अमिताभ हे रूपेरी पडद्यावरचे कायमचे चलनी नाणे आहे. त्यामुळेच आजही तो स्वत: काम करीत असलेले चित्रपट धो धो चालतातच; शिवाय त्याच्या सुवर्ण काळात धो धो चाललेल्या चित्रपटांचे रिमेकही तसेच दणक्यात चालतात. शाहरूखने साकारलेला ‘डॉन’, हृतिक रोशनचा ‘अग्निपथ’ या दोन्ही रिमेकना प्रेक्षकांनी भरघोस पाठिंबा दिला. आता लवकरच अमिताभचा ‘पहिला मास्टरपीस’ ‘जंजीर’चा रिमेक येऊ घातला आहे. पाठोपाठ ‘पेन इंडिया’ या कंपनीतर्फे ‘आखरी रास्ता’ आणि ‘अंधा कानून’ यांचेही रिमेक येत आहेत. अमिताभचा करिष्मा आजही कायम असल्याचेच हे द्योतक आहे.
पेन इंडियाचे प्रमुख जयंतीलाल गाडा स्वत:च अमिताभचे मोठे चाहते आहेत. ‘शोले’ची थ्रीडी आवृत्ती आम्ही तयार करीत असून त्यात अमिताभचे मोठे सहकार्य आम्हाला मिळाले आहे. त्याशिवाय ‘महाभारत’ हा अ‍ॅनिमेशनपटही करणार आहोत. त्यात अमिताभ बच्चन भीष्म पितामह यांची भूमिका साकारत आहेत. आजच्या काळाला अनुसरून रिमेक करण्याची क्षमता असलेले अमिताभचे ८-१० चित्रपट आहेत. त्यापैकी ‘आखरी रास्ता’ आणि ‘अंधा कानून’ यांची कथानके रिमेकसाठी अधिक उपयुक्त असल्याचे आम्हाला जाणवले. म्हणून हे दोन रिमेक करणार असल्याचे गाडा यांनी सांगितले.
जून १९८६ मध्ये झळकलेला ‘आखरी रास्ता’ हा अमिताभचा शेवटचा सुपरहिट सिनेमा मानला जातो. जयाप्रदा आणि श्रीदेवी ही
तेव्हाची ‘हिट अँड हॉट’ जोडी अमिताभच्या दुहेरी भूमिकांतील नायिका होत्या. तर १९८३ मधील ‘अंधा कानून’मध्ये अमिताभ सहाय्यक भूमिकेत होता तरी त्याची भूमिका अधिक महत्त्वाची आणि जास्त लांबीची होती. प्रेक्षकांनीही तो ‘अमिताभचा’ चित्रपट म्हणूनच पाहिला होता. ‘दक्षिणेतील अमिताभ’ रजनीकांत, रीना रॉय, हेमा मालिनी यांच्या त्यात प्रमुख भूमिका होत्या.