News Flash

‘हॅशटॅग प्रेम’

समाजमाध्यमे आणि हॅशटॅग काळातील प्रेमाची कथा या चित्रपटात रंगवण्यात आली आहे.

 

आजच्या समाजमाध्यमांच्या जगातील प्रेमाची गोष्ट आणि सुयश टिळक-मिताली मयेकरसारखे तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेले कलाकार या दोन्ही गोष्टी एकत्र असलेला ‘हॅशटॅग प्रेम’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सुयश आणि मितालीची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार असल्याने त्याबद्दलही प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे.

समाजमाध्यमे आणि हॅशटॅग काळातील प्रेमाची कथा या चित्रपटात रंगवण्यात आली आहे. निर्माते अनिल गोविंद पाटील यांची निर्मिती असलेला हा चित्रपट वितरक समीर दीक्षित आणि हृषीकेश भिरंगी यांच्या सहकार्याने सिनेरसिकांसमोर प्रस्तुत केला जाणार आहे. दिग्दर्शक राजेश जाधव यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा सिनेमा सर्वार्थाने आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारा असून, तरुणाईला मार्गदर्शक ठरणारा आहेच, परंतु एक सुज्ञ विचार देणाराही आहे, असे मत या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात उतरलेल्या अनिल पाटील यांनी व्यक्त के ले. गेली अनेक वर्षे मराठी सिनेवितरणाचा अनुभव गाठीशी असलेले समीर दीक्षित या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच वितरणाबरोबर निर्मात्यांच्या जोडीने चित्रपट प्रदर्शित करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आम्ही नेहमीच रसिकांची आवडनिवड जोपासत आणि कलेचा उचित सन्मान राखत रसिकांचे मनोरंजन केले असून ‘हॅशटॅग प्रेम’ हा आगामी सिनेमा हाच आमचा वसा जोपासणारा असल्याचे मत समीर दीक्षित आणि हृषीकेश भिरंगी यांनी व्यक्त केले आहे.

चित्रपटाची कथा-पटकथा निखिल कटारे यांची असून संगीतकार प्रवीण कुवर यांनी संगीत दिले आहे. नृत्यदिग्दर्शन आशीष पाटील यांनी केले असून कलादिग्दर्शन केशव ठाकूर यांचे आहे. छायाचित्रणकार राजा फडतरे यांच्या नजरेतून हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

गायक, संगीतकार… उपेंद्र लिमये!

अभिनेता उपेंद्र लिमयेने विविध चित्रपटांतून आपल्या धारदार आवाजाच्या आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर स्वत:ची वेगळी छाप उमटवली आहे. चोखंदळ भूमिकेसाठी ओळखले जाणारे उपेंद्र सध्या गायक-संगीतकाराच्या भूमिकेत पाहायला मिळतायेत. नेहमीच निरनिराळ्या भूमिका करण्याला प्राधान्य देणारे उपेंद्र अशीच एक वेगळी भूमिका ‘प्रीतम’ या आगामी चित्रपटातून साकारणार आहेत. त्यासाठीच त्यांनी हार्मोनियमवर आलाप आणि ताना घेत गाण्याचा सूर धरला आहे. संगीतातील त्यांचे हे नवं पाऊल आगामी ‘प्रीतम’ या मराठी चित्रपटातील एका गाण्यासाठी असून उपेंद्र लिमये यांचा हटके अंदाज यात पाहायला मिळतो आहे. येत्या १९ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘पावलो म्हसोबा रे…धावलो पिसोबा रे’ असे बोल असलेलं ‘प्रीतम’ चित्रपटातील हे भन्नाट गाणं अभिनेता उपेंद्र लिमये व प्रणव रावराणे यांच्यावर चित्रित झालं आहे. हे गाणं मस्त जमलं असून शब्द सुरांचा भन्नाट मिलाफ हे या गाण्याचं वेगळेपण म्हणता येईल. या गाण्यातून कोकणातल्या संस्कृतीच दर्शन घडवतानाच प्रेमाचा व आपुलकीचा रंगही जाणवतो. उपेंद्र लिमये यांच्यासोबत प्रणव रावराणे आणि नक्षत्रा मेढेकर ही फ्रेश जोडी ‘प्रीतम’ मध्ये पहायला मिळणार आहे. ‘प्रीतम’ चित्रपटाची निर्मिती फैजल नितीन सिजो यांनी केली आहे.  सिजो रॉकी यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. चित्रपटाची गीते गुरू ठाकूर यांनी लिहिली असून पाश्र्वासंगीत विजय गावंडे यांचे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2021 12:09 am

Web Title: love hashtag akp 94
Next Stories
1 प्रेक्षक प्रतीक्षा पूर्णत्वाची
2 आंदोलनावरची कल्लाकारी!
3 विनोदाची वाढती मात्रा
Just Now!
X