News Flash

अब्बाजी अजूनही आमचे गुरुजी!

कला, ज्ञान, तत्त्वज्ञान याबरोबरच दिलखुलास स्वभाव यासह अनेक गुणांचे मिश्रण म्हणजे झाकीरजींचे व्यक्तिमत्त्व.

(संग्रहित छायाचित्र)

रसिका मुळ्ये

भारतीय संगीताला खऱ्या अर्थाने वैश्विक करणाऱ्या दिग्गजांपैकी एक म्हणजे दिवंगत तबलानवाज उस्ताद अल्लारखा. त्यांचे शिष्य आणि आप्तांच्या जगात त्यांची ओळख अब्बाजी म्हणूनच ठसलेली. आपल्या ज्ञानदानाने कलाकारांच्या पिढय़ा अब्बाजींनी घडवल्या. त्यांचा ३ फेब्रुवारीला विसावा स्मृतिदिन. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी पहिल्या स्मृतिदिनापासून ‘होमेज टू अब्बाजी’ या विशेष मैफलीचे आयोजन केले जाते. या माध्यमातून उस्ताद अल्लारखा यांचे सांगीतिक तत्त्वज्ञान समजून घेत संगीताचे वैश्विक स्वरूप आत्मसात करणारी पिढी घडत आहे.. अब्बाजींचे पुत्र आणि शिष्य उस्ताद झाकीर हुसेन यांच्यासह सर्वच शिष्य त्यांचा वारसा पुढे नेत आहेत. झाकीरजींना नुकतीच बोस्टन येथील ‘बर्कली कॉलेज ऑफ म्युझिक’ आणि छत्तीसगड येथील ‘इंदिरा कला संगीत विद्यालय’ या संस्थांनी मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे. ‘अ होमेज टू अब्बाजी- उस्ताद अल्लारखाँ’ या उपक्रमाच्या निमित्ताने अब्बाजींच्या आठवणी, सांगीतिक विचार यांबाबत झाकीरजींशी ‘लोकसत्ता’ने साधलेला संवाद.

कला, ज्ञान, तत्त्वज्ञान याबरोबरच दिलखुलास स्वभाव यासह अनेक गुणांचे मिश्रण म्हणजे झाकीरजींचे व्यक्तिमत्त्व. स्वत: जगद्विख्यात कलाकार असतानाही आपल्या मित्राला म्हणजेच पंडित रविशंकर यांना माध्यमांशी बोलता यावे म्हणून त्यांची सतार स्वत: घेऊन उभे राहण्याचा अब्बाजींचा उमदेपणाही झाकीरजींना वारशात मिळाला आहे. वयाच्या सातव्या वर्षांपासून मैफली गाजवताना साठलेले किस्से आठवणींच्या पोतडीतून काढताना मध्येच एखादी नक्कल होते, गाण्याची गुणगुणही होते. अब्बाजींचा विषय निघतो तेव्हा नाते, संगीत याबद्दल एक चिंतन प्रकट होते. ‘अब्बाजी आणि माझे नाते नेमके कसे होते, हे मी अजून शोधतो आहे. अजूनही मी अब्बाजींकडून शिकतो आहे,’ या उत्तरात या नात्याची घट्ट वीण आणि समृद्धी लक्षात यावी.

अब्बाजी आणि त्यांच्या नात्याबाबत झाकीरजी यांनी सांगितले, ‘गुरू-शिष्य, पिता-पुत्र, मित्र, सहकारी अशा आमच्या नात्याच्या अनेक बाजू आहेत. इतके आयाम असलेल्या नात्याची दुर्मीळ उदाहरणे आहेत. माझ्याकडे अब्बाजी आणि माझ्या संभाषणाच्या अनेक कॅसेट्स आहेत. त्यातून अब्बाजी आणि आमचे नाते उलगडण्याचा मी प्रयत्न करतो आहे. फक्त संगीत नाही तर एकूण जीवन, तत्त्वज्ञान यांचे धडे या गप्पांमधून मला मिळतात. अम्मीबरोबरचे नाते, शिष्य म्हणून केलेले मार्गदर्शन, अली अकबर खाँसाहेब, विलायत खाँसाहेब,  सितारादेवी, पंडित रविशंकरजी, बिरजू महाराज यांसारख्या अनेक कलाकारांबरोबरील त्यांचा संवाद हे सर्व ऐकणे ही आजही शिकण्याची मोठी प्रक्रिया असते. अब्बाजी जेव्हा साथ करायचे तोही एक संवाद असायचा, त्यातून नात्याचे एक छान रूप समोर यायचे. नात्यांचे पदर उलगडताना हे सर्व शिकणे अपेक्षित असते. शिकण्याची ही प्रक्रिया नेहमी सुरू असते.’

भारतीय संगीतक्षेत्रात गुरू-शिष्यांची मोठी परंपरा आहे. पुत्राने पित्याचा सांगीतिक वारसा जोपासल्याची अनेक उदाहरणे आहेत. झाकीरजी आणि त्यांचे बंधू तौफिक कुरेशी आणि फजल कुरेशी हे तिघेही अब्बाजींचा वारसा पुढे नेत आहेत. तिघांचेही गुरू एकच असले तरी तिघांचे आपापले स्वतंत्र स्थान आहे, ओळख आहे. ‘माझी मुले माझ्यासारखी होऊ  नयेत. त्यांनी त्यांचे वेगळेपण शोधावे’ ही अब्बाजींची मनीषा त्यांच्या तिघा पुत्रांनी पूर्ण केली आहे. याबाबत झाकीरजी म्हणाले, ‘आम्हा तिघांची आपापली शैली आहे. एकमेकांपेक्षा ती पूर्ण वेगळी आहे. आमच्या गुरूंनी आमच्यातली खुबी ओळखली आणि ती जपण्याचे, विकसित करण्याचे स्वातंत्र्य दिले. आमच्या तिघांच्याही वादनात अब्बाजींची झलक असते तरीही आमच्यात वेगळेपण आहे. मूळ गाभा जपून प्रत्येक शिष्य आपापली शैली विकसित करतो तेव्हा कला, गुरूंची परंपरा पुढे जाते. गुरूंची नक्कल करणे म्हणजे विकास नाही. ही दृष्टी अब्बाजींनीच दिली. मी एकदा अब्बाजींच्या गुरुजींची ध्वनिफीत ऐकली. अब्बाजी जे वाजवत त्यापेक्षा त्यांच्या गुरुजींचे वादन वेगळे होते. त्याबाबत अब्बाजींना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले, ‘हेच अपेक्षित आहे. गुरुजींनी मला शिकवले. परंतु ते मला जसे भावले तसे ते माझ्या वादनात उतरणे आवश्यक आहे. एखादी गोष्ट गुरूंनी जशी सांगितली मी तशीच्या तशी पाठ करून फक्त म्हणून दाखवली तर काय उपयोग? मला त्या गोष्टीतून काय कळले हे माझ्या सादरीकरणातून दिसायला हवे. संगीताचेही असेच आहे. शिष्याच्या वादनात गुरुजींची छटा असते, परंतु तरीही तो स्वतंत्र आविष्कार असावा, याची जाणीव आम्हा प्रत्येक शिष्याला अब्बाजी नेहमी करून देत असत. उत्तम कलाकार असेल तरी तो उत्तम शिक्षक असेल असे नाही. अब्बाजी मात्र उत्तम कलाकार होते तितकेच उत्तम गुरू होते.’

अब्बाजींना अभिवादन करण्यासाठी झाकीरजी आणि त्यांचे बंधू ‘अ होमेज टू अब्बाजी’ या महोत्सवात एकत्र वादन करणार आहेत. तीस वर्षांनंतर हा योग जुळून येणार आहे. यंदा अब्बाजींच्या जन्मशताब्दी वर्षांची सांगता होत आहे आणि त्यांचे मित्र दिवंगत ज्येष्ठ सतारवादक पंडित रविशंकर यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. यंदाही षण्मुखानंद सभागृहात ३ फेब्रुवारी रोजी पहाटे ६.३० वाजल्यापासून संगीताचा सर्वसमावेशक, वैश्विक आविष्कारांचा सोहळा रंगणार आहे. झाकीरजींच्याच शब्दात सांगायचे झाल्यास, ‘संगीतात नावीन्याची बीजे रुजवणारे, भौगोलिक सीमांची मर्यादा ओलांडणारे अब्बाजी, पं रविशंकरजी आणि त्यापूर्वीच्याही अनेक संगीतकारांसाठी ही मैफल म्हणजे खऱ्या अर्थाने आदरांजली ठरणार आहे.’

‘भारतीय संगीतात फ्यूजन पूर्वीपासूनच..’

शास्त्रीय संगीत हे घोकंपट्टीत अडकलेले नाही. काही तरी नवे करण्याचीच अपेक्षा शास्त्रीय संगीतात आहे. उस्ताद अब्दुल करीम खाँसाहेब हे किरण्याहून आले होते. मिरजमध्ये स्थायिक झाले. गंगुबाई हनगल, हिराबाई बडोदेकर, मल्लिकार्जुन मन्सूर, भीमसेनजी यांनी खाँसाहेबांकडून प्रेरणा घेतली होती. परंतु प्रत्येकाची शैली वेगळी होती. स्थानिक भाषा, लोककला याचाही त्यांच्यावर प्रभाव दिसतो. ते फ्युजनच होते. शुद्धता किंवा मूळ स्वरूप हे मुद्दे काहीसे संदिग्ध आहेत. शुद्धतेची संकल्पना हा अन्वयार्थातील फरक आहे. हजारो वर्षांपासूनची परंपरा आहे. त्यातील हजार वर्षांपूर्वीचे मूळ किंवा शुद्ध स्वरूप मी आज कसे ताडावे? प्रत्येकाच्या आवडीनिवडी, आठवणी, भावना असतात, कलेशी, कलाकारांशी नाते जुळलेले असते. त्या आठवणी किंवा नाते ही प्रत्येकासाठी शुद्धता असते. त्याला धक्का लागला की मग शुद्धता हरवल्यासारखे वाटू लागते. आहे ते जपलेच पाहिजे परंतु प्रवाही असायलाच हवे. आज ‘फ्युजन’ अशी ओळख आहे ते आपल्या संगीतात पूर्वीपासूनच होते. ख्याल हे त्याकाळी फ्युजनच होते. अमीर खुसरो यांनी धृपद आणि कलबा यातून काही नवे तयार केले. त्यांना काही प्रयोग करून नवे शोधायचे नव्हते. त्यांना संगीताचा आनंद घ्यायचा होता. रविशंकरजी, अब्बाजी, मी आणि अनेकांना फ्युजन किंवा नावीन्याचे श्रेय दिले जाते. पण खरे तर आम्ही वेगळे काहीच केले नाही. जगात जे होते त्यातून शिकण्याची संधी मिळाली आम्ही ते मांडले. मी आणि जॉन मक्लॉफलिन आमची ‘शक्ती’ ही पहिली ध्वनिफीत तयार झाली तेव्हा त्या कॅसेट कंपनीने आम्हाला विचारले की, याला कोणता संगीत प्रकार म्हणायचे? आम्ही ठरवून काहीच केले नव्हते. परंतु ती ध्वनिफीत बाजारात उपलब्ध करून देताना त्याला ओळख देणे आवश्यक होते. त्या वेळी त्या कंपनीने फ्युजन अशी ओळख दिली.

‘अ होमेज टू अब्बाजी’

* ‘अ होमेज टू अब्बाजी – उस्ताद अल्लारखा’ ही मैफल सोमवार, ३ फेब्रुवारी रोजी श्री षण्मुखानंद चांद्रसेकारेंद्र सरस्वती सभागृहात होणार आहे. यंदाही देशविदेशातील दिग्गज कलाकारांचे सादरीकरण अनुभवण्याची संधी या माध्यमातून संगीतप्रेमींना मिळणार आहे.

* ‘ताल प्रणाम’ हे पहिले सत्र पहाटे ६.३० वाजता ‘उस्ताद अल्लारखाँ इन्स्टिटय़ूट ऑफ म्युझिक’च्या विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने मैफल सुरू होईल, प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांचे गायन, त्यानंतर पुरबायन चॅटर्जी यांचे सतारवादन होणार आहे. त्यांना ओजस अधिया तबल्याची साथ करणार आहेत.

* ‘ताल तपस्या’ या दुसऱ्या सत्राची सुरुवात ११.३० वाजता झाकीर हुसेन (तबला), फझल कुरेशी (तबला) आणि तौफिक कुरेशी (डीजेम्बे) हे तिघे बंधू करणार आहेत. त्यानंतर दिवंगत ज्येष्ठ तबलावादकपं. किशन महाराज यांचे नातू शुभ महाराज यांचे तबलावादन, दिवंगत धृपद गायक रमाकांत गुंदेचा यांचे बंधू अखिलेश गुंदेचा यांचे पखवाजवादन आणि  त्रिची शंकरन यांचे मृदंगवादन होणार आहे.

* ‘सेलिब्रेट अब्बाजी’ हे तिसरे सत्र सायंकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. त्याची सुरुवात दक्षिण भारतीय तालवादकांच्या सादरीकरणाने होईल. झाकीरजींसह ड्रमर ग्रेग एलिस, जिनो बँक्स, लुईस बँक्स (पियानो), संजय दिवेचा (गिटार), गणेश राजगोपालन (व्हायोलिन), सेल्वा गणेश (खंजिरी), शेल्डन डिसिल्व्हा (बास) यांचे एकत्रित वादन होणार आहे. त्यानंतर सलीम सुलेमान आणि त्यांच्या साथीदारांचे सादरीकरण होईल. झाकीरजी आणि देश-विदेशातील कलाकारांच्या एकत्रित सत्राने मैफलीची सांगता होईल (ही मैफल मोफत असून त्याच्या प्रवेशिका ‘बुक माय शो’या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.).

गुरूसमोर वाद्य घेऊन बसणे आणि त्याचे बोल शिकणे एवढय़ापुरते गुरू-शिष्याचे नाते मर्यादित नाही. ते एकमेकांत विरघळून जायला हवे. त्यातील अंतर कमी व्हायला हवे. उत्तम संवाद निर्माण झाला की शिष्याचा विकास होतो. अब्बाजींचे आम्ही भावंडं आणि शिष्यांबरोबर असेच एकमेकांत विरघळलेले नाते होते.

– उस्ताद झाकीर हुसेन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2020 4:46 am

Web Title: loksatta ustad allarakha memories interview with zakir hussain abn 97
Next Stories
1 बॉलीवूडचे ‘पापाराझी’
2 टेलीचॅट : नाटय़वेडी..
3 चित्र चाहुल : पुढचं पाऊल..