चित्रपट : रंगून

दुसऱ्या महायुद्धाच्या पाश्र्वभूमीवर रंगणारी प्रेमकथा म्हणून ‘रंगून’ चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता होती. ‘ओमकारा’ आणि ‘हैदर’सारख्या चित्रपटांतून प्रेमाचे गडद, गहिरे रंग त्यातील भावनिक गुंत्यासह अचूक पकडणाऱ्या दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा ‘रंगून’ही असाच उत्कट प्रेमानुभव देणार ही अपेक्षा हा चित्रपट फोल ठरवतो. या चित्रपटाची पाश्र्वभूमी युद्धाची असली तरी पाहायला मिळणार प्रेमकथा यावर प्रेक्षक ठाम असले तरी खुद्द दिग्दर्शक प्रेम की देशप्रेम या गुंत्यात फसला आहे. त्यामुळे चित्रपट रंगतो पण तो आपल्याला गुंगवून ठेवत नाही.

चित्रपटाची सुरुवात १९३१ सालातून होते. दुसऱ्या महायुद्धाचं सावट सगळ्या जगावर आहे. ब्रिटिश फौजा हिटलरशी लढण्यात व्यग्र आहेत. भारतातही गांधीजींनी ‘चले जाव’ आंदोलनाचे सूर छेडल्याने त्यांच्या सत्तेला िखडार पडत चालले आहे. त्याच वेळी गांधीजींच्या अिहसा तत्त्वाशी असहमत असणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटिशांशी लढूनच विजय मिळवता येईल, या विचाराने सिंगापूरमध्ये जपान्यांशी हातमिळवणी करून ‘आझाद िहद सेने’ची स्थापना केली आहे. या इतक्या मोठय़ा  कॅनव्हासवर मुंबईतील कुठल्या तरी मिस ज्युलियाचा (कंगना राणावत) कथेत प्रवेश होतो. ज्युलिया स्टंट फिल्ममधून काम करणारी लोकप्रिय अभिनेत्री आहे. पण तिची सूत्रे रुसी बिलिमोरियाच्या (सफ अली खान) हातात आहेत. रुसी हा पारशी अभिनेता कम निर्माता आहे. रुसीचा जीव ज्युलियात गुंतला असला तरी एका अर्थाने तो तिच्यावर मालकी हक्क गाजवून आहे. वर जी युद्धाची परिस्थिती दिग्दर्शकाने सांगितली आहे त्याचे शिकार अन्य सर्वसामान्य भारतीयांप्रमाणेच रुसी आणि ज्युलियाही आहेत. ब्रिटिशांची मर्जी सांभाळून वागणाऱ्या रुसीला त्यांच्याच आग्रहास्तव ज्युलियाला बर्मात पाठवण्याची वेळ येते.

बर्मामध्ये या कथेतला तिसरा धागा जमादार नवाब मलिकच्या (शाहीद कपूर) निमित्ताने पहिल्यांदा ज्युलिया आणि पर्यायाने रुसीशी जोडला जातो. ज्युलिया आणि नवाबमध्ये फुलत जाणारे प्रेम आणि ते ध्यानात आल्यानंतर ज्युलियासाठी घरदार सोडून बर्मात पोहोचलेल्या रुसीच्या मनात फुलत चाललेला अंगार यातून एक तर तो किंवा मी या धर्तीवरची गुंतागुंतीची प्रेमकथा, ज्युलियाचे या दोघांमध्ये फसणे असं सगळं आपल्या मनात येत राहतं. मात्र इथेच ही प्रेमकथा चक्क देशप्रेमाचं वळण घेते. चित्रपटाच्या उत्तरार्धात ही ज्युलिया-नवाब-रुसीची प्रेमकथा उरत नाही. एका अर्थाने ब्रिटिशच आपले कत्रेधत्रे आहेत हे मानणाऱ्या ज्युलियाच्या दृष्टिकोनात नवाबच्या प्रेमामुळे झालेला बदल दिग्दर्शकाने चांगला दाखवला असला तरीही अचानक या प्रेमकथेवर देशप्रेमाचं चढलेलं लेबल आपण दुसऱ्याच ट्रॅकवर आलो आहोत, याची जाणीव प्रेक्षकांना करून देते. त्यामुळे चित्रपट शेवटाकडे जाताना ती नवाब-ज्युलियाच्या देशप्रेमाची कथा असते. त्यात कळसाध्याय म्हणून रुसीवर चित्रित झालेले शेवटचे दृश्य या चित्रपटाच्या एकूण प्रभावावरच घाला घालणारे आहे.

१९३१चा काळ दिग्दर्शकाने व्हीएफएक्सच्या मदतीने इतका हुबेहूब उभा केला आहे, की त्या काळात प्रेक्षक सहज हरवून जातो. कुठेही पडद्यावरचा हा काळ, त्यातली माणसे आणि त्यांच्या आजूबाजूच्या घटना खोटय़ा वाटत नाही. त्या अर्थाने हा चित्रपट अत्यंत प्रभावी ठरतो. युद्धाचे तपशीलही दिग्दर्शकाने चोख वापरले आहेत. त्याला तिन्ही कलाकारांनी तितकीच तगडी साथ दिली आहे. ज्युलियाच्या भूमिकेत कंगना राणावतने जीव ओतला आहे. ज्युलियाचं दु:ख, तिचं प्रेम आणि एका बेगडी जगात अभिनेत्री म्हणून वावरत असली तरी त्या मुखवटय़ामागे असलेलं हळवं, निरागस मन या सगळ्या भावभावना कंगनाने तितक्याच सहजतेने रंगवल्या आहेत. तितक्याच सहजतेने शाहीदने नवाब मलिकची भूमिका रंगवली आहे. विशाल भारद्वाजचा चित्रपट आणि सफ अली खान या दोन गोष्टी एकत्र आल्यानंतर लंगडा त्यागीसारखी भारी व्यक्तिरेखा त्याच्या वाटय़ाला येईल, अशी अटकळ होती. रुसीची व्यक्तिरेखा डॅिशग आहे आणि सफने तडफेने ती भूमिका केली आहे. मात्र सफ किंवा शाहीद दोघांच्या व्यक्तिरेखांना दिग्दर्शकाने फार मर्यादा घातल्या आहेत. निदान शाहीदच्या वाटय़ाला ज्युलिया आणि त्याच्यातील प्रेमप्रसंगांची साथ असली तरी सफच्या वाटय़ाला फारसे काही आलेले नाही. दिग्दर्शन, कलादिग्दर्शन, गुलजार यांची गाणी, त्यालाही स्वत:च संगीत साज चढवत एक वेगळा पीरिअड ड्रामा उभा करण्यात विशाल भारद्वाज कमालीचे यशस्वी ठरले. मात्र कथेला प्रेमात ‘रंगून’ काढताना त्याला देशप्रेमाचाही दिलेला मुलामा चित्रपटाचा पोत बिघडवणारा ठरला आहे.

रंगून

  • दिग्दर्शन – विशाल भारद्वाज
  • कलाकार – कंगना राणावत, शाहीद कपूर, सफ अली खान.