ठाण्याच्या एकांकिका स्पर्धेत जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या ‘मॉब’ एकांकिकेने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. ४५ रंगकर्मी आणि २० हून अधिक बॅकस्टेज आर्टिस्ट यांचा लवाजमा या ठिकाणी उपस्थित होता. एकीकडे ‘मॉब’ एकांकिकांची संकल्पना कालबाह्य़ होत असताना या एकांकिकेने लक्ष वेधून घेतले. दिवसभरात वेगवेगळ्या एकांकिका आणि त्यातील तरुण कलाकारांचा असाच दांडगा उत्साह दिसून आला. या एकांकिकेची नेपथ्य रचनाही नजरेत भरणारी होती. नेपथ्य करण्यासाठी प्रचंड मोठय़ा प्रमाणावर साहित्य आणण्यात आले होते. त्यासाठी विशेष हमालांची व्यवस्थाही महाविद्यालयातर्फे करण्यात आली होती.
‘गणपत्ती बाप्पा मोरया.. छत्रपती शिवाजी महाराज की जय.. जय भवानी..’ अशा जयघोषात ठाण्यातील लोकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फे रीला सुरुवात झाली. एकाहून एक दर्जेदार एकांकिका.. उत्कृष्ट लेखन, जोशपूर्ण सादरीकरण, नावीन्यपूर्ण मांडणी या सगळ्याला नृत्य आणि संगीताची अनोखी जोड देत येथील तरुणाईने आपल्या अभिजात नाटय़कलेचे दर्शन घडविले. ठाणे, नवी मुंबई, कल्याण, उल्हासनगर, वसई, नवीन पनवेल, रायगड आणि अलिबाग येथील नऊ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्तम रंगाविष्कार सादर करून परीक्षकांवर आपली छाप उमटविली.
ठाणे शहराचे आकर्षण असणाऱ्या मासुंदा तलाव अर्थात तलावपाळी परिसरात असलेल्या ‘मो. ह. विद्यालया’मध्ये लोकांकिकाची प्राथमिक फेरी रंगली होती. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे जथेच्या जथे सकाळपासूनच स्पर्धास्थळी दाखल होत होते. त्यांच्या उत्स्फूर्त उत्साहाने भारावलेले वातावरण, मंचावर एकांकिका सादर करण्यापूर्वी सर्वच संघांची सुरू असलेली लगबग आणि सगळ्या संघांमध्ये आपली एकांकिका सरस ठरावी यासाठी लागलेली चुरस असा वेगळाच रंग या फेरीला चढला होता. लोकांकिका स्पर्धेची ठाणे केंद्रावरील तिसरी घंटा झाली आणि कॉलेज तरुणाईचे एकापेक्षा एक सरस नाटय़ाविष्कार सादर होऊ लागले. ढोलताशे, वेशभूषेचे नानाविध पेहेराव, ध्वनीयंत्रणा, नेपथ्य आदी सामग्री काही संघांनी सोबत आणली होती. माफक तांत्रिक साहाय्य आणि भारदस्त सादरीकरण याच्या जोरावर प्रत्येक संघाने ईष्र्येने आपापल्या एकांकिकांमध्ये रंग भरले.
गूढ रहस्यकथेवर आधारित ‘सामुराई’, स्त्री-अत्याचारांचे वास्तव दर्शन घडविणारी ‘नूर’, ग्रामीण भागातून शहरात आलेला आणि शहरी झगमगाटात गावाला विसरलेल्या तरुणाची कथा सांगणारी ‘माणसापरीस मेंढरं बरी’, इंग्रजी शाळांकडे पालकांचा असलेला ओढा आणि त्यातूनच धड मराठीही नाही आणि धड इंग्रजीही बोलता येत नाही, अशी अधांतरी पिढी घडविणारी ‘सवाल मराठीचा’ ही एकांकिका, अपत्यहीन दाम्पत्याचा मुलाबद्दलची ओढ अनाथ मुलीला घरी आणून त्याच्या सहवासात सुख शोधणारी ‘कुछ तो मजा है’ ही हसतखेळत सादर झालेली एकांकिका अशा वैविध्यपूर्ण विषयांवरच्या एकांकिका ठाण्यातील तरुणांनी सादर केल्या.