स्त्रियांच्या मनातील त्यांच्या वाढत्या वजनाविषयीचा, बेढब शरीराबद्दलचा न्यूनगंड चित्रपटाच्या रूपाने पहिल्यांदाच बोलका झाला आहे, त्यासाठी दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांच्या धाडसाचे कौतुक करायला हवं. लग्नाच्या जाहिराती नाही तर शेजारीपाजारी, नात्यागोत्यातल्या मावशी-काकू यांच्या तोंडून सतत बायको कशी गोरीपान, सडपातळ बांधा या वर्णनांची एवढी दहशत स्त्रीच्या मनात असते की.. आपण एवढय़ा जाडय़ा असताना आपल्यावर कोणी प्रेम करू शकतं, हा विचारही त्यांना टोचत राहतो, त्यावर विश्वास ठेवासा वाटत नाही. वर्तमानपत्रांमधून, टीव्ही-इंटरनेटवर भरभरून असलेल्या ‘बारीक’ करणाऱ्या अनेक क्लिनिक कम कंपन्यांच्या मागे वर्षांनुवर्षे हा स्त्रियांच्या मनात घट्ट मूळ धरून असलेला न्यूनगंड आहे, हा नेहमी दिसणारा विषय ‘वजनदार’च्या निमित्ताने थेट समोर आला आहे.

कावेरी आणि पूजा या दोन स्त्रियांची ही कथा. कावेरी (सई ताम्हणकर) पुण्यातून लग्न होऊन पाचगणीला आली आहे. मूळची स्वतंत्र विचाराची, बाण्याची, नाचण्याची आवड असणारी कावेरी पाचगणीला स्ट्रॉबेरी शेती असलेल्या मोठय़ा घरात लग्न होऊन डोक्यावर पदर घेऊन वावरणाऱ्या संस्कृतीत अडकली आहे. ऐषोआरामी घरात वावरताना स्वत:साठीचे जगणे विसरलेली कावेरी पूजाच्या (प्रिया बापट) मैत्रीमुळे थोडेसे का होईना ते सुख पुन्हा अनुभवते आहे. तर पूजा ही अगदी गोड आणि गोलगोजिरी, हसतमुख अशी मुलगी. पूजा कॉम्प्युटर इंजिनीअर आहे, हुशार आहे. भरपूर खाणारी आणि मजेत राहणारी पूजा आणि कावेरी या दोघींचेही आयुष्य एका घटनेनंतर पूर्णपणे बदलते. ती घटना काय हे चित्रपटातच पाहणे योग्य आहे. ‘वजनदार’ हा केवळ कावेरी आणि पूजाला वाढत्या वजनाच्या न्यूनगंडातून बाहेर काढून फिटनेसकडे नेणारा चित्रपट एवढाच मर्यादित राहात नाही. या दोघींच्याही वेगवेगळ्या व्यक्तिरेखा, त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या दोन भिन्न संस्कृती आणि त्यातून त्या दोघींकडे पर्यायाने स्त्रीकडे पाहण्याचा समाजाचा वेगवेगळा दृष्टिकोन  अशा अनेक गोष्टींचे धागे पाहणाऱ्याला मिळत जातात.

Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे
rohini acharya lalu yadav
लालू प्रसाद यादव यांच्या कन्येची राजकारणात एन्ट्री; कोण आहेत रोहिणी आचार्य?

पूजा जशी आहे तसेच तिला स्वीकारू पाहणारा, तिच्यावर प्रेम करणारा आलोक (सिद्धार्थ चांदेकर)सारखा तरुण असतानाही तो आपल्यावर प्रेम करू शकतो, यावर तिचा विश्वास बसत नाही. एरव्ही कपडय़ांनी झाकलेले आपले बेढब शरीर लैंगिक संबंधांच्या वेळेस आपल्या प्रियकरासमोर उघडे झाले आणि त्याने नाकारले तर ही कित्येक मुलींच्या मनात दडलेली भीती दिग्दर्शकाने अगदी सहजतेने पूजाच्या माध्यमातून बोलून दाखवली आहे. भारतीय स्त्रीच्या शारीररचनेचा विचार करताना किती सहजपणे आपल्याला जाडीच बायको हवी किंवा बारीकच बायको हवी असा मोजूनमापून पर्याय सहजपणे तरुण व्यक्त करताना दिसतात. इथे पूजाला आहे तशीच राहा, असे स्वीकारणारा आलोक तिला हे स्पष्ट सांगतो. मात्र कित्येक अशा तरुणी ज्यांना स्वीकारणारे आलोक सापडत नाहीत ते स्वत:ला त्यातून बाहेर करण्यासाठी सर्जरीपर्यंतचे अघोरी प्रयत्न करून पाहतात आणि स्वत:चेच नुकसान करून घेतात. ही खरोखरच आजची समस्या आहे. याच न्यूनगंडावर ब्युटी क्लिनिक्सपासून फिटनेस सेंटपर्यंतची एक मोठी बाजारव्यवस्था उभी राहिली आहे, याची जाणीव कथेच्या ओघातच करून देण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे. कावेरीच्या व्यक्तिरेखेतूनही तथाकथित सगळी सुखं पायाशी असताना मला काय हवेय याचे उत्तर शोधणारी कावेरी वेगळी ठरते. मात्र हा सगळा वजनदार आशय मांडत असताना चित्रपट ज्या सहजपणे फिटनेसच्या शेवटाकडे येतो, हे पटत नाही. शिवाय, कथेला असलेली पाचगणीची पाश्र्वभूमी, कावेरी आणि तिचे श्रीमंत कुटुंब यात काहीशी कथा फँटसीकडे झुकल्यासारखी वाटते आणि त्यातले वास्तव बोथट होते.

प्रिया बापट आणि सई ताम्हणकर यांच्यातली पडद्यावरची मैत्री झक्कास जमली आहे. सईने प्रसंगी हळवी पण स्वत:साठी कणखर बनणारी कावेरी उत्तम रंगवली आहे. प्रिया बापटने कमाल केली आहे. पूजाच्या व्यक्तिरेखेसाठी तिने घेतलेली शारीरिक मेहनत पडद्यावर दिसते. गुबगुबीत तरीही खुशालचेंडू पूजाची भूमिका प्रिया अक्षरश: जगली आहे. या दोघींनाही सिद्धार्थ चांदेकर, चिराग पाटील आणि समीर धर्माधिकारींची चांगली साथ मिळाली आहे. चिरागच्या वाटय़ाला  झोपण्याव्यतिरिक्त क्वचितच चांगली दृश्ये आली आहेत. त्यामानाने आलोक आणि पूजा यांच्यातले नाते अधिक चांगलेपणाने दिग्दर्शकाने रंगवले आहे. मांडणीत थोडासा हलका असला तरी हा ‘वजनदार’ प्रयत्न अनुभवायला हवा असा आहे.

वजनदार

  • निर्माता – लँडमार्क फिल्म्स
  • दिग्दर्शक -सचिन कुंडलकर
  • कलाकार- प्रिया बापट, सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर, चिराग पाटील, चेतन चिटणीस, समीर धर्माधिकारी.