27 November 2020

News Flash

‘लस्ट स्टोरीज’ : तिच्या ‘लालसे’ची चाकोरीबाहेरची चिकित्सा

चाकोरीतील मानसिकतेत वागायचं हा आपल्या समाजाचा ठळक भाव.

‘लस्ट स्टोरीज’ नाव इंग्रजी असलं तरी चित्रपट हिंदी आहे आणि हा पॉर्न चित्रपटदेखील नाही, तरीदेखील हा चित्रपट खूप मोठ्या प्रमाणात पाहिला गेला.

सिनेमा
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com, @joshisuhas2

भारतीय समाजातील स्त्रियांच्या भावना टिपण्याचा प्रयत्न करणारा ‘लस्ट स्टोरीज’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. त्यामध्ये मूळ कथासूत्राबरोबरच समाजातील विरोधाभास टिपण्याचे कामदेखील उत्तम झाले आहे.

‘लस्ट स्टोरीज’ असं थेटपणे अभिव्यक्त होणारं नाव असणारा चित्रपट असतानादेखील त्याला टिपिकल बॉलीवूड मीठमसाला न लावता आणि बी ग्रेड चित्रपटातील दृश्यांचा कसलाही आधार न घेता हा चित्रपट नेटफ्लिक्स या ऑनलाइन पोर्टलवर १५ जूनला प्रदíशत झाला. नाव इंग्रजी असलं तरी चित्रपट िहदी आहे आणि हा पॉर्न चित्रपटदेखील नाही, तरीदेखील हा चित्रपट खूप मोठय़ा प्रमाणात पाहिला गेला. मोजक्या सेकंदाची दृश्य पॉर्नच्या नावाखाली व्हॉट्सअ‍ॅपवरूनदेखील सगळीकडे फिरली. या चित्रपटात असं नेमकं काय होतं की त्याची चर्चा व्हावी?

स्त्री ही केवळ एक भोगवस्तू नाही तर तिला स्वत:च्या भावना आहेत, तिचं असं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे, तिला स्वत:च्या म्हणून कामभावनादेखील आहेत, आणि त्या  पूर्ण करणं ही तिची गरज आहे.. चित्रपटातून संदेश वगरेच घ्यायचा म्हटलं तर असं काही तरी लिहिता येईल. नावातून दिसणारं सत्य आणि वरवर पाहायचं तर चित्रपटातून दिसणारं हे सत्य आहे. हा चित्रपट एक सलग गोष्ट नसून चार स्वतंत्र गोष्टी आहेत, त्या चार वेगळ्या दिग्दर्शकांनी हाताळल्या आहेत. चारही गोष्टीतील कथा ही वेगवेगळ्या पाश्र्वभूमीवर घडते. एकीचा संबंध दुसऱ्याशी जोडता येत नाही. पण त्यात समान सूत्र मात्र नक्कीच आहे. अनुराग कश्यप, झोया अख्तर, दिबाकर बॅनर्जी आणि करण जोहर या चौघा दिग्दर्शकांनी या कथा दिग्दर्शित केल्या आहेत.

पण केवळ हे एकच सूत्र दाखवणं इतपतच या कथांचा मर्यादित हेतू दिसत नाही. कारण त्या स्त्रियांच्या कथेबरोबरच त्यातून मर्यादित प्रमाणात का होईना समाजाचा चेहरा दिसतो. स्त्रीलादेखील कामभावना आहे, तिची स्वतंत्र प्रतिमा आहे, हे मान्य करायचे  तरी चाकोरीतून रचलेले पायंडे, ठोकताळे मात्र सुटत नाहीत असा एक तिढा आजच्या समाजात दिसून येतो. हा विरोधाभास या चारही कथांमध्ये व्यवस्थित टिपला गेला आहे. एकीकडे स्वातंत्र्य वगरेच्या गप्पा करायच्या आणि दुसरीकडे ठरावीक खानदानी परंपरेत किंवा त्याच चाकोरीतील मानसिकतेत वागायचं हा आपल्या समाजाचा अगदी ठळक भाव आहे. या चार दिग्दर्शकांनी चार महिलांच्या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून  समाजातील या अवगुणावर किंबहुना याबाबतील विचारांच्या अर्धवटपणावर देखील बोट ठेवले आहे.

पहिल्या कथेतील नायिका महाविद्यालयात शिकवत असते. ती तिच्याच वर्गातील एका मुलाबरोबर एकदाच शरीरसंबंध ठेवते. त्यानंतर तिला जे व्यक्त करावंसं वाटत असते ते ती स्वगतातून करते. तिला स्वातंत्र्य हवं असतं. नवऱ्याप्रमाणे काहीतरी करावं असं तिला वाटतं, पण ती तिच्या मनात दडलेल्या अनेक प्रकारच्या भितींना सहजासहजी ओलांडू शकत नसते. त्याच वेळी तिला टिपिकल पुरुषी वृत्तीदेखील आवडत नसते. एकाच वेळी अनेक विचारांची गर्दी झालेली दिसते.

कथासूत्राच्या बाबतीत काहीशी गडबडलेली दुसरी कथा घरकाम करणाऱ्या कामवाल्या बाईच्या व्यक्तिरेखेवर आधारित आहे. ती जिथे काम करते तिथल्याच पुरुषाशी तिचे शरीरसंबंध आहेत. त्या पुरुषाचं लग्न ठरल्यानंतर त्या कामवाल्या बाईच्या मनात होणारी धुसमुस या कथेतून मांडली आहे. शेवटच्या फ्रेमवर दिग्दर्शक काहीसं भाष्य करायचा प्रयत्न करतो. ही कथा अगदीच सटल पद्धतीने व्यक्त होते.

तिसरी कथा एकदमच उच्चभ्रू वर्गातील आहे. नायिका दोन मुलांची आई आणि बँक मॅनेजर आहे. तिचा नवरा बिझनेसमन आहे. दोघांचा महाविद्यालयीन मित्र प्रथितयश डॉक्टर आहे. नवऱ्याच्या एकसुरीपणाला कंटाळलेली नायिका डॉक्टर मित्राबरोबर संबंध ठेवू लागते. पण तिला ते असं लपूनछपून चाललेलं आयुष्य डाचत असतं. एकेदिवशी ती  नवऱ्याला डॉक्टर मित्राच्या बंगल्यावर बोलवते. त्याला सांगून टाकते काय झालंय ते. त्यानंतर तिला एकदम हलकं वाटतं, पण दोन्ही मित्र मात्र अजून त्यातच अडकलेले असतात.

चौथी कथा थेट मनोरंजनाच्या अंगाने जाते. इंदौरसारख्या शहरातील एक मध्यमवयीन मानमर्यादा सांभाळणारं, चौकटीतलं खानदानी घर. नायिका एका महाविद्यालयात शिकवण्याचं काम करत असते. तेथील ग्रंथपाल महिला मात्र एकदम मोकळी ढाकळी, जे मनाला वाटेल ते बोलणारी, करणारी. एकदा ती ग्रंथालयातच सेक्स टॉयचा वापर करत असताना नायिका तिला पाहते. नायिकेचं लग्न नुकतंच झालेलं असतं, पण तिचा नवरा शृंगारात कमी पडत असतो. शेवटी नायिका ग्रंथपालाच्या ड्रॉवरमधून सेक्स टॉय उचलते आणि त्याचा अनुभव घ्यायचा प्रयत्न करते. पण त्यातून एकदमच अनावस्था प्रसंग उद्भवतो. त्यातून घटस्फोटाची चर्चा सुरू होते.

२०१७ मध्ये आलेल्या ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या सिनेमातून असेच काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न होता. तेथे एकाच सलग कथेत चार पात्रं होती. ‘लस्ट स्टोरीज’चं वेगळेपण असं की चार वेगळ्या पातळ्यांवरून हे सारं व्यक्त होतं. त्यांचा एकमेकांशी थेट संबंध नसतो, पण त्या एकाच सूत्रात बांधल्या आहेत. पण यातील इतर घटकदेखील खूप महत्त्वाचे ठरतात. पहिल्या कथेतील नायिकेला एक अनामिक अस्वस्थपण सतत सतावत असतं. शिक्षिका-विद्यार्थी शरीरसंबंध अनतिक या साच्याचा तो प्रभाव तर असतोच, पण तिच्या आजवरच्या जडणघडणीशी ते निगडित असतं. पण त्याचा परिणाम म्हणजे विद्यार्थी पुन्हा टिपिकल पुरुषी मानसिकेतून तिच्याशी लग्नाला तयार असल्याचं सांगतो. तिसऱ्या कथेत तर नायिका तिच्या आयुष्यातील इतर भूमिकांना इतकी कंटाळलेली असते की तिचा म्हणून स्वतंत्र विचारच होत नसतो. त्यात परत तिच्या नवऱ्याला जेव्हा ती हे सांगते, तेव्हा तो हे थांबव, पण डॉक्टर मित्राला काही सांगू नको असं सांगतो. म्हणजे बंधन पुन्हा स्त्रीवरच येतं. ती ते न ऐकता डॉक्टर मित्रालाही सांगून टाकते आणि कोणत्याही ओझ्याखाली न राहता मोकळी होते. चौथ्या कथेत तर अगदी छापील खानदानी प्रकार आहे. म्हणजे सेक्स टॉय वापरल्यामुळे झालेला गोंधळ हा नायिकेचाच गुन्हा असल्याप्रमाणे वागणूक दिली जाते. वर घटस्फोट देण्याची ताकद नसलेला नवरा तिची आर्जवं करतो.

मूळ कथासूत्राला जोडून हे विरोधाभास टिपणं हे या चित्रपटाचं खरं वैशिष्टय़ आहे. महिनाभरापूर्वी आलेला ‘वीरे दी वेिडग’ हा चित्रपटदेखील चार मुलींची कथा सांगतो. पण त्यात कथेपेक्षा निव्वळ धांगडिधग्यावरच अधिक भर दिला आहे. पण ‘लस्ट स्टोरीज’मध्ये थोडक्या अवकाशात, बरंच काही मांडण्याचा प्रयत्न दिसून येतो. ‘लस्ट स्टोरीज’ या नावामुळे असेल पण त्याची बरीच चर्चा झाली. अनेकांनी स्त्रियांच्या भावना कळल्या अशा आशयाच्या प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर टाकल्या. पण त्यापलीकडे जात चित्रपट सादर करण्याची ताकद अनेक बाबींवर असते हे पकडून जे काही मांडलं आहे ते पठडीबाहेरचंच आहे. ते क्रांतिकारी वगरे नसेल, पण त्यातून चित्रपटाची ताकद कळते. नेटफ्लिक्ससारखं ऑनलाइन माध्यम  सध्या तरी सेन्सॉर नामक कात्रीच्या बाहेर असल्यामुळे हे थेटपणे मांडणं होऊ शकलं. पण त्या स्वातंत्र्याचा एकाही कथेत स्वैराचार केलेला नाही हे विशेष. त्याचबरोबर उगाच प्रचंड मोठा लवाजामा घेऊन सिनेमा करावा लागतो हेदेखील खरे नाही हे यातून दिसून येते. यातील दोन कथा तर एका घराच्या बाहेरदेखील जात नाहीत. आजच्या काळातील महिलांना कचकडय़ाप्रमाणे सादर करणाऱ्या मालिकांना आणि प्रेक्षकांना या चित्रपटातून या सर्वाची जाणीव झाली तर उत्तमच.
सौजन्य – लोकप्रभा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2018 11:49 am

Web Title: lust stories netflix
Next Stories
1 ‘धडक’ची क्लिप पाहताच श्रीदेवीने दिला होता जान्हवीला ‘हा’ सल्ला
2 ‘काला’ पठडी बाहेरील चित्रपट
3 ..अन् आलिया पार्टीमध्ये आलीच नाही!
Just Now!
X