बॉलीवूडमध्ये वर्षभर या ना त्या कारणाने प्रेमपटांचा रतीब सुरूच असतो किंवा चित्रपटाची कथा काहीही असली तरी त्यात प्रेमकथा महत्त्वाचीच असते. मात्र या महिन्याभरात ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने जवळपास आठ हिंदी प्रेमपट प्रदर्शित होत आहेत. शिवाय, ‘प्रेमकहानी’ नावाचा मराठी चित्रपटही गेल्या आठवडय़ात प्रदर्शित झाला आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीत एकही प्रेमपट नव्हता, तर या वर्षी एखाददुसरा अपवाद वगळता जवळपास सर्वच चित्रपटांच्या नावातच ‘प्रेम’ आहे.

‘व्हॅलेंटाइन डे’ हा बॉलीवूडच्या निर्मात्यांसाठी फार खास, चांगला मुहूर्त असतो असे काही नाही. पण एखादी गोष्ट जर प्रसिद्ध झाली तर त्याच धर्तीवरच्या चित्रपटांची एक लाटच येते. यामागचे नेमके कारण अजून लक्षात आलेले नाही, मात्र या फेब्रुवारीत अशीच प्रेमपटांची लाट आली आहे. त्याची सुरुवात पहिल्याच आठवडय़ात प्रदर्शित होणाऱ्या ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटापासून होणार आहे. राधिका राव आणि विनय सप्रू या जोडगोळीने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात तेलुगू अभिनेता हर्षवर्धन राणे आणि पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन पहिल्यांदाच हिंदी चित्रपटात काम करणार आहेत. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दोन दिवस आधी शुक्रवारी अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘फितूर’ हा चित्रपट प्रदर्शित होईल. चार्ल्स डिकन्सच्या ‘ग्रेट एक्स्पेक्टेशन’ कादंबरीवर आधारलेल्या या चित्रपटात सुंदर काश्मीरच्या पाश्र्वभूमीवर घडणारी शहरी प्रेमकथा रंगवण्यात आली असून आदित्य रॉय कपूर आणि कतरिना कैफ ही जोडी पहिल्यांदाच प्रेमी जोडी म्हणून रु पेरी पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटाबरोबरच दिव्या खोसला दिग्दर्शित ‘सनम रे’ आणि अध्ययन सुमनची मुख्य भूमिका असलेला ‘लखनवी इश्क’ हे आणखी दोन प्रेमपट प्रदर्शित होणार आहेत. पुलकित सम्राट आणि यामी गौतम यांचा ‘सनम रे’ हा आधीपासूनच चर्चेत आहे. त्यामुळे तरुणाईसाठी ‘व्हॅलेंटाइन डे’ची सुरुवात आधीच्याच आठवडय़ापासून होणार आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

‘व्हॅलेंटाइन डे’च्याच आठवडय़ात ‘डायरेक्ट इश्क’, ‘इश्क फॉरेव्हर’, ‘लव्हशुदा’ असे तीन प्रेमपट पाहायला मिळणार आहेत.

हे तिन्ही चित्रपट तुलनेने नवीन दिग्दर्शक आणि नवीन चेहऱ्यांचे असले तरी गिरीश कुमार आणि नवनीत कौर धिल्लाँ या जोडीच्या ‘लव्हशुदा’बद्दल प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात संदेश नायक दिग्दर्शित ‘लव्हशगुन’ हा आठवा प्रेमपट प्रदर्शित होईल.

प्रेमपटांच्या या लाटेत नेमके किती प्रेक्षकांना लक्षात राहतील, हा विचार बाजूला ठेवला तरी या महिन्यात बॉलीवूडकडे प्रेमाशिवाय दुसरा रंग नाही हे निश्चित झाले आहे.