‘लोकसत्ता लोकांकिका’च्या व्यासपीठावरून नाटय़कर्मीचा सूर

कलावंतांनी ठोस राजकीय आणि सामाजिक भूमिका घ्यायलाच हवी, असा सूर ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या महाअंतिम सोहळ्यात नाटय़कर्मीकडून उमटला. ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर तसेच चंद्रकांत कुलकर्णी यांनी तसे स्पष्ट मत मांडले. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना पालेकर यांनी सर्व एकांकिकांनी सामाजिक प्रश्नाला हात घातला आणि निर्भीडपणे भूमिकाही घेतली, त्याबद्दल त्यांचे मनापासून कौतुक केले. विचारशील दिग्दर्शक आणि या स्पर्धेचे परीक्षक चंद्रकांत कुलकर्णी यांनीही, कलाकारांनी ठोस भूमिका घ्यायला हवी हे वास्तव मान्य करतानाच कलाकार विचाराने एकत्र आहेत पण कृती करताना ते बहुधा भवतालाला घाबरत असावेत. पण तरुण कलाकार मात्र कलाकृतीतून सडेतोडपणे आपली भूमिका मांडत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. या स्पर्धेत पुण्याच्या बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सची ‘सॉरी परांजपे’ ही महाराष्ट्राची लोकांकिका ठरली.

narendra modi
बहुसंख्य हिंदू तर मांसाहारीच!
The plight of workers in coalition politics in Raigarh
रायगडात युती आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची फरपट
Raj Thackeray, mahayuti support
राज ठाकरे यांच्या भूमिकेत कायमच सातत्याचा अभाव
Raj Thackeray Gudi Padwa Melava 2024 Marathi News
MNS Gudi Padwa Melava: “मला शिवसेना पक्षप्रमुख व्हायचं असतं तर..”, राज ठाकरेंनी ‘त्या’ चर्चेवर मांडली भूमिका

‘लोकसत्ता लोकांकिका’च्या चौथ्या पर्वाचा हा महाअंतिम सोहळा माटुंग्याच्या यशवंत नाटय़मंदिरात अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्यात सहभागी आठही एकांकिकांचा सामना अनुभवल्यानंतर पालेकर यांनी आशय, सादरीकरण आणि अभिनय याबद्दल तरुण नाटय़कर्मीशी संवाद साधला.

पालेकर म्हणाले की, पुण्यात राम गणेश गडकरी यांचा पुतळा फोडल्यानंतर त्याचा निषेध करण्यासाठी मराठी कलाकार एकत्र आले खरे. मात्र ज्या जागी पुतळा फोडला तिथे बसून मूक निषेध करण्यासाठीही पोलिसांनी बंदी घातल्यानंतर त्यांना जाब विचारण्यासाठी एकही कलाकार पुढे आला नाही. जी धमक कलाकारांना तेव्हा दाखवता आली नाही ती या तरुण कलाकारांच्या एकांकिकेतून जळजळीतपणे उमटली.

यावर्षी ‘लोकसत्ता लोकांकिका’ हा बहुमान मिळवणाऱ्या  ‘सॉरी परांजपे’ या एकांकिकेप्रमाणेच इतरही एकांकिकांमध्ये ज्वलंत सामाजिक समस्या घेऊन त्यावर चर्चा घडवून आणण्याची, दोन्ही बाजूंनी मांडणी करूनही ठोस भूमिका घेण्याची हिंमत लेखक-दिग्दर्शकांनी दाखवली याबद्दल पालेकर यांनी कौतुक केले. खरेतर, अशी भूमिका घेणे समोर बसलेल्या कलाकारांच्या एका पिढीला शक्य झालेले नाही. पुण्यातील घटनेविरुद्ध निदान अखिल भारतीय मराठी नाटय़परिषदेने एक प्रस्ताव तरी नाटय़संमेलनात मांडायला हवा होता, मात्र तेवढेही धाडस त्यांना करता आले नाही, याबद्दल पालेकर यांनी खंत व्यक्त केली. पण हेच धाडस असणारी तरुण पिढी निश्चितच पुढे जाईल. त्यांना त्यांचे नाटक शोधण्याची दिशा मिळाली आहे. त्या वाटेने जाताना त्यांना नक्की नवा विचार, नवी भाषा सापडेल, असा विश्वास व्यक्त करत त्यासाठी तरुण नाटय़कर्मीना पालेकर यांनी शुभेच्छा दिल्या.

एकेकाळी नाटक काय असू शकते, काय पद्धतीने सादर करता येऊ शकते हे शोधणाऱ्या पिढीची जी तगमग होती त्याच पद्धतीचा शोध घेण्याची तळमळ आजच्या आभासी जगात रमलेल्या पिढीतही दिसते आहे, याबद्दल पालेकर यांनी समाधान व्यक्त केले. एका अर्थाने दोन पिढय़ांमध्ये अंतर असूनही नाटकाचा हा दुवा त्यांना सांधणारा, एकत्र आणणारा ठरला आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या एकांकिकांची भाषा आणि रंगभाषा याबद्दल पालेकर म्हणाले की, ‘‘आमच्या आधीच्या पिढीने जी भाषा नाटकांत रुळवली होती तिचा आम्ही कंटाळा केला. मात्र आज तीच भाषा, कानेटकर-कोल्हटकरांसारख्या नाटय़कर्मीच्या पध्दतीची मांडणी या एकांकिकांमधून पहायला मिळाली आणि आश्चर्य वाटले. बहुधा ही पिढी दूरचित्रवाणी मालिका आणि चित्रपट  माध्यमाला सरावली असल्याने त्याचा प्रभाव त्यांच्या मांडणीवर पडत असावा. मात्र ही या पिढीची भाषा नाही. त्यांनी आपल्या अनुभवातून उमटणारी भाषा वापरायला हवी, सादरीकरणातही उत्कट अनुभवातून, विचारांतून येणारा अभिनय दिसायला हवा, अशी अपेक्षाही पालेकर यांनी व्यक्त केली. तरुणाईने सादर केलेल्या या एकांकिकांमध्ये प्रकाशयोजनेपासून नेपथ्यातही एक वेगळा विचार दिसला, हेही त्यांनी नमूद केले. ‘लोकसत्ता लोकांकिका’चे वेगळेपण कशात आहे याबद्दल अनुभवी मत परीक्षकाच्या भूमिकेतून या स्पर्धेशी जोडले गेलेले दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केले. वर्तमानपत्र म्हणून केवळ बातमीदारीपुरती जबाबदारी पार न पाडता समाजाशी नाते जोडण्याच्या प्रयत्नांतून ‘लोकसत्ता’ने ‘लोकांकिका’सारखे उपक्रम हाती घेतले आहेत. राज्यभरातून तरुण नाटय़कर्मीना एकत्र आणणारी ही स्पर्धा म्हणजे महाराष्ट्राचा सांस्कृतिक लसावि आहे, अशा शब्दांत त्यांनी या स्पर्धेचे वेगळेपण अधोरेखित केले.

अंतिम फेरीतील एकांकिकांचे सादरीकरण झाल्यानंतर या स्पर्धेचा उद्देश आणि त्याचे फलित म्हणून समोर येणारे परिणाम पाहता मनोरंजनाच्या पलिकडे जात ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या आयोजनामागचा उद्देश आता कुठे मूळ धरतो आहे, अशी भावना ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केली.