‘व्हॅलेंटाईन’च्या महिन्यात पहिल्याच आठवडय़ात प्रदर्शित झालेला प्रेमपट म्हणून खरं म्हणजे अगदी छापेबाज नाव घेऊन आलेल्या ‘सनम तेरी कसम’बद्दलही उत्सुकता होती. बॉलीवूडमध्ये दर एक काळानंतर ‘सनम तेरी कसम’ची नवनवीन आवृत्ती पाहायला मिळते. कधी गाण्यांमधून सनमची कसम घेतली जाते, कधी कथानकच त्याच्याभोवती गुंडाळलं जातं. मात्र या चित्रपटात सनम म्हणजेच मुख्य नायिका सरस्वती पार्थसारथी हिच्या प्रेमकहाणीऐवजी तिची शोकांतिकाच पाहायला मिळते आणि कमाल म्हणजे सरस्वती साकारणाऱ्या पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेनने या व्यक्तिरेखेत इतके कमाल रंग भरले आहेत की प्रेक्षक डोळे पुसतच चित्रपटगृहाबाहेर पडतो.

‘सनम तेरी कसम’ची कथा घडते आजच्याच काळात मात्र तरीही कथेत ज्याप्रमाणे पार्थसारथी कुटुंब आपल्यासमोर येतं ते तसंच आजच्या काळाच्या संदर्भात यायला हवं होतं का? हा प्रश्न पडतो. ठरवून शोकांतिकाच दाखवायची आहे म्हणून मग कथेतले नेहमीचे साचेबद्ध, घासून गुळगुळीत झालेले तणाव, त्याच पद्धतीने आपल्यासमोर येत राहतात. सरस्वती (मावरा होकेन) ही कर्मठ पार्थसारथी नामक दाक्षिणात्य कुटुंबातली मुलगी, तिच्या राहण्यातला कमालीचा साधेपणा हा तिच्या लग्नातला मोठा अडथळा आहे. तिचं लग्न न होणं हा तिच्या छोटय़ा बहिणीच्या आयुष्यातला अडथळा आहे. बहिणीच्या लग्नासाठी का होईना ‘विभूती आंटी’ या आपल्या प्रतिमेतून तिला बाहेर पडायचं आहे. त्यासाठी तिला मदत होते ती इंदरची. त्यांच्याच इमारतीत राहणाऱ्या आणि तिच्या वडिलांच्या तथाकथित सुसंस्कृत शब्दांत कु ठेही न बसणाऱ्या इंदरची मदत घेण्यासाठी एका रात्री त्याच्या फ्लॅटमध्ये सरस्वती शिरते. तिथूनच तिच्या शोकांतिकेची सुरुवात होते. आपली मुलगी आपल्यासाठी मेली, असं तिचे वडील जाहीर करतात. तेव्हाही सरस्वती डगमगत नाही. ती इंदरच्याच मदतीने स्वत:साठी घर शोधते आणि आपल्या वडिलांचे प्रेम मिळवण्यासाठी धडपड करू लागते. पण कथेने इतकं चांगलं वळण घेऊनही बहुधा दिग्दर्शक द्वयीला शोकांतिके पलीकडे फारसे काही वेगळे करावेसे वाटले नसावे. त्यामुळे ते समोर बसलेल्या प्रेक्षकाला रडवण्यासाठीचा एकही प्रसंग सोडत नाहीत.

‘सनम तेरी कसम’ हा चित्रपट राधिका राव आणि विनय सप्रू या जोडीने दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाची नायिका मावरा होकेन हा खरंच सुखद धक्का आहे. पाकिस्तानी अभिनेत्री म्हणून तिचा हा पहिलाच हिंदी चित्रपट, त्यातही तिला कर्मठ कुटुंबातली दाक्षिणात्य तरुणी साकारायची होती. तिचा चित्रपटातील वाव खूपच सहज आणि सुंदर असल्याने हा पूर्णत: तिचा चित्रपट ठरला आहे. नायक म्हणून हर्षवर्धन राणे या तेलुगू अभिनेत्याचाही हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. मात्र चित्रपटभर तो असला तरी त्याच्या व्यक्तिरेखेला करण्यासारखे फारसे क थेतच नसल्याने आहे ती भूमिका त्याने नीटनेटकी निभावली आहे. बाकी सरूच्या वडिलांची भूमिका करणारे मनीष चौधरी, मधूनच पोलीस म्हणून समोर दिसणाऱ्या मुरली शर्मा आणि इंदरच्या वडिलांच्या भूमिकेत चमकून गेलेला अभिनेता सुदेश बेरी वगळता बाकींच्यांचे फारसे महत्त्व नाही. एक चांगला आणि काळाशी सुसंगत असा प्रेमपट प्रेक्षकांच्या वाटय़ाला आला असता. मात्र दिग्दर्शकीय प्रयत्नांमुळे प्रेमकथेऐवजी उत्तम रडवणारी शोकांतिका प्रेक्षकांच्या पदरात पडते.

सनम तेरी कसम

दिग्दर्शक – राधिका राव, विनय सप्रू

कलाकार – हर्षवर्धन राणे, मावरा होकेन, मनिष चौधरी, विनय राज, मुरली शर्मा, सुदेश बेरी

संगीत  – हिमेश रेशमिया