बॉलिवूड अभिनेत्री मधुबाला यांची आज ५२वी पुण्यतिथी आहे. ‘मुगल-ए-आजम’ या चित्रपटातील अनारकलीच्या भूमिकेने त्यांनी लाखो लोकांची मने जिंकली. मधुबाला यांना बॉलिवूडची ‘मर्लिन मुनरो’ म्हणून देखील ओळखले जाते. मधुबाला यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९३३ साली झाला होता. त्यांचे खरे नाव मुमताज जहां देहलवी होते. त्यांच्या वडीलांचे नाव अताउल्लाह आणि आईचे नाव आयशा बेगम होते. सुरूवातीला त्यांचे वडील सध्या पाकिस्तानमध्ये असलेले पेशावर या शहरात एका तंबाखूच्या कंपनीत कामाला होते. त्यानंतर त्यांचे वडील दिल्लीत आले आणि नंतर मुंबईत आले. मुंबईत मधुबाला यांचा जन्म झाला.
मुमताज ते मधुबाला प्रवास…
मुमताज यांनी १९४२ मध्ये ‘बसंत’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मुमताज यांचा उत्तम अभिनय पाहून लोकप्रिय अभिनेत्री देविका राणी यांनी मुमताज यांना त्यांचे नाव बदलून मधुबाला करण्याचा सल्ला दिला. १९४७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘नील कमल’ हा चित्रपट मुमताज या नावने त्यांचा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर त्या मधुबाला नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. अवघ्या चौदा वर्षांच्या असताना अभिनेते राजकपूर यांच्यासोबत मधुबाला यांनी काम केले होते.
‘नील कमल’ नंतर मधुबाला यांना सिनेसृष्टीतील ‘सौंदर्य देवी’ म्हणून प्रसिद्धी मिळाली. नंतर मधुबाला यांनी बॉम्बे टॉकिजच्या ‘महल’ या चित्रपटात भूमिका साकारली आणि त्यानंतर त्यांनी कधी पाठी वळून पाहिले नाही.
मधुबाला यांनी दिग्गज अभिनेते अशोक कुमार, रहमान, दिलीप कुमार आणि देवानंद यांच्या सोबत काम केले आहे. १९५० नंतर त्यांचे काही चित्रपट फ्लॉप झाले. त्यांनत अनेक लोकं म्हणाले की, मधुबाला तिच्या अभिनयामुळे नाही तर तिच्या सुंदरतेमुळे सिनेसृष्टीत आहे. तरी देखील मधुबाला निराश झाल्या नाही. १९५८ मध्ये पुन्हा एकदा त्यांनी स्वत:ला सिद्ध करून दाखवले. त्याच वर्षी त्यांनी ‘फागुन’, ‘हावडा ब्रिज’, ‘काला पानी’ आणि ‘चलती का नाम गाडी’ सारखे अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले होते.
मधुबाला यांचा मृत्यु कसा झाला?
१९५४ मध्ये मधुबाला मद्रासमध्ये ‘बहुत दिन हुए’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असताना त्यांची प्रकृती खालावली.हृदयाच्या एका गंभीर आजाराला त्यांना सामोरं जावं लागलं. हृदयाला छिद्र असल्यानं त्यांना उपचाराठी लंडनला जावं लागलं. ऑपरेशन झाल्यानंतर देखील तुमच्याकडे जास्त वेळ नसेल असे डॉक्टरांनी मधुबाला यांना स्पष्टपणे सांगितले होते. दरम्यान, तेव्हा मधुबाला यांना अभिनय सोडावा लागला. १९६९ मध्ये मधुबाला यांनी ‘फर्ज’ आणि ‘इश्क’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याचा विचार केला, परंतू ते शक्य झाले नाही. त्याच वर्षी मधुबाला यांनी १४ फेब्रुवारी रोजी त्यांचा ३६ वा वाढदिवस साजरा केला होता. नंतर काही दिवसात म्हणजे २३ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यु झाला.
मधुबाला यांनी जवळपास ७० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी ‘बसंत’, ‘फुलवारी’, ‘नील कमल’, ‘पराई आग’, ‘अमर प्रेम’, ‘महल’, ‘इम्तिहान’, ‘अपराधी’, ‘मधुबाला’, ‘बादल’, ‘गेटवे ऑफ इंडिया’, ‘जाली नोट’, ‘शराबी’ आणि ‘ज्वाला’ या सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 23, 2021 2:53 pm