नेटफ्लिक्स इंडियाने आपल्या या वर्षात प्रदर्शित होणाऱ्या सिनेमाची आणि वेबसीरीजची नावं नुकतीच प्रसिद्ध केली आहेत. यात विविध भाषांमधील सिनेमा आणि वेब सीरीजचा समावेश आहे. तर अनेक बडे कलाकार विविध सिनेमा आणि वेब शोमधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर एण्ट्री करत आहेत.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर एण्ट्री करणाऱ्या कलाकारांच्या यादीत सगळ्यात पहिलं नाव आहे ते म्हणजे माधुरी दीक्षितचं. करण जोहरच्या डिजीटल प्रोडक्शन हाउसचे 5 बिग बजेट प्रोजेक्ट नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहेत. यात एव्हरग्रीन माधुरीच्या डिजिटल डेब्यूचा ही समावेश आहे. माधुरी दीक्षितनेदेखील ट्विट करत चाहत्यांसोबत तिच्या डिजिटल डेब्यूची बातमी शेअर केली आहे. ‘फाइडिंग अनामिका’ या वेब शो मधून माधुरी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये तिच्यासोबत संजय कपूर, मानव कौल हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकतील.

कलंक सिनेमानंतर माधुरी दीक्षित काही डान्स शोमधून जजच्या भूमिकेत झळकली. मात्र मोठ्या ब्रेकनंतर माधुरी एका वेगळ्या भूमिकेत भेटीला येणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये देखील उत्सुकता निर्माण झालीय.

दरम्यान नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येणाऱ्या अनेक सिनेमांची घोषणादेखील करण्यात आली आहे. यात अरण्यकच्या माध्यमातून रविना टंडन वेबविश्वात पदार्पण करत आहे. तर कार्तिक आर्यनची प्रमुख भूमिका असलेला ‘धमाका’ हा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होईल.