18 February 2019

News Flash

‘लव्ह सोनिया’साठी अवघ्या बॉलिवूडचा पुढाकार

१७ वर्षांच्या एका मुलीच्या जिद्दीची कहाणी असलेल्या या सिनेमावर बॉलिवूडमधील दिग्गज कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

'लव्ह सोनिया'

मानवी तस्करी आणि वेश्याव्यवसायाच्या विश्वाचं अत्यंत वास्तवपूर्ण आणि परिणामकारक चित्रण करणाऱ्या ‘लव्ह सोनिया’ या तबरेज नुरानी दिग्दर्शित सिनेमाचं बॉलिवूडमधील आघाडीचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते करत आहेत. १७ वर्षांच्या एका मुलीच्या जिद्दीची कहाणी असलेल्या या सिनेमावर बॉलिवूडमधील दिग्गज कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

बॉलिवूडचा आघाडीचा निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने म्हटलं, ‘स्वत:च्या बहिणीच्या सुटकेसाठी धैर्याने लढणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीची कहाणी सांगणारा ‘लव्ह सोनिया’ हा सिनेमा मी आजवर पाहिलेल्या सिनेमांमधला सर्वात ताकदवान सिनेमा आहे. बॉलिवूडमध्ये यशस्वी दिग्दर्शक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजकुमार हिरानी यांनी म्हटलं, ‘मी ‘लव्ह सोनिया’ पाहिला. सखोल संशोधनावर आधारीत हा सिनेमा पाहून तुम्हाला धक्का बसेल आणि ज्या जगात आपण जगतोय त्याबाबत विचार करायला तुम्हाला प्रवृत्त करेल.’

बॉलिवूडच्या या प्रतिसादाविषयी अधिक माहिती देताना ‘लव्ह सोनिया’च्या सहनिर्मात्या आणि सम्राज टॉकीजच्या शालिनी ठाकरे यांनी सांगितलं की, ‘लव्ह सोनियामध्ये जी ‘दुसरी’ दुनिया दाखवण्यात आली आहे, ती यापूर्वी इतक्या परिणामकारक पद्धतीने कधीच सिनेमातून पुढे आली नव्हती. बॉलिवूडमधील ज्यांनी ज्यांनी हा सिनेमा पाहिला ते अक्षरश: सुन्न झाले, इतका तो वास्तवाला थेट भिडणारा सिनेमा आहे. या जगात महिलांचं ज्या पद्धतीने शोषण केलं जातं, त्याबाबतचं सिनेमातून वास्तव दर्शन घडवणं हीच एक प्रकारची कलात्मक जनजागृती म्हणायला हवी. त्यामुळेच बॉलिवूडमधील नावाजलेले निर्माते-दिग्दर्शक-अभिनेते अगदी मुक्तकंठाने स्तुती करून या एका चांगल्या कलाकृतीला आपला हातभार लावत आहेत.’

‘अक्षय कुमार, हृतिक रोशन, अनिल कपूर, सुनील शेट्टी, सिद्धार्थ मल्होत्रा, दिया मिर्झा यांसारखे अभिनेते, तर करण जोहर, राजकुमार हिरानी, निखिल अडवाणी, साजिद खान यांसारख्या निर्माते-दिग्दर्शकांनी सोशल मीडियावर ‘लव्ह सोनिया’चं भरभरून कौतुक केलं आहे’, असंही शालिनी ठाकरे यांनी सांगितलं.

First Published on September 11, 2018 11:52 am

Web Title: love sonia praised by bollywood celebrities frieda pinto mrunal thakur and richa chadha