बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित सोशल मीडियावर फार सक्रीय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करते. नुकताच तिने एक स्कार्फ घातलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. आता या स्कार्फ घातलेल्या फोटोमध्ये काय विशेष असा प्रश्न तुम्हाला पडणं स्वाभाविक आहे. पण या स्कार्फची खासियत म्हणजे माधुरीच्या आईने तिच्यासाठी हा स्कार्फ विणला आहे. आईने विणलेला स्कार्फ घालून तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. या फोटोला कॅप्शन देताना तिने म्हटले की, ‘माझ्या ८५ वर्षाच्या आईने हा सुंदर स्कार्फ खास माझ्यासाठी विणला आहे. आयुष्यातील तिचा हा उत्साह फार प्रेरणादायी आहे.’

माधुरीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहेत. तिच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर, नुकतेच तिच्या पहिल्या मराठी सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. ‘बकेट लिस्ट’ असे या सिनेमाचे नाव असून ‘बकेट लिस्ट… माझी, तुमची…’ आपल्या सगळ्यांची अशी आकर्षक टॅगलाइनही दिली आहे. सामान्य, मध्यमवर्गीय महिलेच्या रुपात माधुरीची छबी पोस्टरवर दिसते. साडी नेसलेल्या, मंगळसुत्र घातलेल्या माधुरीच्या चेहऱ्यावरचं प्रसन्न हासू अनेकांचं लक्ष वेधून घेतं. तिच्या मागे गृहिणी, आई, मैत्रिण, बहिण असे शब्द लिहिलेले दिसतात. यावरुनच नात्यांवर भाष्य करणारा हा सिनेमा असेल असा प्रथमदर्शी अंदाज लावला जात आहे.

‘बकेट लिस्ट’ सिनेमात रेणुका शहाणेचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या दोघी तब्बल २३ वर्षांनी एकत्र काम करणार आहेत. याआधी माधुरी आणि रेणुका यांनी ‘हम आपके है कौन’ सिनेमात बहिणींची भूमिका साकारुन प्रेक्षकांची मनं जिंकली होती.