‘धकधक गर्ल’चं ‘बकेट लिस्ट’च्या निमित्ताने मराठीत पडणारं पहिलं पाऊल… या तिच्या सुरू होणाऱ्या नव्या प्रवासात तिची सोबत करायला अवघा महाराष्ट्र आतूर आहे. कधी एकदा आपण आपल्या लाडक्या हास्यसम्राज्ञीचं मराठमोळं स्वरूप मोठ्या पडद्यावर पाहतो यासाठी प्रेक्षकांमध्ये भलतीच उत्सुकता पाहायला मिळते आहे. याच उत्सुकतेपोटी होणाऱ्या तिकीट विक्रीच्या विचारणेला दाद देत महाराष्ट्रातल्या काही सिनेमागृहांनी प्री-बुकींग सुरू केलं असून प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद या पुढाकाराला मिळतो आहे.

याविषयी ‘सिटी प्राईड’चे मॅनेजर सुगत थोरात यांनी माधुरीचा हा पहिलाच सिनेमा, त्यात बकेट लिस्ट या नावात नेमकं काय दडलं आहे याबाबत प्रेक्षकांची असणारी उत्सुकता यामुळे प्रेक्षकांचे बुकींगसाठी सतत फोन येत असल्याचं म्हणत या सिनेप्रेमींच्या आग्रहाखातर आपण पहिल्यांदाच बुधवारऐवजी सोमवारपासूनच तिकीट विक्री सुरू केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान आपण घेतलेल्या या पुढाकाराला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं असून जोरदार तिकीट बुकिंग सुरू असल्याचंही, ते म्हणाले.

वाचा : १०० कोटींच्या कमाईपासून ‘राजी’ काही पावले लांब

प्री-बुकींगला चांगलाच प्रतिसाद मिळणाऱ्या बकेट लिस्ट या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी केलं आहे तर या कथेचं सहलेखन देवश्री शिवडेकर यांनी केलं आहे. डार्क हॉर्स सिनेमाज्, दार मोशन पिक्चर्स, ब्लू मस्टँग क्रिएशन्स निर्मित बकेट लिस्ट या चित्रपटाची निर्मिती जमाश बापुना, अमित पंकज परिख, अरूण रंगाचारी, विवेक रंगाचारी, आरती सुभेदार आणि अशोक सुभेदार यांनी केली आहे. तर करण जोहर आणि ए. ए. फिल्म्स हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांसमोर सादर करीत आहेत.

या चित्रपटात माधुरीबरोबरच सुमित राघवन, रेणुका शहाणे, वंदना गुप्ते, प्रदीप वेलणकर, शुभा खोटे, दिलीप प्रभावळकर, इला भाटे, मिलिंद फाटक ही कलाकार मंडळी आपल्याला दिसणार आहे.