विनोदाची खमंग मेजवानी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘मधु इथे अन चंद्र’ तिथे चित्रपटाचा धमाकेदार संगीत अनावरण सोहळा अभिनेता अंकुश चौधरीच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. ‘मधु इथे अन चंद्र’ तिथे हा मनोरंजक सिनेमा प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील, असे सांगत अंकुशने चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या.
प्रत्येक शहराची स्वत:ची एक खासियत असते. हीच खासियत घेऊन कोल्हापूर आणि पुणे हे एकत्र आल्यावर उडणाऱ्या धमाल कथेची मेजवानी म्हणजे ‘मधु इथे अन चंद्र तिथे’ हा चित्रपट. धमाल, मस्ती, हास्याचे स्फोट घडवत प्रेक्षकांना विनोदाची मेजवानी हा चित्रपट देईल. ‘मधु इथे अन चंद्र तिथे’ या चित्रपटातून एक रंजक कथा आपल्यासमोर उलगडणार आहे.
संजय झणकर यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती ‘चित्रपंढरी’ बॅनरखाली झी टॉकीज आणि रत्नकांत जगताप यांनी केली आहे. कथा-पटकथा व संवाद सुनील हरिश्चंद्र यांचे आहे. छायाचित्रण गौरव पोंक्षे यांचं असून संकलन साहिल तांडेल यांचं आहे. आनंद इंगळे, भाऊ कदम यांच्यासह किशोर चौघुले, शैला काणेकर, विशाखा सुभेदार, संजय मोहिते, गणेश रेवडेकर, रवींद्र तन्वर या विनोदवीरांच्या फौजेसह ऋतुराज फडके, शाश्वती पिंपळीकर ही फ्रेश जोडी ‘मधु इथे अन चंद्र तिथे’ चित्रपटाच्या निमित्ताने आपल्या भेटीला येणार आहे. १२ जूनला दुपारी १२.०० वा. व सायं ६.०० वा. हा चित्रपट प्रेक्षकांना झी टॉकीजवर पाहता येईल.