२०११ मध्ये प्रदर्शित झालेला ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक लव रंजन यांच्यावर #MeToo या मोहिमेअंतर्गत एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. २०१० मध्ये चित्रपटात कास्टींगदरम्यान लव यांनी हस्तमैथुन करता येत का असा प्रश्न विचारल्याचा आरोप या महिलेने केला आहे.

‘पिंकव्हिला’नुसार, २०१० साली वयाच्या २४ व्या वर्षी ही घटना घडली असून त्यावेळी मला कास्टींग डायरेक्टर विक्की सिदाना यांनी ऑडिशनसाठी बोलावलं होतं. ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटासाठी ऑडिशन सुरु असून काही ठराविक मुलींनाच येथे बोलावलं आहे असं मला विक्की सिदाना यांनी सांगितलं. त्यांच्यावर विश्वास ठेऊन मी ऑडिशनसाठी पोहोचले. त्यावेळी कुमार मंगत यांच्या कार्यालयामध्ये लव रंजन ऑडिशन्स घेत होते.  माझ्या पूर्वी ज्या महिला ऑडिशन देऊन येत होत्या त्या प्रचंड अस्वस्थ आणि घाबरलेल्या होत्या. माझ्या ऑडिशची वेळ आल्यावर मी आत गेले. यावेळी संपूर्ण रुममध्ये सेटअप बसविला होता. हे ऑडिशन चित्रपटातील बिकिनी आणि किसिंग सीनसाठी असल्याचं मला सांगण्यात आलं. त्यानंतर माझं वजन योग्य आहे की नाही हे पाहण्यासाठी लव रंजन यांनी मला कपडे उतरविण्यास सांगितलं. या प्रकरणानंतर मी घाबरले होते. परंतु काही दिवसांनी मला विक्की यांचा फोन आला आणि माझी निवड झाल्याचं सांगितलं, , असं महिलेने सांगितलं.

पुढे ती असंही म्हणाली, माझी निवड झाल्यानंतर मी मंगत आणि दिग्दर्शक अभिषेक यांची भेट घेतली. या भेटीनंतर लव रंजन हे मला एका रुममध्ये घेऊन गेले जेथे मला काही अश्लील प्रश्न विचारण्यात आले. अगदी माझा प्रियकर आहे का या प्रश्नापासून ते हस्तमैथुन करता येतं का असे अश्लील प्रश्न विचारले. त्यानंतर मी घाबरुन तेथून पळ काढला आणि बाहेर जाऊन प्रचंड रडले. या संपूर्ण प्रकारानंतर मी माझ्या मॅनेजरला फोन करुन या चित्रपटात काम करु शकत नाही असं सांगितलं.

या प्रकरणानंतर माझ्या मॅनेजरने विक्की यांनी फोन करुन या विषयी चौकशी केली परंतु मी खोटे आरोप करत असल्याचं विक्की यांनी मॅनेजरला सांगितलं. विशेष म्हणजे लव रंजन स्वत: मला फोन करुन माझा गैरसमज झाल्याचं सांगत होते. या प्रकरणानंतर मी या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आणि लग्न करुन परदेशात स्थायिक झाले, असंही या महिलेने सांगितलं.

लव रंजन यांनी ‘प्यार का पंचनामा’ आणि ‘सोनू के टिटू की स्वीटी’ या चित्रपटाचंही दिग्दर्शन केलं आहे. महिलेने लव रंजन यांच्यावर केलेल्या आरोपानंतर हे आरोप खोटे असल्याचं रंजन यांनी ‘मिडे’ ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.