News Flash

शहाणपणाचं वेड

पती-पत्नीचं नातं साताजन्माचं, या जोडय़ांची गाठ वरती बांधली गेलेली असते.

|| रेश्मा राईकवार

वेडीच आहेस.. हे वाक्य किती तरी वेळा आपल्याला ऐकवलं गेलेलं असतं आणि दरवेळी आपण ते अजिबातच मनावर काय कानावरही घेतलेलं नसतं. मात्र अनेकदा हे वेडं असणंच जगाशी व्यवहार करण्याचं शहाणपण देऊन जातं. हे व्यवहारज्ञान दिग्दर्शक उमेश बिश्त यांनी पुन्हा एकदा ‘पगलैट’ या चित्रपटातून खूप सहजपणे अधोरेखित केलं आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात हे व्यवहाराचं बाळकडू देण्याआधी जगाचा व्यवहारही दिग्दर्शकाने आपल्या वास्तव शैलीत टिपला आहे. आपल्या आजूबाजूच्या माणसांचं हे वागणं आपल्याला परिचयाचं असलं तरी साक्षात्काराचे असे अनेक क्षण प्रत्यक्ष आयुष्यात आपण असेच सोडून दिलेले असतात. शहाणपणाचे हे क्षण खासकरून स्त्रियांनी असेच सोडून द्यायचे नसतात, ते पकडून त्याच्या आधारे आपल्या आयुष्यावर स्वार व्हायला हवं, हे जगण्याचं बाळकडू हा चित्रपट नकळत मनात उतरवतो.

पती-पत्नीचं नातं साताजन्माचं, या जोडय़ांची गाठ वरती बांधली गेलेली असते. लग्न झाल्या क्षणाला ते दोघेही प्रेम असो वा नसो.. संसार नावाच्या गाडय़ाला बांधले जातात. त्यामुळे त्यानंतर पती आणि पत्नी दोघांवर समाजमान्यतेनुसार येणाऱ्या जबाबदाऱ्यांची ओझी असतात. अर्थात त्या लैंगिकतेच्या आधारेच दिलेल्या असतात. त्यामुळे पतीने घराचा आर्थिक गाडा हाकणं आणि पत्नीने वंश पुढे नेत प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळणं वगैरे वगैरे सगळं आखून दिल्याप्रमाणे सुरळीत चालू असतं. किं वा नसलं तरी ते तसंच सुरू असलं पाहिजे असं गृहीतच धरलेलं असतं. त्यांच्यातलं प्रेम, समजूतदारपणा.. अगदीच काय तर दोघांपैकी एक जण इहलोकी गेलाच तर त्यानंतरचं त्यांचं सुख-दु:ख, आर्थिक नियोजन सगळं कसं स्पष्ट असतं. पण कधी तरी यातही फसगत होतेच की.. जशी इथे गिरी कु टुंबाची होते. संध्याचे (सान्या मल्होत्रा) लग्न होऊन सहा-सात महिने उलटतायेत तोच तिच्या पतीचं आस्तिकचं निधन झालं आहे. घरात दुखवटा आहे, नातेवाईक पुढच्या विधींसाठी एकेक करून जमा झालेत. आई-वडील अथांग दु:खात बुडाले आहेत. त्यांचा आधार असलेला कर्तासवरता मुलगा त्यांनी गमावला आहे. आस्तिकच्या भावाला आलोकला विधींच्या नावाखाली केस कापण्यापासून अनेक गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागतायेत ज्यामुळे तो अस्वस्थ आहे. हा सगळा ताण आपल्या परिचयाचा असतो. नेमकं  याविरुद्ध सगळा गोंधळ संध्याच्या मनात दाटलेला असतो. ऐन तारुण्यात ती विधवा झाली आहे, तिचा आयुष्याचा जोडीदार तिला सोडून गेला आहे.. तिने धाय मोकलून रडायला हवं, अतीव दु:खाने तिची तहानभूक हरपली पाहिजे किंवा तिला नक्कीच मानसिक धक्का बसला असला पाहिजे. संध्याही वेडय़ासारखीच वागते आहे, पण तिचं हे वेड मानसिक धक्क्यातून आलेलं नाही. तिला रडू येत नाही आहे, काहीच वाटत नाही आहे. उलट तिला खूप भूक लागली आहे, तिला पेप्सी प्यायची आहे, पाणीपुरी खायची आहे. आपल्याला काहीच का वाटत नाही आहे? याचा शोध घ्यायचा प्रयत्न तीही करते आहे. याच शोधातून तिला सत्य गवसतं, तिला तिची उत्तरं मिळत जातात, ती आतून बदलत जाते आणि मग आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमागचं, माणसांमागचं सत्य तिला लख्ख दिसू लागतं.

आदर्शवत मानल्या जाणाऱ्या प्रत्येक व्यवस्थेचे आपले असे कच्चे दुवे असतात, आपल्याकडची कु टुंबव्यवस्थाही त्याला अपवाद नाही. उत्तर प्रदेशातील एका आकाराने मोठय़ा पण मध्यमवर्गीय अशा कुटुंबात जेव्हा दुर्दैवी घटना घडते तेव्हा जन पळभर हाय हाय करून मोकळे होतात. त्या कुटुंबालाही स्वत:ला सावरून आर्थिक प्रपंचाचा विचार करावा लागतो, हे लख्खं वास्तव आहे. एका घरात जीवलगांचं दु:ख, काही रिकामटेकडय़ा नातेवाईकांच्या कुचाळक्या, दुसऱ्याच्या दु:खावर आपली सुखाची पोळी शेकू न घेण्याचा प्रयत्न करणारे काही खालीमुंडी पाताळधुंडी आप्त.. हे चित्र दिसतं. ‘पगलैट’ या चित्रपटात हे चित्र वास्तव शैलीत दिग्दर्शकाने पडद्यावर आणलं आहे, अर्थात त्याला विनोदी मांडणीची जोड दिली असल्याने हे सगळं भावनिक नाटय़ अंगावर येत नाही. मात्र यापलीकडे दिग्दर्शकाने संध्याच्या व्यक्तिरेखेवर दिलेला जोर या चित्रपटाला वेगळेपणा देऊन गेला आहे. आपल्या वागण्याचं कारण संध्याला सापडत नाही, ज्या क्षणाला एक धागा तिला सापडतो तेव्हा त्याआधारे ज्या नवऱ्याच्या जाण्याचा शोक आपण करणं अपेक्षित आहे तो नेमका कसा होता? याचा विचार तिच्या मनात सुरू होतो. गेलेल्या माणसाचे अस्तित्व शोधण्याचा हरएक प्रयत्न ती करते. तिला तिचा सूर सापडेपर्यंत जगरहाटी थांबणार नाही हेही तितकंच सत्य.. त्यामुळे ती बोलत नाही तोवर तिच्यासाठी तिच्या हिताचे निर्णय घेण्याचा प्रयत्न कुटुंबातील प्रत्येक जण करतो. ही परिस्थिती संध्यासारख्या सुशिक्षित आणि शहाण्यासुरत्या तरुणीला वेडं करून सोडेल अशीच आहे.. असतेही. तरी संध्याचं अंतर्मुख होत बदलत जाण्याचा प्रवास दिग्दर्शकाने ज्या संयत पद्धतीने रंगवला आहे त्याला तोड नाही. सान्या मल्होत्राने या भूमिकेचं सोनं केलं आहे. हा आशय ताकदीचा आहे आणि तो पेलणारे नट इथे भाव खाऊन गेले आहेत. रघुवीर यादव, आशुतोष राणा, शीबा चढ्ढा, जमील खान, राजेश तेलंग ही सगळी मुरलेली कलाकार मंडळी. प्रत्येकाच्या वाटय़ाला पडद्यावर काही क्षण आले आहेत आणि त्यांनी प्रत्येक क्षण जिवंत केला आहे. उत्तम आशय- दिग्दर्शन- अभिनयाच्या जोरावर एकत्रित कुटुंबातील नव्या-जुन्या पिढीतला वैचारिक गोंधळ, त्यांच्यातलं प्रेम-हेवेदावे हा सगळाच वेडा कारभार चित्रपट रंगवतो. याच वेडेपणातून आपली वाट आपणच निवडून पुढे जाण्याची दृष्टी देणारा ‘पगलैट’ हा शहाणं करून सोडणारा अनुभव आहे.

 

पगलैट

दिग्दर्शक – उमेश बिश्त, कलाकार – सान्या मल्होत्रा, राजेश तेलंग, आशुतोष राणा, शीबा चढ्ढा, जमील खान, श्रुती शर्मा, रघुवीर यादव.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2021 12:20 am

Web Title: madness of wisdom piglet movie akp 94
Next Stories
1 “ना जाने कहा से आयी है….”, श्रद्धाचा डबल रोल!
2 आदित्य नारायण आणि त्याच्या पत्नीला करोनाची लागण
3 लस घेताना रडला राम कपूर; नंदिता दास, रघू यांचंही झालं लसीकरण
Just Now!
X