एकमेकांना पूरक असून या एकांकिका स्पर्धा जेवढय़ा जास्त प्रमाणात होतील, तेवढे चांगले आहे. विद्यार्थ्यांमधील चांगली गुणवत्ता नक्कीच पुढे येईल आणि व्यावसायिक मराठी रंगभूमीला कसदार कलाकार, लेखक, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ नक्कीच मिळतील. अशा स्पर्धामुळे मराठी रंगभूमी अधिकाधिक समृद्ध होईल.

तरुणाईच्या विचारांचे प्रतिबिंब उमटेल
– चंद्रकांत कुलकर्णी (दिग्दर्शक)  
एकांकिकांमधून आजच्या तरुणाईच्या मनात नेमके काय चालले आहे, त्यांना कोणते प्रश्न भेडसावतात, ते कसा विचार करतात, एखाद्या विषयावर त्यांची प्रतिक्रिया काय असते, याचे प्रतिबिंब उमटण्यास मदत होते. एकांकिका ही कमी वेळाची असते आणि या कमी वेळात लेखक, दिग्दर्शक, कलाकार यांना व्यक्त व्हावे लागते. सद्य:स्थितीतील वेगवेगळ्या विषयांवर आणि समाजात घडणाऱ्या घटनांवर तरुणाई कशा प्रकारे व्यक्त होते, हे या एकांकिका स्पर्धाच्या निमित्ताने समोर येते.  एकांकिका स्पर्धा हा महाविद्यालयीन जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. विद्यार्थ्यांना आपल्यातील गुणवत्ता सिद्ध करण्यासाठीचे ते एक चांगले व्यासपीठ आहे. व्यावसायिक रंगभूमीवर किंवा दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका, चित्रपट यांमध्य सध्या जे काही आघाडीचे चेहरे दिसतात ते सर्वजण अशा वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धामधूनच पुढे आलेले आहेत. कलाकार, दिग्दर्शक, लेखक म्हणून यापैकी अनेकांनी या माध्यमावर आपली स्वत:ची स्वतंत्र अशी नाममुद्रा उमटविली आहे. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुणाईसाठी एकांकिका स्पर्धा हे एक चांगले व्यासपीठ आहे. रंगभूमी हे लोकशाहीचे प्रतीक आहे. हे कोणा एका व्यक्तीचे काम नाही. इथे जे काही करावे लागते समूहाने करावे लागते. त्यानिमित्ताने तरुणाई एकत्र येते, विचारांची देवाणघेवाण होते. याची सुरुवात एकांकिका स्पर्धामधून होते. समाजात घडणाऱ्या ताज्या परिस्थितीवरील भाष्य किंवा समाजातील सद्य:स्थितीचे प्रतिबिंब एकांकिकांमधून उमटलेले पाहायला मिळते.  

व्यावसायिक रंगभूमीसाठी एकांकिका महत्त्वाच्या
– लता नार्वेकर (ज्येष्ठ नाटय़निर्मात्या)
व्यावसायिक रंगभूमीइतकेच महत्त्व एकांकिकांना आहे. एकांकिकांमधून व्यावसायिक रंगभूमीला उत्तम लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ मिळाले आहेत आणि यापुढेही मिळणार आहेत. त्यामुळे व्यावसायिक रंगभूमीसाठी एकांकिका जगल्याच पाहिजेत. महाविद्यालयीन विद्यार्थी आणि युवा रंगकर्मींसाठी असणाऱ्या या विविध एकांकिका स्पर्धा त्यांच्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ आहे. येथे त्यांना मोलाचा अनुभव मिळतो. स्पर्धेच्या निमित्ताने त्यांना रंगभूमीच्या सर्व बाबींचेही ज्ञान मिळते. अभिनय, दिग्दर्शन, व्यवस्थापन, संगीत, पाश्र्वसंगीत, नेपथ्य, सेट तयार करणे/उभारणे, सेटऐवजी काही प्रतीकात्मक गोष्टींचा वापर करणे ही सर्व कामे ही मुलेच करत असल्याने अशा स्पर्र्धामधून रंगभूमीच्या सर्व अंगांची माहिती आणि अनुभव त्यांना मिळतो.
वेगवेगळ्या स्पर्धांमधून सादर होणाऱ्या एकांकिका पाहण्यासाठी मी आवर्जून जाते. परीक्षक नसले तरीही अशा स्पर्धामधील एकांकिका मला पाहायला आवडतात. यातून विद्यार्थी आणि युवा कलाकारांची तयारी, त्यांच्यातील गुणवत्ता समोर येते.
कोणी विद्यार्थी एकदम महाविद्यालयात जात नाही. नर्सरी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील शिक्षण पूर्ण केल्यानंतरच तो महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकतो.
महाविद्यालयात जाण्यापूर्वी त्याचा शिक्षणाचा पाया या सर्व टप्प्यातून पूर्ण झालेला असतो. त्याचप्रमाणे व्यावसायिक रंगभूमीवर येण्यापूर्वी बालरंगभूमी आणि अशा एकांकिका स्पर्धामधून त्याचा पाया पक्का होत असतो. सुधा करमरकर, रत्नाकर मतकरी, वंदना विटणकर, राजू तुलालवार आदींनी बालरंगभूमीसाठी खूप मोठे काम केले आहे. आजचे अनेक आघाडीचे कलाकार बालरंगभूमीवरूनच पुढे येऊन मोठे झाले आहेत.

एकांकिका हा व्यावसायिक रंगभूमीचा पाया
-भरत जाधव (अभिनेता)
अभिनेता, अभिनेत्री किंवा अन्य रंगभूमीशी संबंधित अन्य क्षेत्रात तसेच व्यावसायिक रंगभूमी, दूरचित्रवहिन्यांवरील मालिका, चित्रपट आदी क्षेत्रांत पुढे यायचे असेल तर त्यासाठी एकांकिका स्पर्धा हा या सगळ्याचा पाया आहे. एकांकिका करताना खूप काही शिकायला मिळते. त्या अनुभवातून विद्यार्थी घडत जातात. मी स्वत: एकांकिका स्पर्धामधूनच पुढे आलो आहे. वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धामधून सातत्याने सहभागी झाल्याने खूप काही शिकायला मिळाले. हा अनुभव समृद्ध करणारा होता.
केवळ अभिनय नव्हे तर सेट कसा तयार करायचा आणि लावायचा इथपासून बॅकस्टेजची सर्व कामे, प्रकाशयोजना, नेपथ्य, दिग्दर्शन, अन्य तांत्रिक बाजू ही सर्व कामे एकांकिका स्पर्धाच्या निमित्ताने सहभागी होणारे विद्यार्थीच करत असतात. त्यामुळे यातून ही मुले तावूनसुलाखून तयार होतात. वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धामधून महाविद्यालयीन विद्यार्थी आणि युवा रंगकर्मीनी मोठय़ा संख्येने सहभागी होणे आवश्यक आहे. अशा स्पर्धामधूनच व्यावसायिक रंगभूमीला आजवर उत्तमोत्तम लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री, प्रकाशयोजनाकार, नेपथ्यकार मिळाले आहेत.

एकांकिका मनापासून कराव्यात
– अंकुश चौधरी (अभिनेता)
एखाद्या इमारतीचा पाया मजबूत असेल तर त्यावर मोठा डोलारा उत्तम प्रकारे उभा राहू शकतो. अगदी तसेच एकांकिकांच्या बाबतीत म्हणता येईल. एकांकिका हा व्यावसायिक रंगभूमी, दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका, चित्रपट या सगळ्यांचा पाया आहे. तुम्ही एकांकिका मनापासून करा, भरपूर स्पर्धांमधून भाग घ्या, म्हणजे रंगभूमीसाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे, त्याची पूर्वतयारी आणि पाया पक्का होण्यास मदतच होईल. आणि मग तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेलात आणि माध्यमात काम करायचे म्हटले तर त्यात तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. एकांकिका स्पर्धाचा अनुभव तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडेल.
 व्यावसायिक रंगभूमी, मालिका किंवा चित्रपट या माध्यमात ज्याला काम करायचे आहे, त्या प्रत्येकाने एकांकिकांच्या मांडवाखालून गेलेच पाहिजे. माझीही सुरुवात एकांकिका स्पर्धेपासूनच झाली होती. मी, भरत जाधव, केदार शिंदे, संतोष पवार, देवेंद्र पेम असा आमचा एक ग्रुपच होता. आम्ही भरपूर एकांकिका केल्या, अनुभव घेतला. आज आम्ही प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात जे काही यश मिळविले आहे, त्यामध्ये एकांकिका स्पर्धाचा मोठा वाटा आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2014 6:46 am

Web Title: loksatta lokankika competition
Next Stories
1 ‘ओमकारा’सारख्या चित्रपटांकडे परतायचं आहे
2 बच्चेकंपनीची धमाल..
3 फुल ऑफ सर्किट्स!
Just Now!
X