‘घर पाहावे बांधून’ अशी म्हण प्रचलित असून घर बांधताना अथवा खरेदी करताना होणाऱ्या कष्टांचे, मेहनतीचे आणि आर्थिक गणित जुळवताना होणारी कसरत या म्हणीद्वारे स्पष्ट होत असली तरी ‘लोकसत्ता’च्या एका भाग्यवान वाचकास त्याने खरेदी केलेल्या एका घरावर चक्क  दुसरे घर बक्षीस म्हणून मिळाले आहे. गणेश कांबळे असे या भाग्यवान वाचकाचे नाव असून त्यांना ‘लोकसत्ता वास्तुलाभ’ उपक्रमाचे पहिले पारितोषिक म्हणून नवे कोरे घर मिळाले आहे. शुक्रवारी रात्री ठाण्यातील लुइसवाडी परिसरातील टेन्झो टेम्पल हॉटेलच्या लॉनमध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमात तुलसी इस्टेटचे भावीन पटेल आणि किंजल पटेल यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. ‘रमा माधव’ या आगामी नव्या चित्रपटाच्या दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून या वेळी उपस्थित होत्या.
गुढी पाडव्याच्या निमित्ताने घर खरदीचे स्वप्न साकार करणाऱ्या वाचकांसाठी ‘लोकसत्ता’ने तुलसी इस्टेट, केसरी टूर्स आणि जे. के. एन्टरप्रायझेस यांच्या प्रायोजकत्वाखाली ‘लोकसत्ता वास्तुलाभ’ उपक्रम आयोजित केला होता. गुढी पाडव्याच्या काळात घर खरेदी करणाऱ्यांना ‘लोकसत्ता’च्या वतीने एक अर्ज भरून घेण्यात आला होता. त्यातून भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात आली. या उपक्रमाच्या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम शुक्रवारी ठाण्यात पार पडला. या वेळी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, तुलसी इस्टेटचे भावीन पटेल, किंजल पटेल, केसरी टूर्सचे केसरी पाटील आणि सुनीता पाटील, जे. के. एन्टरप्रायझेसचे राज नायर आणि ठाण्यातील विकासक या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात गायक चिंतामण सोहनी यांच्या ‘रिम झिम गिरे सावन..’ या गाण्याने झाले. पारितोषिक विजेत्यांपैकी डोंबिवलीच्या ऋजुता गवळी यांना वॉशिंग मशीन, ठाण्यातील सचिन गावडे यांना एक टनाचा एसी, तळेगावच्या श्रद्धा चौधरी यांना एलईडी, कोपरखैरणे येथील रश्मी रामटेके यांना रेफ्रिजरेटर प्रदान करण्यात आले तर केसरी पाटील यांच्या हस्ते द्वितीय पारितोषिक विजेते मिलिंद म्हात्रे यांना केसरीच्या परदेशी सहलीच्या बक्षिसाचे वितरण करण्यात आले. उपक्रमाचे प्रथम विजेते गणेश कांबळे यांना तुलसी इस्टेटच्या भावीन पटेल यांनी सन्मानित केले.कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना केसरी पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘लोकसत्ता’ ही लोकमान्य लोकशक्ती आहे.
लोकांच्या समस्या जाणून घेऊन पत्रकारितेच्या माध्यमातून त्या पूर्ण करण्याचा ‘लोकसत्ता’चा कायम प्रयत्न राहिला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ‘लोकसत्ता’ हे काम करत असून त्यांना सर्वाच्या वतीने मुजरा असे केसरी पाटील यांनी सांगितले. ‘रमा माधव’ हा नवा ऐतिहासिक चित्रपट मराठी रसिकांसाठी घेऊन येणाऱ्या दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांनी उपस्थितांशी संवाद साधत ‘लोकसत्ता’च्या उपक्रमाचे कौतुक केले. मराठीमध्ये ऐतिहासिक चित्रपटांची गरज होती. त्यामुळे ही ऐतिहासिक प्रेमकहाणी लोकांसमोर आणली असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.  

हे सारे अविश्वसनीय..
या उपक्रमावर माझा विश्वासच नव्हता, असे कधीच होऊ शकत नाही, असे ठामपणे आपण सांगत होतो. मात्र ‘लोकसत्ता’च्या नावामुळेच आपण या कार्यक्रमास उपस्थित राहिलो आणि पहिले पारितोषिक जिंकले. हे केवळ ‘लोकसत्ता’मुळेच शक्य झाले. सुमारे २२ वर्षे बेस्टमध्ये काम करत असलो तरी घर घेण्याची हिंमत होत नव्हती. मात्र जमा पुंजी एकत्र करून नवे घर बुक केले आणि ‘लोकसत्ता’मुळे घरावर आणखी एक घर चक्क बक्षीस म्हणून मिळाले, हे सर्व अविश्वसनीय असेच आहे.
 गणेश कांबळे, लोकसत्ता
वास्तु लाभ उपक्रमाचे विजेते
परदेश सहलीची इच्छा पूर्ण
उपक्रमात सहभागी होताना विजेता होण्याची अपेक्षा अथवा कल्पना नव्हती. त्यामुळे जेव्हा फोन आला, तेव्हा विश्वासच बसत नव्हता. गेल्या काही दिवसांपासून परदेशी जाण्याचा विचार सुरू होता. ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमामुळे आमच्या इच्छेला दिशा मिळाली असून ‘लोकसत्ता’सोबतचे ऋणानुबंध यामुळे अधिक वृद्धिंगत झाले आहे.  
मिलिंद म्हात्रे,
परदेशी सहल विजेते.
‘लोकसत्ता वास्तु लाभ’चे पारितोषिक विजेते
गणेश कांबळे  – घर विजेते
मिलिंद म्हात्रे – परदेशी सहल
रश्मी रामटेके – रेफ्रिजरेटर
श्रद्धा चौधरी – एलईडी टीव्ही
सचिन गावडे – एक टनाचा एसी
ऋजुता गडकरी – वॉशिंग मशीन