‘लोकसत्ता’ आयोजित ‘लोकांकिका’ स्पर्धेत आठही केंद्रांवरील विभागीय अंतिम फेरी पूर्ण होत आल्या असून महाअंतिम फेरीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ‘लोकांकिका’ स्पर्धेचे हे सहावे वर्ष आहे. येत्या पाच वर्षांत अनेक लोकप्रिय कलाकार ‘लोकसत्ता लोकांकिका’ने रंगभूमी तसेच चित्रपटसृष्टीला दिले असून त्यांच्या जडणघडणीत राज्यस्तरीय महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा मोठा वाटा आहे. ‘लोकांकिका’ स्पर्धेत केलेल्या सर्वोत्तम सादरीकरणामुळे त्यांना नवीन ओळख मिळाली. यानिमित्ताने यशस्वी तरुण नाटय़कर्मीची यशोगाथा जाणून घेऊ या..

यशात लोकांकिको स्पर्धेचा महत्त्वाचा वाटा

मी रामनारायण रुईयाचा विद्यार्थी असल्याने ‘नाटय़वलय’तर्फे अनेक एकांकिकांमध्ये काम केले. तसेच त्याचे दिग्दर्शनही केले. दोन वषार्ंपूर्वी ‘ओवी’ या एकांकिकेला ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. ‘ओवी’ हे भयनाटय़ असून स्कि झोफ्रेनिक मुलीची कथा त्यात सांगण्यात आली होती. एका महाविद्यालयीन स्तरावरील एकांकिकेचे दोनअंकी नाटक होण्यापर्यंतचा प्रवास रंजक होता. ‘ओवी’ ही एकांकिका अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना आवडली. त्यांनी मला एकांकिकेची सीडी घेऊन येण्यास बोलावले होते. ‘ओवी’चे गुजराती भाषेत १७५ प्रयोग झाले असून हिंदी आणि इंग्रजीतही त्याचे प्रयोग यशस्वीरीत्या सुरू आहे. सध्या मी ‘दहा बाय दहा’ या नाटकाचे दिग्दर्शन करत आहे. त्याचबरोबर अनेक जाहिरातींसाठी लेखन आणि क्रिएटिव्ह म्हणून कामही केले असून माझ्या यशात लोकांकिको स्पर्धेचाही मोठा वाटा आहे. या स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या एकांकिकांचे विषयही तितकेच तगडे असतात. यात सहभागी होण्यासाठी विद्यार्थी तहानभूक हरपून काम करतात. नुकतीच ‘लोकांकिका’ स्पर्धेची मुंबईची विभागीय अंतिम फेरी पाहिली. रुईयाच्या ‘बुद्रुकवाडीचा मारुती बाटला’ या एकांकिके ची मुंबई विभागातून महाअंतिम फेरीसाठी निवड झाल्याने आनंद झाला आहे.

अनिकेत पाटील, दिग्दर्शक

लोकांकिकेमुळे आत्मविश्वास मिळाला

मुंबईत पहिल्यांदा कला सादर करण्याची संधी ‘लोकांकिका’ स्पर्धेने दिली. रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात शिकत असताना ‘भोग’ या एकांकिकेत काम केले. ती एकांकिका ‘लोकांकिका’ स्पर्धेच्या महाअंतिम फेरीसाठी निवडली गेली होती. त्यानंतर दोन वर्षांनी ‘झी युवा’ वाहिनीवरील ‘बन मस्का’ मालिकेतील ‘बबली’ या भूमिकेसाठी विचारणा झाली. या मालिकेच्या दिग्दर्शकांनी माझे ‘लोकांकिका’मधील काम पाहिले होते. मुंबईत लोकांकिका पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांमध्ये मोठमोठे दिग्दर्शक, कलाकार असतात. त्याचा फायदा स्पर्धेतील कलाकारांना होतो. त्यापूर्वी मी इतक्या मोठय़ा मंचावर काम केले नव्हते. ‘लोकांकिको’ स्पर्धेने मला आत्मविश्वास दिला. सध्या मी ‘हे मन बावरे’ या मालिकेत काम करते आहे.

– विदिशा म्हसकर, अभिनेत्री

शहरातील समस्येचे लोकप्रतिबिंब

‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा माझ्यासाठी महत्त्वाची ठरली. मी लेखन केलेल्या ‘दप्तर’ या एकांकिकेने या स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. एका गावात लहान मुलाला शिकण्याची इच्छा असते; परंतु आर्थिक परिस्थितीमुळे त्याला शिकण्यास मिळत नसल्याने मोठा होऊन नोकरी करत तो शिकत असतो. एका लहान मुलाचा शिक्षणासाठीचा संघर्ष यात मांडण्यात आला होता. यानंतर २०१७ साली एमडी महाविद्यालयातर्फे ‘शुभ यात्रा’ या एकांकिकेचे दिग्दर्शन मी केले होते. प्रवाशांची यात्रा चांगली होण्यासाठी घ्यावे लागणारे उपाय यात दाखवण्यात आले होते. या दोन्ही एकांकिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. परीक्षकांनीही त्याचे कौतुक केले. लोकांकिका स्पर्धेनंतर काही लोकांकडून लेखन आणि दिग्दर्शनासाठी विचारणा झाली. आता सध्या ‘झी ५’वर आलेल्या ‘काळे धंदे’ या वेबसीरिजमध्ये मी सॅमची भूमिका निभावली आहे. सध्या एका वेबसीरिजचे लेखन करत असून लवकरच ती प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ‘लोकांकिका’ स्पर्धेमध्ये शहरातील समस्येचे लोकप्रतिबिंब पाहाण्यास मिळते. तरुणांची विचारसरणी समजण्यास मदत होते. विषयातील वैविध्य, सर्वोत्तम सादरीकरणासाठी महाविद्यालयात पाहण्यास मिळणारी चुरस या वैशिष्टय़ामुळे ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही स्पर्धा दर्जेदार होते.

ओंकार राऊत, दिग्दर्शक

‘नेपथ्यकारांना ओळख मिळाली’

‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेमध्ये मी काही वर्षांपूर्वी ‘ओवी’ या एकांकिकेसाठी नेपथ्य केले होते. तेव्हापासून दरवर्षी ‘लोकांकिका’मधील एकांकिकांसाठी नेपथ्य करतो. या वर्षी रुईया, साठय़े आणि खालसा महाविद्यालयाच्या एकांकिकांसाठी नेपथ्य केले आहे. सध्या ‘एक, दोन, अडीच’ आणि ‘बिऱ्हाड’ नाटकासाठी नेपथ्य करतो आहे. ‘लोकांकिका’ स्पर्धेमुळे लोकांपर्यंत पोहोचता आले. आमच्यासारख्या पडद्यामागच्या कलाकारांविषयी प्रेक्षकांना माहिती नसते. ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेने नेपथ्यकारांना ओळख मिळवून दिली. ‘लोकांकिका’ स्पर्धेचे व्यवस्थापनही चांगले असते. नेपथ्य लावण्यासाठी पुरेसा वेळ दिला जातो. महाविद्यालयीन एकांकिका विश्वात पाऊल ठेवणाऱ्या कलाकारांना सांगेन की, त्यांनी ही पाच वर्षे स्वत:ला काय आवडते हे समजून घेण्यात घालवावी.

– देवाशीष भरवडे, नेपथ्यकार