अभिनेत्री श्रीदेवी यांचा मद्यप्राशनामुळे तोल गेला आणि बाथटबमधील पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त येताच मध्य प्रदेश सरकारने श्रीदेवी यांचे नाव श्रद्धांजलीच्या यादीतून वगळले आहे. यामुळे आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेश विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी माजी विधानसभा अध्यक्ष श्रीनिवास तिवारी यांच्यासह ११ जणांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार होती. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर आणि अभिनेत्री श्रीदेवी यांचा देखील समावेश होता. मात्र, सोमवारी दुपारी श्रीदेवी यांचे निधन ह्रदयविकाराच्या धक्क्याने नव्हे तर बाथटबमध्ये बुडून झाल्याचे स्पष्ट झाले. श्रीदेवी यांनी मद्यप्राशन केल्याचे अहवालातून समोर आले होते. यानंतर या यादीतून श्रीदेवी आणि काही वेळाने शशी कपूर यांचे नावही यादीतून वगळण्यात आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदीय कामकाज मंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांच्या सांगण्यावरुन विधानसभा अध्यक्षांनी श्रीदेवी यांचे नाव त्या यादीतून वगळले. त्यांच्यासोबत शशी कपूर यांचे नाव देखील वगळण्यात आले. श्रीदेवींचे नाव का वगळण्यात आले यावर चर्चा सुरु असून शशी कपूर यांचे नाव वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नवभारत टाइम्स या वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे.

दोन दिवसांपूर्वीच निधन झालेल्या व्यक्तींची यादी देण्यात आली होती. मात्र, या यादीत आयत्या वेळी बदल करण्यात आला. ही यादी पुन्हा एकदा प्रसिद्ध करण्यात आली. सूत्रांच्या मते, भाजपा नेत्यांना यावरुन वाद नको आहे. श्रीदेवींच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी श्रद्धांजली अर्पण केली. मात्र, आता जे कारण समोर आले आहे, त्यानंतर श्रीदेवींच्या मृत्यूबद्दल शंका उपस्थित होत आहे.