लुकाछुपी

लिव्ह इन रिलेशनशिप हा पुणे-मुंबई-दिल्लीसारख्या मोठय़ा शहरांमधून फारसा बभ्रा करण्यासारखा विषय राहिलेला नसला, तरी गावखेडय़ांमधून जिथे अजूनही जुन्या धार्मिक प्रथा, कुटुंब संस्थेसंदर्भातील सगळे संस्कारही धार्मिकतेशीच जोडलेले आहेत, तिथे अजूनही हा प्रकार संस्कृती भ्रष्ट करणाराच ठरवला जातो. त्यामुळे छोटय़ा शहरांमधून उच्चशिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या तरुण-तरुणींनी त्यांचा जोडीदार निवडण्यासाठी लिव्ह इनचा पर्याय निवडण्याइतके स्वातंत्र्य आजही नाही. नेमके  या मुद्दय़ावर बोट ठेवणारा लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘लुकाछुपी’ हा चित्रपट यासंदर्भात ठोस भाष्य करेल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात लिव्ह इन ते लग्न या प्रक्रियेतील नायक-नायिकेचा लपंडाव आणि त्यातले नाटय़च तेवढे पडद्यावर पाहायला मिळते.

मथुरेतील गुड्डू शुक्ला (कार्तिक आर्यन) आणि रश्मी शर्मा (क्रिती सनन) हे दोघेही लग्न करण्याआधी आपण एकमेकांसाठी लायक आहोत की नाही हे पाहण्यासाठी लिव्ह इन रिलेशनशिपचा पर्याय निवडतात. अर्थात, मथुरेसारख्या शहरात जिथे धर्म, संस्कार या गोष्टींचा पावला-पावलाला जयघोष केला जातो तिथे लिव्ह इन रिलेशनशिपचा विचार करणेही अवघड. त्यातूनही हे दोघे तो पर्याय निवडण्याचे धाडस करतात.  मात्र, मथुरेत घरच्यांना कळू न देता लिव्ह इनमध्ये कुठे, कसे राहणार? असा प्रश्न असतो. त्यांना या गोंधळातून सोडवण्यासाठी या दोघांचाही मित्र अब्बास (अपारशक्ती खुराणा) त्यांना वेगवेगळ्या कल्पना देतो. या कल्पनांच्या आधारे खरोखरच या दोघांचा लिव्ह इन अनुभव साध्य होतो का? या लिव्ह इनचे आणि पर्यायाने चित्रपटाचे फलित काय? (हे खरेतर बॉलीवूडपटात सांगायला नको. लिव्ह इनचा शेवट आपल्याकडे लग्नातच होतो.) या सगळ्याची उत्तरे म्हणजे हा चित्रपट म्हणता येईल.

लक्ष्मण उतेकर हे उत्तम सिनेमॅटोग्राफर आहेत. त्यामुळे या चित्रपटाच्या फ्रेम्स सुंदर आहेत हे वेगळे सांगायला नको. याआधी त्यांनी दोन मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले असल्याने तीही अनुभवी नजर ‘लुकाछुपी’मध्ये जाणवल्याशिवाय राहत नाहीत. त्यामुळे तांत्रिकदृष्टय़ा चित्रपट उत्तमच आहे. केवळ लिव्ह इन ते लग्न असा प्रवास घडवणारी प्रेमकथा म्हणून चित्रपटाकडे पाहायचे ठरवले तर हा एक निखळ मनोरंजक चित्रपट आहे. एकीकडे संस्कृतीरक्षकांचा जयघोष पुन्हा सगळीकडे दुमदुमू लागलेला असताना या चित्रपटातून लिव्ह इनसारखा विषय येणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे साहजिकच चित्रपटाबद्दलच्या अपेक्षाही वाढतात.

चित्रपटात लिव्ह इनव्यतिरिक्त अनेक विषयांवर दिग्दर्शकाने अगदी सहज भाष्य केले आहे. मथुरा, वाराणसीसारख्या ठिकाणी अजूनही असलेला हिंदूत्वाचा अभिमान आणि जातपात-आर्थिक स्थितीवरून होणारे भेदाभेद यावर दिग्दर्शकाने नेमकेपणाने बोट ठेवले आहे. मात्र वास्तव दाखवण्यापलीकडे त्यावर भाष्य करणे टाळले आहे. किंबहुना, वास्तव मांडताना त्याची विनोदी पद्धतीने मांडणी केल्याने आशयातील गांभीर्यच हरवते. त्यातल्या त्यात आजकाल मुलांचा विवाहसंस्थेकडे असलेला कल आणि मुलींचा लिव्ह इनसारख्या वेगळ्या पर्यायांसाठीचा आग्रह हे अचूकपणे पकडत गुड्डुू आणि रश्मी या दोन व्यक्तिरेखा उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे निदान आजच्या पिढीचे प्रतिबिंब या चित्रपटात उमटते.

लिव्ह इन रिलेशनशिपचा आग्रह धरतानाही लैंगिक संबंधांमधला मोकळेपणा पहिल्यांदा ताडून घेतला जातो, त्यानंतर मग एक मेकांचे स्वभाव, प्रेम आदी गोष्टी हळूहळू लक्षात येत जातात, ही प्रक्रिया समजण्यासारखी असली, तरी आपल्याकडे अजूनही लिव्ह इन हा याच्याशीच लग्न करावे की नाही, यासाठीची लिटमस टेस्ट असल्यासारखा प्रकार म्हणून पाहिला जातो हे ‘लुकाछुपी’मधून अधोरेखित झाले आहे. रश्मीचे राजकारणी वडील, मतांसाठी हिंदुत्वाचा घेतला जाणारा आधार अशा सगळ्यावर हा चित्रपट भाष्य करतो. पण लिव्ह इन रिलेशनशिपचा स्वीकार कशासाठी केला पाहिजे, या संदर्भातील एकूणच भाष्य आणि त्यादृष्टीने दोन्हीकडच्या मोठय़ांची मानसिकता बदलण्याची आवश्यकता,  अशा अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांना चित्रपटात स्पर्शच केलेला नाही. कलाकारांच्या बाबतीत अर्थातच चित्रपट वरचढ आहे. कार्तिक आर्यन आणि क्रिती सनन हे दोघेही आपापल्या पद्धतीने यशस्वी कलाकार आहेत. त्यामुळे या दोघांच्या पहिल्यांदाच एकत्र येण्यातून एक ताजेपणा चित्रपटाला मिळाला आहे. या दोघांच्या जोडीला अपारशक्ती खुराणा, पंकज त्रिपाठी, विनय पाठक यांच्यासारखे तगडे कलाकार असल्याने अभिनयाच्या बाबतीत चित्रपट कुठेही बोट ठेवायला जागा देत नाही. गाणी एक-दोनच आहेत. दोघांच्या लपंडावात जे मूळ मुद्दे बाजूला गेले ते अधिक धारदारपणे आले असते तर चित्रपट अधिक अर्थपूर्ण ठरला असता!

* दिग्दर्शक – लक्ष्मण उतेकर

* कलाकार – कार्तिक आर्यन, क्रिती सनन, अपारशक्ती खुराणा, पंकज त्रिपाठी, विनय पाठक.