माधुरी दीक्षित या नावाला कोणी ओळखत नाही अशी एकही व्यक्ती भारतात तरी मिळणं अशक्य. धक-धक गर्ल नावाने तिची प्रसिद्धी सर्वदूर पसरली होती. माधुरीचा जन्म मुंबईत १५ मे १९६७ मध्ये झाला. माधुरीने आतापर्यंत अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले आहे. माधुरीच्या करिअरमध्ये एक वेळ अशीही होती की तिला महिला कलाकारांमध्ये सर्वात जास्त मानधन दिलं जायचं.

तिच्या फिल्मी करिअरमध्ये माधुरीचं नाव कलाकार आणि सेलिब्रिटींशी जोडले गेले. ८० आणि ९० च्या दशकात माधुरी आणि अनिल कपूरची जोडी हिट होती. दोघांनी पुकार, परिंदा, राम-लखन, बेटा, जमाई राजा, तेजाब अशा अनेक सिनेमांत काम केले. मीडिया रिपोर्टनुसार, सतत एकत्र काम करत राहिल्यामुळे दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली होती. पण अनिल कपूरचे आधीच लग्न झालेले असल्यामुळे त्यांचे नाते फार पुढे गेले नाही.

यानंतर माधुरीचे नाव संजय दत्तशी जोडले गेले. ९० च्या दशकात या दोघांमधील प्रेमाच्या चर्चेने भलताच जोर धरला होता. पण १९९३ मध्ये बॉम्बस्फोट प्रकरणी संजय दत्तचे नाव पुढे आले आणि माधुरीने त्याच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. सर्वसाधारणपणे अनेकांना या दोन कलाकारांबद्दलच अधिक माहित आहे. पण तुम्हाला माहित आहे का माधुरीने १९९२ मध्ये इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत तिला दिग्गज क्रिकेटर सुनिल गावस्कर फार आवडतात अशी कबुली दिली होती.

माजी कर्णधार सुनील गावसकर (संग्रहीत छायाचित्र)

माधुरीने हेही सांगितले होते की, गावस्कर तिच्या स्वप्नात यायचे तेव्हा तिला त्यांच्या मागे धावायचं असायचं. पण हे एकतर्फी क्रश होतं असंच म्हणावं लागेल. माधुरीने १७ ऑक्टोबर १९९९ मध्ये डॉक्टर श्रीराम माधव नेने यांच्याशी लग्न केले. माधुरीला दोन मुले आहेत. माधुरी ही अशी एकमेव अभिनेत्री आहे जिला १४ वेळा फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात नामांकन मिळाले होते. याशिवाय भारत सरकारद्वारे तिला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.