‘शाळा’ आणि ‘आजोबा’नंतर दिग्दर्शक सुजय डहाकेचा साय-फायपट म्हणून बहुचर्चित असा ‘फुंतरू’ प्रेक्षकांना पूर्णपणे नव्या विश्वात घेऊन जातो. साय-फायपटाच्या निमित्ताने आत्तापर्यंत माहिती नसलेल्या महाविद्यालयीन तरुणाईने, सर्जनशीलतेने भरलेल्या विश्वाचे दर्शन दिग्दर्शक प्रेक्षकांना देऊन जातो. संकल्पना, संवाद सगळ्यात भारी असलेला हा चित्रपट सहजपणे प्रेक्षकांना आकळणारा नाही हेही तितकेच खरे..

हिंदीत ‘थ्री इडियट्स’च्या निमित्ताने आयआयटीत शिकणारे तरुण विद्यार्थी, त्यांची जीवनशैली, स्पर्धा सगळे पहिल्यांदा लोकांसमोर आले होते. ‘फुं तरू’मधूनही वैज्ञानिक, विज्ञान संकल्पना, अत्याधुनिक शोध, कोडिंग, प्रोजेक्ट अशा सगळ्या गोष्टींचा एकच भडिमार आपल्यावर होतो. फरक एवढाच की, ‘फुंतरू’त मदन देवधर (वीरू), अनया (केतकी माटेगावकर), नॅनो (शिवराज वायचल) यांच्या रूपाने खरोखरच महाविद्यालयात शोभतील असेच कलाकार पाहायला मिळतात. वीरू हा महाविद्यालयातील हुशार विद्याथी आहे. मात्र नॅनोप्रमाणे काहीही झाले तरी आपलाच प्रकल्प यशस्वी व्हावा म्हणून झटणाऱ्यांपैकी तो नाही. वीरूचे अनयावर प्रेम आहे. अनया सगळ्यांशी चांगली वागणारी, अभियांत्रिकी शिकत असलेली, महत्त्वाकांक्षी पण तितकीच सरळ-सुंदर अशी विद्यार्थिनी आहे. वीरू अनयाला पाहताच तिच्या प्रेमात पडतो. मात्र अनयाच्या डोळ्यात नॅनोचे कौतुक आहे. आपल्याला हवी तशी मुलगी आपल्यालाच बनवावी लागेल, असे सतत म्हणत राहणाऱ्या वीरूला त्यांच्याच महाविद्यालयाचा ‘फाऊंडर’ (मोहन आगाशे) यांच्या अर्धवट राहिलेल्या प्रोजेक्टमुळे ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याची संधी मिळते. फाऊंडरच्या प्रोजेक्टच्या मदतीने वीरूला अनयाचा होलोग्राम (संगणकीय आभासी प्रतिकृती) यशस्वीपणे तयार करता येतो. या कृत्रिम अनयाबरोबरची वीरूची मैत्री एकीकडे आणि दुसरीकडे खऱ्या अनयाशी वाढत चाललेला दुरावा हे द्वंद्व दिग्दर्शकाने चांगले रंगवले आहे. मात्र, अनयाची ही प्रतिकृती ‘फुंतरू’ बनवण्यापर्यंतचा प्रवास दिग्दर्शकाने सहजी रंगवला असला तरी नंतर मूळ कथेतच थोडा गोंधळ उडालेला दिसतो.

‘फुंतरू’च्या निर्मितीचा उद्देश काय, तिच्यावर वीरूचे नियंत्रण असते की काही काळाने तीच वीरूवर नियंत्रण ठेवते आहे, असे कित्येक प्रश्न वेगाने तयार होतात. फुंतरूला वास आणि स्पर्शाची जाणीव देण्याचा प्रयत्न वीरूने केल्यानंतर आपण अनया आहोत की फुंतरू हा तिचा उडालेला गोंधळही लक्षात येण्यासारखा आहे. त्यानंतर मात्र फुं तरूचे आपोआप अपडेट होत जाणे, नॅनोने वीरूचा हा प्रताप खऱ्या अनयासमोर उघड केल्यानंतर फुं तरूचे स्पष्टीकरण, तिचे स्वत:च नाहीसे होणे या सगळ्या गोष्टी कोडय़ात टाकतात. अभिनयाच्या बाबतीत केतकी आणि मदन या दोन्ही मुख्य व्यक्तिरेखांसह शिवराज वायचल, रोहित निकम, ऋतुराज शिंदे सगळ्यांचा सहज अभिनय एकदम फ्रेश वाटतो. सुजयचा ‘आजोबा’ कथेत पूर्णपणे फसला होता. ‘फुंतरू’मध्ये ठोस हाती काही लागत नसलं तरीही मुळात कथेतलं आणि मांडणीतलं नावीन्य चित्रपटात पुरेपूर उतरलं आहे. एकदा तरी पाहावा, असा हा साय-फायपट आहे.

फुंतरू

निर्मिती – इरॉस इंटरनॅशनल

दिग्दर्शक – सुजय डहाके

कलाकार – मदन देवधर, केतकी माटेगावकर, शिवराज वायचल, रोहित निकम, ऋ तुराज शिंदे, शिवानी रंगोले.

चित्ररंग : रेश्मा राईकवार