माधुरी.. वय विचारू नका

अनेकदा घटना वेगळी असते आणि तिच्या अंतरंगात दडलेल्या, त्या घटनेच्या परिणामामुळे बदललेल्या अशा अनेक गोष्टी असतात. गोष्टीचा एकेक पदर उलगडत जातो आणि आपणच आपल्याला वेगळे भासतो. कधी त्यातून घडलेल्या चुका जाणवतात. कधी निसटलेले क्षण आठवतात आणि मग होता होईतो ते धरण्याची कसरत सुरू होते. नात्यांच्या बाबतीत तर गोष्टी क्षणोक्षणी बदलत राहतात. एक वेगळी कथा घडवत राहतात. हे सगळे सांगायचे कारण म्हणजे स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित ‘माधुरी.. वय विचारू नका’ हा चित्रपट म्हणता येईल. स्मृतिभ्रंश झालेल्या आईची क था सांगता सांगता आई आणि मुलीच्या नात्याचे अनेक आनंदाचे, भांडणाचे, समजुतीचे गुंते उलगडत जातात. अशी गोष्ट सांगताना ती सहजतेने यायला हवी हे जितके  खरे तितकीच तिची मांडणीही प्रभावी हवी, नाही तर कथेची गोडी अर्धवट राहते..

24 tree fall due to unseasonal rain in pimpri chinchwad
पिंपरी : अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यामुळे २४ ठिकाणी झाडपडीच्या घटना
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
cabbage for weight loss
तुमच्या घरी कायम असणारी ‘ही’ भाजी वाढलेले वजन झपाट्याने करेल कमी; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप

चित्रपटाच्या सुरुवातीलाच इतक्या गोंधळलेल्या फ्रेम्स एकामागोमाग एक येतात, की त्यातून नेमके काय सांगायचे आहे हे लक्षात येत नाही. पोलीस ठाण्यात बसून आपण वीस वर्षांच्या आहोत, असा दावा करणारी माधुरी प्रधान (सोनाली कुलकर्णी) नावाची स्त्री आणि आपली आई हरवली आहे याची तक्रार नोंदवण्यासाठी दुसऱ्याच पोलीस ठाण्यात आलेली काव्या (संहिता जोशी). तिचा प्रियकर अमर (विराजस कुलकर्णी), त्यांच्याबरोबर सतत वावरणारा रोहन (अक्षय केळकर) आणि या सगळ्यांची पहिली एकत्रित भेट होते तेव्हा योगायोगाने या सगळ्या घडामोडी समजून तिथे पोहोचलेले डॉ. तुषार पाणिग्रही (शरद केळकर). या सगळ्या पात्रांना एकत्रित घेऊन ‘माधुरी.. वय विचारू नका’ या चित्रपटाची सुरुवात होते. एकटीने मुलीचा सांभाळ करणारी माधुरी आणि तिची मुलगी काव्या यांचे एकमेकांशी एकही क्षण पटत नाही. सततच्या वादविवादातून त्यांच्यात एक दुरावा निर्माण झाला आहे. काव्याने आईपासून दूर राहण्याचा निर्णय अमलात आणण्याचा क्षण जवळ येऊन ठेपला असतानाच माधुरी तिची स्मृती हरवून बसते. आयुष्यात वीस वर्षे मागे गेलेली माधुरी आपल्या मुलीशी त्याच बंडखोर पद्धतीने वागते. एरव्ही साततत्याने आईशी फटकून, बंडखोरीने वागलेल्या काव्याला आईतल्या आजारपणामुळे का होईना झालेला बदल, तिच्यातली बंडखोरी सहन होत नाही. यातून खरे म्हणजे माधुरीला ठीक करण्यासाठी आलेल्या डॉक्टर तुषारला एकीकडे काव्याशी संवाद साधत माधुरीच्या आजारपणाचे मूळही शोधायचे आहे आणि दुसरीकडे मुळात काव्याने ही परिस्थिती समजावून घेणेही त्याला अपेक्षित आहे. या गुंतागुंतीतून एकूणच आईवडील आणि मुलांचे नाते, जनरेशन गॅपचा मुद्दा, त्यातही एकेरी पालकत्व असेल तर त्यातली आव्हाने अशा अनेक गोष्टींना दिग्दर्शकाने या कथेतून हात घातला आहे.

आयुष्यातील वीस वर्षेच हरवून बसलेल्या एका स्त्रीच्या मानसिक गुंतागुंतीतून तिच्या मुलीला आईबरोबरच्या विसंवादाचे मूळ सापडत जाणे ही संकल्पनाच खूप सुंदर आहे. पालकत्व नेमके कसे असले पाहिजे याच्या कुठल्याही आदर्श व्याख्या नाहीत. एक व्यक्ती म्हणून आपली झालेली जडणघडण, अनुभव या सगळ्याचा परिणाम आपल्या मुलांना मोठे करताना आपण ज्या भूमिका घेतो त्यावर होत असतो. मात्र अनेकदा आईवडिलांचा भूतकाळ आणि त्यातून त्यांची झालेली मनोवस्था, मुलांबरोबर हरवत चाललेला संवाद या सगळ्याची सरमिसळ कधी होते आणि ते नाते तुटेस्तोवर ताणले जाते ही आजची परिस्थिती आहे. माधुरी आणि काव्याच्या नात्यातून विशेषत: काव्याला उमगत गेलेल्या तिच्या चुका हा भाग चित्रपटात खूप सुंदर पद्धतीने आला आहे. मात्र एकूणच माधुरीचा आजार, डॉक्टर तुषारची भेट, गुगलसारखी व्यक्तिरेखा या सगळ्या गोष्टी, घटना एका साचेबद्ध पद्धतीने समोर येतात आणि त्यातली गोडीच आपण हरवून बसतो. अभिनेत्री सोनाली कु लकर्णीने आपल्या सहजशैलीने माधुरी रंगवली आहे. मात्र काही प्रसंगांमध्ये माधुरीचा आक्रस्ताळेपणा, तिची बंडखोरी ही वरवरची वाटते. संहितानेही काव्याच्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र सुरुवातीच्या काही भागांमध्ये ती खूप गोंधळलेली वाटते. विराजस, अक्षय, शरद केळकर या तिघांनीही आपल्या वाटय़ाला आलेल्या भूमिकांना न्याय दिला आहे. मुळातच संहितेच्या पातळीवर आणि त्यानंतर दिग्दर्शनातही उतरलेला एक साचेबद्धपणा चित्रपटावर मर्यादा आणतो. ‘मला सॉरी म्हणायचंय’ हे गाणे आणि ते ज्या पद्धतीने चित्रपटात येते तो प्रसंग, काव्या आणि माधुरीतले काही क्षण नाही म्हटले तरी प्रेक्षकांना दखल घ्यायला लावतात. मात्र या चित्रपटाचे माधुर्य आणखी वाढवता आले असते तर एक सुंदर नाते आणखी प्रभावीपणे उलगडले असते, ही रुखरुख वाटल्याशिवाय राहत नाही.

दिग्दर्शन – स्वप्ना वाघमारे जोशी

कलाकार – सोनाली कुलकर्णी, शरद केळकर, संहिता जोशी, अक्षय केळकर, विराजस कुलकर्णी, सुबोध भावे.