करोना व्हायरसमुळे सध्या अनेकांचा मृत्यू होत आहे. फिल्म इंडस्ट्रीमधील देखील अनेक कलाकारांचे निधन झाले. मंगळवारी संध्याकाळपासून सोशल मीडियावर गायक लकी अली यांच्या निधनाच्या अफवा सुरु होत्या. करोनामुळे त्यांचे निधन झाल्याचे म्हटले जात होते. चाहत्यांनी त्यांना सोशल मीडिया पोस्टद्वारे श्रद्धांजली देखील वाहिली होती. त्यानंतर लकी अली यांची मैत्रिण नफीसा अलीने ट्वीट करत या सर्व अफवा असल्याचे सांगितले होते. आता स्वत: लकी अली यांनी पोस्ट शेअर करत या अफवांना पूर्ण विराम दिला आहे.

लकी अली यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये त्यांनी ‘सगळ्यांना नमस्कार, सध्या सोशल मीडियावर माझ्या निधनाच्या अफवा सुरु आहेत. त्यावर मी बोलू इच्छितो. मी जिवंत आणि घरी शांततेत वेळ घालवत आहे. आशा आहे की तुम्ही सर्वजण देखील काळजी घेत आहात आणि सुरक्षित आहात’ असे म्हटले आहे.

यापूर्वी लकी अली यांची मैत्रिण नफीसा अलीने ट्वीट करत या सर्व अफवा असल्याचे सांगितले होते. ‘लकी एकदम ठिक आहे आणि आज दुपारीच आमचे बोलणे झाले आहे. तो त्याच्या कुटुंबीयांसोबत फार्महाऊसवर वेळ घालवत आहे. त्याला करोना झालेला नाही आणि त्याची प्रकृती ठिक आहे’ असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले होते.

गेल्या काही दिवसांपासून लकी अली हे लाइमलाइटपासून दूर आहेत. त्यामुळे मंगळवारी करोनामुळे त्यांचे निधन झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अनेक चाहत्यांनी ट्विटरद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. ते सर्व पाहून लकी अली यांची मैत्रीण नफीसा अलीने ट्वीट केले होते. आता स्वत: लकी अली यांनी पोस्टद्वारे माहिती दिली आहे.