04 December 2020

News Flash

रोमान्स नसलेला प्रेमपट!

प्रेमकथापट म्हटले की लगेचच प्रेमी जोडय़ा आठवतात. हिंदी सिनेमातील प्रेमकथापटांच्या ढोबळ कथानकांचा अंदाज प्रेक्षकांना लगेच येतो. ‘आशिकी २’ हा तर याच नावाच्या गाजलेल्या चित्रपटाचा सीक्वेलपट

| April 27, 2013 11:59 am

प्रेमकथापट म्हटले की लगेचच प्रेमी जोडय़ा आठवतात. हिंदी सिनेमातील प्रेमकथापटांच्या ढोबळ कथानकांचा अंदाज प्रेक्षकांना लगेच येतो. ‘आशिकी २’ हा तर याच नावाच्या गाजलेल्या चित्रपटाचा सीक्वेलपट आहे म्हटल्यावर प्रेक्षकांना थोडीफार कल्पना येते. परंतु, या कल्पनेला दिग्दर्शकाने धक्का दिला आहे. प्रेमकथापट म्हणून अपेक्षित केला जाणारा रोमान्स, चुंबनदृश्ये, श्रवणीय संगीत याचा अभाव असलेला हा चित्रपट आहे.
भट कॅम्पचे चित्रपट म्हटले की, संगीतमय चित्रपटाची अपेक्षा केली जाते. त्यात आशिकी  चित्रपटाची नदीम-श्रवण यांच्या संगीताने सजलेली गाणी प्रचंड लोकप्रिय ठरल्यामुळे सीक्वेलपटातील गाणीही श्रवणीय असतील. आणि गाण्यांतून चित्रपट खुलत जाईल अशी अपेक्षा होती. परंतु, ती दिग्दर्शकाने फोल ठरवली. विशेष म्हणजे संगीताची पाश्र्वभूमी असलेले नायक-नायिका असूनही गाणी प्रभावी नाहीत.
आरजे राहुल जयकर हा गर्भश्रीमंत गायक यशाच्या शिखरावर असतो. परंतु, मद्यसेवनाच्या आहारी गेल्यामुळे पैसा-प्रतिष्ठा याची फिकीर तो करीत नाही. मनस्वी स्वभाव हे राहुल जयकरचे वैशिष्टय़ आहे. स्टेज शो करीत असताना मद्य पित पित गाणे, प्रसंगी हाणामारी करणे यातून त्याचे व्यक्तिमत्त्व मनस्वी पण बेफिकीर आहे हे दाखविण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरलाय. गोव्याला गेला असताना आरजे राहुल जयकरचे गाजलेले गाणे गाणारी तरुणी तो पाहतो आणि आपल्यापेक्षा हिलाच संगीताची चांगली जाण आहे असे त्याला वाटते. म्हणून तो तिला पाश्र्वगायक बनविण्याचे ठरवितो. आता त्यांची भेट होणार आणि लागलीच प्रेमात पडून एखादे छानसे गाणे ऐकायला मिळेल असे वाटत असतानाच वेगवेगळ्या घटना घडतात आणि त्या दोघांची भेट लांबते. आरजे राहुल जयकर (आदित्य रॉय कपूर) याचा आरोही शिर्के (श्रद्धा कपूर) हिला पाश्र्वगायक बनविण्याचा ध्यास आणि त्यांचे प्रेम याभोवती सिनेमा फिरतो.
अति मद्यपानामुळे बेफिकीर बनलेला गर्भश्रीमंत आरजेच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू आदित्य रॉय कपूरने दाखविण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. श्रद्धा कपूरनेही अभिनयाचा चांगला प्रयत्न निश्चितच केला आहे.
आशिकी या गाजलेल्या चित्रपटाचा सीक्वेलपट म्हणत असताना हा चित्रपट रॉकस्टारच्या जवळ जाणारा वाटतो. आजच्या काळातील प्रेमकथा साकारायची असल्यामुळे नायकाला इतके नकारार्थी आणि आत्मक्लेशी वृत्तीचे दाखविले असावे की काय अशी शंका येते. की वेगळा ‘जरा-हटके’ करण्याची हौस म्हणून असे दाखविले आहे हे न कळे. वास्तविक कलावंतांची नवी जोडी असल्यामुळे त्यांच्यातील रोमान्स, त्यांची केमिस्ट्री तसेच त्याला अनुरूप अशी गाणी असती तर चित्रपट रंगला असता. नकारात्मक सूर आळविणारा आत्मक्लेशी नायक हा नायिकेच्या प्रेमामुळे पुन्हा गायनाकडे वळतो, आपले करिअर घडवितो असे उत्तरार्धात दाखविले जाईल कदाचित अशी अटकळ  बांधत असतानाच चित्रपट वेगळीच वळणे घेतो. अर्थात चुंबनदृश्य आणि पावसातील दोघांचे दृश्य यातून टाळ्या-शिटय़ा घेण्याचा गल्लाभरू प्रयत्न असला तरी ही दृश्ये अतिशय चांगली चित्रित आणि दिग्दर्शित केली आहेत. प्रेमकथापटाला अनपेक्षित असलेली वळणे चित्रपट घेतो पण गती अतिशय धीमी असल्याने मध्यांतरानंतर काहीसा कंटाळवाणाही होतो. आरजे राहुल जयकर – आरोही शिर्के या व्यक्तिरेखांचे एकमेकांशी असलेले नाते प्रस्थापित करण्याचा प्रयत्नही दिग्दर्शकाने अजिबात केला नाही. ‘जरा हटके’ करायचे म्हटल्यावर प्रमुख व्यक्तिरेखांचे नातेच प्रस्थापित करायचे नाही असे दिग्दर्शकाला वाटले असावे.
संवादांमधून आणि छायालेखनातून नायक-नायिका प्रेम व्यक्त करतात. नाही म्हणायला अभिमान चित्रपटातील गायक-गायिका असलेल्या नायक-नायिकांमधील संघर्षांवरून काही छटा दिग्दर्शकाने राहुल जयकर-आरोही शिर्के यांच्या नातेसंबंधांमध्ये दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
हा चित्रपट पाहात असताना आशिकी चित्रपटाची गाणी गुणगुणावीशी वाटतात. तीन संगीतकारांनी मिळून दिलेले संगीत असूनही ‘तुम ही हो’ हे त्यातल्या त्यात श्रवणीय गीत म्हणता येईल. परंतु, आशिकीचा सीक्वेलपट असल्यामुळे गाणी श्रवणीय असण्याची प्रेक्षकाची अपेक्षा पूर्णच फोल ठरते. छायालेखन, दोन्ही प्रमुख कलावंतांची वेशभूषा या बाजू खूपच नेत्रसुखद आहेत. आरोही शिर्के ही मराठी तरुणीची व्यक्तिरेखा असल्यामुळे तिच्या आई-बाबांच्या भूमिकेत मराठी कलावंत घेतले आहेत इतकाच काय तो मराठी स्पर्श सिनेमाला आहे. मनस्वी नायक असल्यामुळे आपल्या मित्रावर प्रचंड रागावलेला राहुल जयकर नंतर मित्र भेटायला येतो तेव्हा सहजपणे पुन्हा त्याच्याशी मैत्री करतो असे काही प्रसंगही जमले आहेत. परंतु, प्रेमपट म्हणून बनविण्यात आलेल्या या चित्रपटात रोमान्सचा संपूर्ण अभाव असल्यामुळे आत्मक्लेशी नायकाप्रमाणेच प्रेक्षकही सरतेशेवटी निराश होतो.
विशेष फिल्म्स प्रस्तुत
आशिकी २
निर्माते – भूषण कुमार, क्रिशन कुमार, मुकेश भट, लेखक – शागुफ्ता रफीकी, दिग्दर्शक – मोहीत सुरी, छायालेखक – विष्णू राव, संगीत – मिथुन, जीत गांगुली, अंकित तिवारी, कलावंत – आदित्य रॉय कपूर, श्रद्धा कपूर, शुभांगी फावडे लाटकर, गिरीश जोशी, शाद रंधावा, महेश ठाकूर, सलील आचार्य

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2013 11:59 am

Web Title: love story without romance
Next Stories
1 सईने नाकारली, रूपालीला मिळाली!
2 इम्तियाज अलीचा आगामी ‘हायवे’
3 आयटम साँगवर रणबीर-माधुरीचे ठुमके
Just Now!
X