७ ते ९ जानेवारीदरम्यान वरळी येथील नेहरू सेंटर येथे आयोजन

स्वरप्रभा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ७ ते ९ जानेवारी या कालावधीत मुंबईत वरळी येथील नेहरू सेंटर येथे ‘लोकसत्ता’प्रस्तुत हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या ‘स्वरांजली’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक पं. प्रभाकर कारेकर हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने संस्थेतर्फे विविध उपक्रम आयोजित करण्यात येतात.

महोत्सवाची सुरुवात २००२ मध्ये झाली. दिवंगत पं. सुरेश हळदणकर, पं. जीतेंद्र अभिषेकी, पं. सी. आर. व्यास यांच्या स्मृतिपीत्यर्थ दरवर्षी हा महोत्सव आयोजित करण्यात येतो. यंदाच्या स्वरांजली महोत्सवात पं. शिवकुमार शर्मा, उस्ताद अमजद अली खाँ, पं. हरिहरन, पं. एम. व्यंकटेश कुमार, पं. संजीव अभ्यंकर, पं. रवी चारी हे मान्यवर सहभागी होणार आहेत. ७ जानेवारी रोजी पं. संजीव अभ्यंकर शास्त्रीय गायन सादर करणार असून या दिवसाची सांगता पं. शिवकुमार शर्मा यांच्या संतुर वादनाने होणार आहे. ८ जानेवारी रोजी पं. रवी चारी यांच्या सतार वादनाने महोत्सवाची सुरुवात होणार आहे. आदित्य कल्याणपूर हे चारी यांना तबला साथ करणार आहेत. पं. हरिहरन यांच्या गायनाने मैफलीची सांगता होणार आहे.

९ जानेवारी रोजी महोत्सवाची सुरुवात पं. व्यंकटेश कुमार यांच्या गायनाने तर समारोप उस्ताद अमजद अली खाँ यांच्या सरोद वादनाने होणार आहे. महोत्सवाच्या प्रवेशिका  www.bookmyshowmumbai या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.