चांगल्या-वाईटाचा विवेक आपल्यात असतो. कित्येकदा अनुभवाच्या जोरावर चांगले काय हे कळत असले तरी खोटय़ा प्रतिष्ठेच्या बुरख्याआड लपलेले आपले चेहरे सत्य स्वीकारायला कधीच तयार होत नाहीत. आपल्याला आपला खोटा चेहरा माहिती असला तरी त्याआड दडून राहणेच आपण पसंत करतो. आणि मग असे कित्येक चेहरे एकत्र येऊन तयार झालेला समाज आपलेच म्हणणे कसे वास्तव आहे हे अधोरेखित करतो. त्याचे अलिखित नियम बनवून ते कटाक्षाने पाळण्यावर समाजाचा भर असतो. असा समाज कधीच बदलाची संधी घेत नाही. झोपल्याला उठवता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही हे आपल्याला माहिती असले, तरी तुम्ही सोंग घेतले आहे हे ठणकावून सांगण्याचे काम ‘हिंदी मीडियम’ या चित्रपटातून दिग्दर्शकाने केले आहे.

इंग्रजी ही भाषा नाही प्रतिष्ठेची खूण मानली जाते आणि म्हणून मुलाला इंग्रजी शाळेत शिक्षण देणे, त्याने घरीदारी इंग्रजीतूनच बोलणे, इंग्रजीत वावरणे असे सगळे इंग्रजाळलेपण आपल्या मुलांनी आणि पर्यायाने आपणही आत्मसात केलीच पाहिजे, हा अलिखित नियम आहे. पण एवढे करूनही तुम्हाला ‘इंडिया’त स्थान मिळेलच असे नाही. कारण तुम्ही भले श्रीमंत असाल, बंगल्यात राहात असाल, आलिशान गाडीतून फिरत असाल पण जर तुम्ही दुकानदार आहात तर तुम्हाला ‘इंडिया’त मान मिळणे कठीणच आहे, हे वास्तव दिग्दर्शक साकेत चौधरी यांनी राज आणि मिता या जोडप्याच्या कथेतून समोर आणले आहे. दिल्लीत चांदनी चौक परिसरात लहानाचा मोठा झालेला, सरकारी शाळेत शिकलेला, टेलरकडे काम शिकत आज चांदनी चौकमध्ये साडय़ांचा ‘स्टुडिओ’ चालवणारा राज बात्रा (इरफान खान) आपल्या पत्नीचा मिताचा (सबा करीम) एकही शब्द खाली पडू देत नाही. मिताही त्याच्यासारखीच सरकारी शाळेत शिकली असली तरी तिचे शिक्षण पूर्ण झाले आहे. राज तनाने आणि मनाने चांदनी चौकचा आहे. तर मिताला मात्र श्रीमंतीचे आकर्षण आहे. या जोडप्याची मुलगी पियाला दिल्लीतील टॉप इंग्रजी शाळेत शिकवण्याच्या मिताच्या महत्त्वाकांक्षेपोटी राजला चांदनी चौक सोडून उच्चभ्रू वस्तीत ‘वसंत विहार’मध्ये यावे लागते. मात्र तरीही पियाच्या अ‍ॅडमिशनचा प्रश्न सुटत नाही.

पियाला प्रवेश न मिळण्यामागे आधी तिच्या आई-वडिलांची ‘चांदनी चौक’वाली देहबोली, अर्धेकच्चे इंग्रजी कारणीभूत असते. इथे त्यांना यासंदर्भात सगळ्या प्रकारचे समुपदेशन करणाऱ्या प्रशिक्षिकेची मदत मिळते. राज आणि मिता तथाकथित उच्चभ्रू पालकांसारखे बनण्यासाठी प्रशिक्षण घेतात, तयारीनिशी मुलाखतीही देतात पण तरीही पियाला त्या शाळेमध्ये प्रवेश मिळत नाही. अखेर पियाला ‘आरटीआय’ अंतर्गत गरीब लोकांच्या कोटय़ातून प्रवेश मिळावा म्हणून हे जोडपे महिनाभर गरीब वस्तीतही राहतात. राज-मिताचा ‘वसंत विहार’मधील अनुभव आणि गरीब म्हणून ‘भारत नगर’ वस्तीतला अनुभव यादरम्यान खूप काही घडते. गरीब वस्तीत अनुभवाला आलेले आपलेपण, पियाला मिळालेले समृद्ध जीवन, प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून शेजाऱ्याच्या मुलीला दाखल्यासाठी पैसे मिळवून देणारा मित्र या सगळ्या अनुभवातून राज-मिता बदलतात. तरीही एक क्षण असा येतो जेव्हा हा खोटा मुखवटा राजला खिजवतो..

‘हिंदी मीडियम’ची सोपी, प्रवाही कथा आणि कुठलाही उपदेश करण्यापेक्षा आपल्या व्यक्तिरेखांच्या जगण्यातून त्यांना जाणवत गेलेला बदल मांडत दिग्दर्शक त्याला जे सांगायचे आहे ते प्रभावीपणे दाखवून देतो. इरफान खानसारखा सहज अभिनय करणारा उत्तम कलाकार असल्याने त्याचा पुरेपूर वापर करत दिग्दर्शकाने शिक्षणासारख्या विषयाच्या माध्यमातून समाजाच्या दांभिकतेवर मार्मिकपणे बोट ठेवले आहे. इरफान खान आणि सबा करीम या दोघांनीही कमाल केली आहे. त्यांना छोटय़ाशाच भूमिकेत दीपक दोब्रियालसारख्या अभिनेत्यानेही उत्तम साथ दिली आहे. ‘हिंदी मीडियम’ हा पूर्णपणे दिग्दर्शकाचा चित्रपट आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आपण काहीतरी मोठी क्रांती करतो आहोत असा कुठलाही अभिनिवेश या चित्रपटात नाही. अत्यंत हलक्या-फुलक्या पद्धतीने आपल्याच जगण्यातील विसंगती दाखवून देत दिग्दर्शकाने साध्या मांडणीतही प्रभावीपणे आपला विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आहे.

चित्रपट : हिंदी मीडियम

  • दिग्दर्शक – साकेत चौधरी
  • कलाकार – इरफान खान, सबा करीम, दीपक दोब्रियाल, अमृता सिंग, स्वाती दास, तिलोत्तमा शोम.