अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरून वाद निर्माण झाला. निर्माता दिग्दर्शक करण जोहर, अभिनेता सलमान खान, अभिनेत्री आलिया भट्ट, सोनम कपूर यांना जोरदार ट्रोल केलं जाऊ लागलं. या प्रकरणावर आता प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. घराणेशाही फक्त बॉलिवूडमध्येच आहे असं नाही तर ते सगळ्या क्षेत्रात आहे, असं मत व्यक्त करत असतानाच त्यांनी इंडस्ट्रीत काही बदल होत असल्याचंही सांगितलंय.

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “इंडस्ट्रीमध्ये घराणेशाही, मक्तेदारी, गटबाजी या सर्व गोष्टी आहेत. मी स्वत: व्हिडीओ कॅसेट्स विकून इथवर आलोय. चांदनी बार ते इंदू सरकार, असे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणून मी माझ्या ताकदीवर इंडस्ट्रीत उभा आहे. मी माझ्या मूल्यांना अनुसरून काम केलं. पण इंडस्ट्रीतल्या दिग्गज कलाकारांना मी हे नेहमी सांगत आलोय की नवीन प्रतिभेला पायदळी तुडवू नका. त्यांच्यावर दबाव आणू नका आणि त्यांच्याविरोधात गटबाजी करू नका. नाण्याच्या दोन्ही बाजू बघायला पाहिजे. सुशांत, शाहरुख आणि माझ्यासारखे लोक या इंडस्ट्रीत आहेत. तर दुसरीकडे असेही स्टारकिड्स आहेत, जे यशस्वी ठरले नाहीत. इथे गटबाजी खूप होते. एखाद्याचा चित्रपट प्रदर्शित होणार असेल तर त्याला कसं खाली पाडायचं, हे सर्व इथे चालतं आणि माझ्या चित्रपटांमधून मी हे सत्यसुद्धा मांडलंय. घराणेशाही इथे आहे आणि पुढेही राहणार. पण बाहेरून आलेल्या कलाकारांना किमान त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी तरी मिळायला पाहिजे. त्यांच्याविरोधात प्लान होणं चुकीचं आहे. आता सुशांतच्या आत्महत्येनंतर किमान इंडस्ट्रीमधील लोक आत्मचिंतन तरी करत आहेत. या गोष्टी कशाप्रकारे कमी करता येतील, यावर विचार सुरू आहे”, असं त्यांनी म्हटलं.

मधूर भांडारकर यांनी त्यांच्या चित्रपटांमध्ये अनेक नव्या कलाकारांना संधी दिली. ग्लॅमर विश्व अत्यंत क्रूर असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. इथे प्रत्येकालाच यश मिळतं असं नाही, असंही ते म्हणाले.