करण जोहर दिग्दर्शित प्रेमकथा म्हटल्यावर त्याचा एक ठरावीक ‘कुछ कुछ होता है’ शैलीतील ढाचा डोळ्यासमोर येतो. प्रेमाचा त्रिकोण, कधी चौकोनातून प्रेमकथा घोळत तो फिरत राहतो. त्यामानाने ‘ऐ दिल है मुश्किल’ हा त्याच्या त्याच चाकोरीला थोडासा फाटा देऊन बाहेर पडलेला चित्रपट आहे. मात्र हा चित्रपट पाहताना तो पूर्णपणे करणचा न वाटता सतत कुठल्या ना कुठल्या चित्रपटांच्या संदर्भात फिरून आलेला वाटतो. मग कधी रणबीर आणि अनुष्कातील मैत्री आपल्याला करणच्याच ‘कुछ कुछ होता है’ची आठवण करून देते, प्रेमात हार खाल्ल्यानंतर पुन्हा रणबीर इम्तियाजच्या ‘रॉकस्टार’ची आठवण करून देतो तर त्या दोघांमधला विरह-ताटातूट ‘तमाशा’ची आठवण करून देते. अशा चिवित्र कोलाजमधून जोडलं गेलेलं हे भावनिक नाटय़ पूर्ण नसलं तरी थोडासा वेगळा विचार मांडण्याचा प्रयत्न करतं हेही नसे थोडके!

अयान (रणबीर कपूर) हा गर्भश्रीमंत बापाचा मुलगा, वडिलांसाठी म्हणून तो एमबीएचे धडे गिरवतो आहे. पण त्याला स्वत:हून काहीच करता येत नाही. त्याला चांगलं गाता येतं पण तो चारचौघात मोकळेपणाने स्वत:चं गाणं गाऊ शकत नाही. तो छान नाचतो पण सगळ्यांसमोर कसं नाचणार?, हा प्रश्न त्याला मागे खेचत राहतो. या त्याच्या मळलेल्या चौकटीतून त्याला बाहेर काढून आत्मशोध घ्यायला भाग पाडणारी एलिजे (अनुष्का शर्मा) ही अगदी त्याच्याविरुद्ध स्वभावाची.. एलिजे विचाराने, समजूतीने खूपच परिपक्व आहे, टोकाच्या स्वतंत्र विचाराची, स्वतंत्र बाण्याची आहे. हे दोघेही पहिल्याच आकर्षणातून एकत्र येतात. मात्र अयानचा स्वभाव ओळखलेली एलिजे त्याला आपला ‘जिगरा’ म्हणून करार देते. तर अयान पहिल्याच भेटीत तिच्या प्रेमात पडतो. एलिजेच्या भूतकाळात अलीचं (फवाद खान) प्रेम दडलेलं आहे. जे तिने अयानपासून लपवलेलं नाही मात्र अयान आणि एलिजे यांच्या फुलणाऱ्या घट्ट मैत्रीच्या नात्यात एका वळणावर अली पुन्हा येतो. एलिजेची अयानवर माया आहे, प्रेम आहे पण तिला त्याच्याकडून शारीरिक प्रेम नको आहे, तिला त्याच्याकडून घट्ट मैत्री हवी आहे. तर अयान फक्त तिच्याच प्रेमात आकंठ बुडाला आहे. एकाचं असणं आणि दुसऱ्याचं नसणं यातून उभा राहिलेला संघर्ष, त्यात एकाची कायमची फरफट आणि त्याची फरफट बघून दुसऱ्याला होणारा मानसिक त्रास या गोष्टी दिग्दर्शकाने प्रभावीपणे मांडल्या आहेत. याला एकतर्फी प्रेम असं म्हणत त्याची कथा मांडण्याचा हा दिग्दर्शकाचा प्रयत्न आहे. अयानच्या हळव्या स्वभावाला पुन्हा एकदा सबासारख्या (ऐश्वर्या) करारी, कमालीच्या सुंदर स्त्रीच्या येण्याने अर्थ मिळाल्यासारखा वाटतो. सबाने आपलं प्रेम मागे टाकलं आहे. घटस्फोटित असलेली सबाही अयानच्या प्रेमात पडते. पण एका क्षणाला अयानचं अलिजेवर असणारं नितांत प्रेम तिला जाणवतं आणि ती त्या नात्यातून बाहेर पडते.

वरवर दिसताना हे अयानचं एलिजेच्या मागे पळत राहणं आणि तिने त्याला सतत नाकारणं असाच संघर्ष वाटतो त्याला दिग्दर्शक कारणीभूत ठरला आहे. एलिजेच्या ठाम मतांमागे तिचा अलीबरोबरचा भूतकाळ कारणीभूत ठरला आहे. पण त्याची मांडणीच दिग्दर्शकाने केली नसल्याने एलिजेचं वागणं हे दुराग्रही आणि अतिरेकी ठरतं. शिवाय, या सगळ्या प्रवासाला दिग्दर्शकाने फिल्मी संवादाची इतकी फोडणी दिली आहे की ढोकळा खाताना त्याच्यावर पसरलेल्या असंख्य छोटय़ा छोटय़ा मोहरींनी चवच घालवून टाकावी, इतके फिल्मी डायलॉग आपल्यावर आदळत राहतात. अयान आणि एलिजेचं चित्रपटांच्या गाण्यांवर नाचणं आणि मग ‘चांदनी’पासून ‘कल हो ना हो’पर्यंत अनेकविध चित्रपटांच्या संदर्भाची पेरणी डोक्यात घुसत राहते. या सगळ्या गोष्टी दिग्दर्शकाच्या मूळ कथेला मारक ठरल्या आहेत. इथे हा चित्रपट पूर्णपणे रणबीर-अनुष्का जोडीचा आहे. रणबीरचा श्रीमंतीत वाढलेला पण छोटय़ा-छोटय़ा गोष्टींवर रडत बसणारा, भावविवश होऊन सतत दुसऱ्याचा आधार शोधत फिरणारा अयान खूप प्रभावी पद्धतीने रंगवला आहे. तर अनुष्कासाठी स्वतंत्र विचारांची एलिजे साकारणं सरावाचं झालं आहे. पडद्यावर या दोघांची सहजमैत्री पाहणाऱ्याला त्यांच्या प्रेमात पाडते. आणखी दोन गोष्टी या करण जोहरच्या चित्रपटात पूर्णपणे वेगळ्या आहेत. प्रेम म्हणजे मनाच्या जवळिकीबरोबर शारीरिक जवळीक आणि मग त्या अनुषंगाने येणारे लैंगिक संबंध महत्त्वाचे ठरतात. इथे एलिजेला हे मान्य नाही आणि शेवटपर्यंत ती या भूमिकेवर ठाम राहते, हे विशेष. सबाची व्यक्तिरेखा रंगवतानाही आपणहून अयानच्या स्वाधीन होणारी सबा त्याच्या नजरेत आपल्याबद्दल तो सन्मान नाही हे लक्षात आल्यानंतर ते नाकारते. अर्थात, दोघींच्याही या आग्रहामागे त्यांचे पती-पत्नीच्या नात्याचे अनुभवच कारणीभूत आहेत. मात्र पुन्हा एकदा स्त्रिला नेमकं काय हवं आहे ते समजून घेऊन तिच्या भावनांचा सन्मान हा महत्त्वाचा धागा दिग्दर्शकाने इथे अचूक पकडला आहे. फवादवर एक पूर्ण गाणं चित्रित झालं आहे पण त्याची व्यक्तिरेखाच फु लवलेली नाही. तर ऐश्वर्या सबाच्या भूमिकेसाठी अचूक निवड आहे. एकतर्फी प्रेमावर जास्त केंद्रित झालेला हा चित्रपट त्यातील गोंधळामुळे सहजी पचायला मुश्किल झाला आहे.

दिल है मुश्किल