पुन्हा पाच वेगवेगळ्या विषयांवरच्या चित्रपटांची पर्वणी आज प्रेक्षकांना मिळाली आहे. हिंदीत हंसल मेहता दिग्दर्शित ‘सिमरन’ हा सत्यघटनेवरचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तर त्याच तोडीचा ‘लखनौ सेंट्रल’ हा रणजित तिवारी दिग्दर्शित चित्रपटही थोडी हटके कथा सांगणारा चित्रपट आहे. मराठीत गावागावांतून शाळा टिकवताना येणाऱ्या अडचणींवर बोट ठेवणारा ‘उबुंटू’ हा पुष्कर श्रोत्रीचे पहिलेच दिग्दर्शन असणारा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ‘विठ्ठला शप्पथ’ हा चंद्रकांत पवार दिग्दर्शित मराठी चित्रपटही या वेळी प्रदर्शित झाला असून ‘अमेरिकन असॅसिन’ हा टिपिकल हॉलीवूड अ‍ॅक्शनपटही प्रदर्शित झाला आहे.

लखनौ सेंट्रल

‘प्लान कुछ और है’ असे घोषवाक्य घेऊन आलेला हा चित्रपट तुरुंगातून सुटकेसाठी प्लॅन करणाऱ्या कैद्यांची कुठली तरी गोष्ट सांगणारा असेल, अशी भावना निर्माण करतो. प्रत्यक्षात चित्रपटात सुटकेचे प्लॅन आखले गेले असतीलही पण याची कथा थोडी वेगळीही आहे. कै द्यांच्या म्युझिकल बँडची गोष्ट यात पाहायला मिळणार आहे. फरहान अख्तरची चित्रपटात मध्यवर्ती भूमिका आहे. त्याच्या जोडीला राजेश शर्मा, दीपक दोब्रियाल, इनामुल हक, गिप्पी गरेवाल, रोनित रॉय, रवी किशन, मनोज तिवारी आणि डायना पेंटी अशी तगडी कलाकारांची फौज असल्याने निखिल अडवाणीची निर्मिती असलेला हा चित्रपट नक्कीच लक्ष वेधून घेणारा आहे.

सिमरन

दिग्दर्शक हंसल मेहता आणि कंगना राणावत ही जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आली आहे. चंदिगडमध्ये जन्मलेल्या आणि नंतर आईवडिलांसोबत कॅलिफोर्नियामध्ये स्थायिक झालेल्या संदीप कौर या तरुणीच्या वास्तव कथेवर हा चित्रपट बेतलेला आहे. जुगाराचे व्यसन लागलेली ही तरुणी अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडली. सर्वसामान्य तरुणी ते जुगाराच्या विळख्यात सापडलेली तरुणी असा प्रवास ‘सिमरन’मध्ये पाहायला मिळणार आहे. कंगनाबरोबर निर्माता-अभिनेता सोहम शाहची चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे.

उबुंटू

‘उबुंटू’ हे नाव गोंधळात टाकणारे आहे. या नावाची ऑपरेटिंग सिस्टीम असली तरी त्याचा चित्रपटाशी संबंध नाही. उबुंटूचा अर्थ इथे चित्रपट पाहूनच उलगडलेला बरा. पण या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा गावातील शाळा, या शाळांमधून शिक्षण घेण्यासाठी उत्सुक असलेली पण शिक्षणाचे महत्त्व अजूनही लक्षात न घेणाऱ्या आईवडिलांमुळे शिक्षणापासून वंचित राहणारी मुले असे काहीसे परिचित तरीही दृष्टीआड असणारे विश्व पाहायला मिळणार आहे. अभिनेता पुष्कर श्रोत्रीने या चित्रपटात केवळ दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे असे नाही. तर कथा-पटकथा, संवाद लेखक, निर्माता अशा वेगवेगळ्या आघाडय़ा त्याने सांभाळल्या आहेत. शशांक शेंडे, उमेश जगताप, सारंग साठय़े यांच्यासारख्या अनुभवी कलाकारांबरोबर भाग्यश्री सकपाळ, कान्हा भावे, अथर्व पाध्ये, शुभम पवार अशी बालकलाकारांची फौज या चित्रपटात आहे.

विठ्ठला शप्पथ

पंढरपूरच्या विठूरायाचा महिमा, त्याच्याप्रति असणारी भक्ताची श्रद्धा पुन्हा एकदा ‘विठ्ठला शप्पथ’ या चित्रपटातून उलगडणार आहे. चंद्रकांत पवार दिग्दर्शित ‘विठ्ठला शप्पथ’ या चित्रपटात मंगेश देसाई, अनुराधा राजाध्यक्ष, उदय सबनीस, संजय खापरे, विद्याधर जोशी, अंशुमन विचारे असे नामी कलाकार आहेत. गुरुदर्शन फिल्म्स आणि पहेल प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाची कथा-पटकथा चंद्रकांत पवार यांचीच असून संगीत चिनार-महेश जोडीने दिले आहे.

अमेरिकन असेसिन

हॉलीवूड अ‍ॅक्शनपटांच्या साचेबद्ध चौकटीतून आलेल्या चित्रपटांमध्ये ‘अमेरिकन असेसिन’ हा आणखी एक चित्रपट आहे. १४ व्या वर्षी एका अपघातात आपल्या आईवडिलांना गमावून बसलेला मिच नावाचा तरुण, सीआयएने हेरल्यानंतर त्याच्या विचारांना मिळालेली दिशा, त्याला स्टॅनसारख्या अधिकाऱ्याकडून मिळालेले प्रशिक्षण आणि त्या दोघांनी मिळून उघडकीस आणलेला गैरव्यवहार अशी कथा असलेल्या या चित्रपटात डायलेन ओब्रायन आणि मायकेल कीटन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

बॉक्सऑफिस

  • पोश्टर बॉइज – ९.२५ कोटी
  • इट – १०.७ कोटी
  • बादशाहो – ६४ कोटी
  • शुभमंगल सावधान – ३२.७४ कोटी