बॉलिवूडमध्ये सध्या नव्या धाटणीच्या चित्रपटांची निर्मिती होताना दिसत आहे. त्यामुळे या चित्रपटांनाही साजेसं नाव चित्रपटाच्या टीमकडून देण्यात येत असतं. मात्र अनेक वेळा चित्रपटांच्या नावावरुन नवे वाद झाल्याचं पाहायला मिळालं आहे. काही दिवसापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘पद्मावत’ या चित्रपटाच्या नावावरुनही गदारोळ झाला होता. या वादानंतर आता सलमान खानचा आगामी चित्रपट ‘लवरात्री’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

‘टाईम्स नाऊ’नुसार, सलमान खानच्या निर्मितीअंतर्गत साकारला जाणारा ‘लवरात्री’ हा चित्रपट ५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र त्यापूर्वीच हा चित्रपट अडचणीत आला असून  ‘हिंदू जागरण मंचा’ने या चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेतला आहे.विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी ‘विश्व हिंदू परिषदे’नेदेखील चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळालं होतं.

हिंदू जागरण मंचाकडून ‘लवरात्री’चा निषेध

वाराणसीमध्ये हिंदू जागरण मंचाच्या काही कार्यकर्त्यांनी ‘लवरात्री’ चित्रपटाचा पुतळा तयार करुन तो जाळला आहे. तसंच चित्रपटाचं स्क्रिनिंग होऊ देणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला. या चित्रपटामध्ये हिंदू सणाच्या नावाचा उल्लेख  करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या नावामध्ये केवळ हिंदू सणाचा उल्लेखच नाही तर त्या नावाचा अपमान केला आहे, त्यामुळे हिंदू जागरण मंचाकडून हा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, काही दिवसापूर्वी विश्व हिंदू परिषदेकडून या चित्रपटाचा निषेध करण्यात आला होता. त्यातच आता हिंदू जागरण मंचाने केलेल्या निषेधामुळे सलमानच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. लवरात्री या चित्रपटातून पहिल्यांदाच सलमानचा मेहुणा आयुष शर्मा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.