दिग्दर्शक लव रंजन याच्या २०११ मधे आलेल्या ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटाला आश्चर्यकारक यश मिळाल्यानंतर आता तो या चित्रपटाचा सिक्वल बनवत आहे . ‘प्यार का पंचनामा’ आणि ‘आकाशवाणी’ या दोन्ही चित्रपटात नवीन कलाकारांसोबत काम केल्याने आपल्याला एक चांगला दिग्दर्शक बनता आल्याचे लव रंजनला वाटते. नवीन कलाकारांबरोबरचे कामातील स्वातंत्र्य तुमचा उत्साह वाढवणारे असून, प्रस्थापित कलाकारांसोबत हे अशक्य असल्याचे त्याला वाटते. लव रंजनचे चित्रपट तरूणाईला केंद्रस्थानी ठेऊन बनवलेले असतात. याबाबत विचारले असता तो म्हणतो, माझ्या मते माझे चित्रपट हे माझ्या वैयक्तिक आयुष्यातील अनुभवांचे प्रतिबिंब आहे. ‘आकाशवाणी’ हा तरुणाईचा चित्रपट नव्हता. चित्रपटाचा उत्तरार्ध हा अतिशय परिपक्व असा होता. अनेकांनी  हा चित्रपट पाहिला नाही, हे खरोखर दुर्दैवी आहे, ज्यामुळे माझी ओळख तरूणांना केंद्रस्थानी ठेऊन चित्रपट तयार करणारा अशी राहिली आहे. सध्या तो ‘प्यार का पंचनामा’ या हिट चित्रपटाच्या सिक्वलवर काम करत आहे.
हा ख-या अर्थाने सिक्वल असून, चित्रपटातील व्यक्तिरेखांचे पुढील आयुष्य या सिक्वलमध्ये दाखविण्यात आले आहे. यात मागील चित्रपटातील कलाकारांचाच समावेश करण्यात आला असल्याचे रंजन म्हणाला. प्यार का पंचनामा चित्रपट तयार होत असतांना या चित्रपटाचा सिक्वल बनवण्याचे रंजनने योजले नव्हते. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडल्याने चित्रपटातील व्यक्तिरेखांच्या आयुष्यात पुढे काय होत असावे, हे पडताळून पाहण्याची इच्छा रंजनच्या मनात डोकावली. आता एक सशक्त कथानक तयार झाल्यावर रंजनने या चित्रपटाच्या सिक्वलवर काम करण्यास सुरूवात केली आहे.
रंजनच्या देन्ही चित्रपटात काम केलेली नुसरत भरुचा ‘प्यार का पंचनामा’च्या सिक्वलमध्येसुद्धा दिसणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकांसोबत काम करण्याचा सध्या कोणताही विचार नसून, पुढे कधीतरी अशी संधी मिळाल्यास त्यांच्याबरोबर काम करायला नक्कीच अवडेल असे रंजनचे म्हणणे आहे.