‘बनिए का दिमाग.. और मियाँभाई की डेअरिंग दोनो है अपने पास..’ असं टेचात म्हणणारा शाहरुख खान सध्या घराघरात टीव्हीवर झळकणाऱ्या प्रोमोजमधून ठाण मांडून बसला आहे. त्याच्या ‘रईस’ चित्रपटाचे हे प्रोमोज आहेत, यात तो रईस अस्लम नावाच्या माफिया डॉनची भूमिका करतो आहे, आदी एकेक चित्रपटाचे तपशील बाहेर पडतात तो तो नव्याने गोष्टीची सुई काळाच्या मागे धावत राहते. ती थांबते कुण्या अतीफ अस्लम नावाच्या खऱ्याखुऱ्या माफियापाशी..

गुजरातमध्ये नव्वदच्या दशकात अहमदाबाद पोलिसांकडून चकमकीत मारला गेलेला अतीफ अस्लम नावाचा इसम अचानक देशभरातील लोकांच्या मनात वेगवेगळ्या रूपात पोहोचतो. अवैध दारूचा धंदा करणारा एक गुंड ते राजकीय नेत्यांच्या वरदहस्ताखाली अवैध धंद्यांचे साम्राज्य उभारणाऱ्या अतीफ अस्लमच्या मुसक्या बांधणाऱ्या पोलिसांच्या मनातील गोष्टी वेगळ्या असतात. ९३च्या दंगलीत हात असलेल्या गुजरातमधील या माफियाची गोष्ट आता इतकी महत्त्वाची का ठरते? हा प्रश्न पोलीस अधिकारी, समाजशास्त्रज्ञ, चित्रपट अभ्यासक एवढंच नाही तर घराघरांतून अनेक सुज्ञांना सतावत राहतो. बॉलीवूड मात्र कित्येक वर्ष या गँगवॉर कथांमध्ये रमलं आहे. त्यामुळे शाहरुखने साकारलेल्या ‘रईस’च्या रूपात कुणी अतीफ, जॉनच्या रूपात ‘मन्या सुर्वे’, अर्जुन रामपालचा ‘डॅडी’ अवतार अशा अनेकविध रूपांत इतिहासातील हे माफिया बॉलीवूडच्या पडद्यावर जिवंत होतात, विनाकारण मोठे होत राहतात. सत्तरच्या दशकापासून हा रुपेरी माफियांचा सिलसिला अव्याहत सुरू आहे. ‘रईस’च्या निमित्ताने अगदी ‘दयावान’, ‘अग्निपथ’पासून सुरू असलेल्या पडद्यावरच्या माफियागिरीबद्दल हा ऊहापोह.

freedom of artist marathi news
‘कलानंद’ हवा असेल तर ‘कलाकाराचं स्वातंत्र्य’ मान्य करता आलं पाहिजे…
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

फार पूर्वी हिंदूी चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या डाकूंच्या कथा पाहायला मिळायच्या. त्यांची जागा अँग्री यंग मॅन नायकाने आधी घेतली आणि मग मुंबईतल्या वाढत्या टोळीयुद्धांबरोबर हे माफिया चित्रपटांमधून किती वेगाने पसरत गेले, हे कोणाच्या ध्यानीही आलं नाही. ऐंशीच्या दशकात मुंबईत माटुंगा परिसरातील वरदाराजन मुदलियारची दहशत संपवणाऱ्या वाय. सी. पवार (निवृत्त पोलीस अधिकारी) यांच्या मनात १९८८ साली वरदाराजनच्याच आयुष्यावर बेतलेला ‘दयावान’ चित्रपट आजही सलत राहतो. मालेगावसारख्या ठिकाणाहून माझी बदली जेव्हा मुंबईत केली तेव्हा हा परिसर वरदाराजनच्या किती दहशतीखाली होता, याची मला कल्पना नव्हती. तो इथला गॉडफादर होता. त्याचे काळे धंदे पोलिसांना माहिती होते, लोकांनाही त्यांची माहिती नव्हती असं अजिबात नव्हतं. तरी या सगळ्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केलं गेलं होतं,’ असं पवार सांगतात. वरदाराजनचा गणपती हे मुंबईतलं मोठं प्रस्थ होतं. रेल्वेची १२ हजार चौ.मी.ची जागा त्यासाठी व्यापली जायची. दीड महिना उत्तरेकडचा तो रस्ता बंद केलेला असायचा आणि लोकांचे लोंढेच्या लोंढे माटुंग्याच्या दिशेने यायचे. या सगळ्याला पहिल्यांदा त्यांनी विरोध केला. एक पोलीस अधिकारी म्हणून माझा त्याच्याशी असलेला संघर्ष, त्याच्या मागे लावलेल्या ससेमिऱ्यामुळे माझ्यावर वेगवेगळ्या पद्धतीने आलेले वरिष्ठांचे दबाव या सगळ्याबद्दल मी लिहिलेलं आहे. पण, त्याच्यावरच्या चित्रपटाने त्याला मोठं बनवलं. वरदाराजन दक्षिणेत पळून गेला. त्यादरम्यान पडद्यामागून सूत्रं हलवत त्यानेच पहिल्यांदा ‘नायकन’ची निर्मिती केली होती. १९८७ साली मणिरत्नमचा तो चित्रपट आला. त्याला पुन्हा मुंबईत परतायचं होतं. त्यामुळे जनमानसामध्ये आपली प्रतिमा उंचावण्याच्या दृष्टीने ‘नायकन’ आणि लागोपाठ ८८ मध्ये हिंदीत ‘दयावान’ची निर्मिती केली गेली, अशी माहिती त्यांनी दिली. चित्रपटातूनही समाजात रूढ असलेल्या त्याच्या या प्रतिमेचा दबाव पोलिसांवर आणला गेला, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

या संस्कृतीला ‘रॉबिनहूड संस्कृ ती’ असं नाव देत या संस्कृतीचा हॉलीवूडवरही तितकाच प्रभाव राहिला आहे, असं ज्येष्ठ सिनेसमीक्षक, अभ्यासक अशोक राणे सांगतात. मुंबईतील त्यावेळी गँगवॉरच्या जमान्यात उदयाला आलेले छोटे-मोठे ‘दादा’ हे या रॉबिनहूड संस्कृतीचे पाईक आहेत. रॉबिनहूड सर्वसामान्यांसाठी पैसे गोळा करून आणायचा, त्यांची पोटे भरायचा. त्याने हे पैसे कुठून आणले याची तमा बाळगण्याचे कारण रोजच्या जेवणाची भ्रांत असलेल्या त्या तळागाळातील वर्गाला बाळगण्याचं कारण नव्हतं. इथल्या गुंडांसाठीही लोकांच्या मनात शिरून आपलं साम्राज्य टिकवण्याचा हा राजमार्ग जास्त सोपा होता. त्याचंच प्रतिबिंब मग चित्रपटातूनही उमटत गेलं, असं राणे म्हणतात. पण चित्रपटकर्मीना या कथांचं आकर्षण वाटण्याची गरज काय? असा प्रश्न साहजिकपणे येतो. माफियाचं आकर्षण सर्वसामान्यांप्रमाणेच चित्रपटकर्मीनाही वाटतं त्याचं एकमेव कारण म्हणजे त्या कथांमध्ये ‘अ‍ॅक्शन’ आहे. दोन गटांमधील हाणामारी किंवा हिंसा हा एकमेव विषय ठरू शकत नाही. मानवी स्वभावाचे जे सर्वसामान्य कंगोरे आहेत त्यापैकी अनेक पैलू हे या कथांमध्ये हाताळता येतात. शून्यातून विश्व निर्माण करतानाचा त्यांचा संघर्ष, त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्ती, अडचणी आणि त्यावर त्यांनी स्वबळावर विविध क्लृप्त्या लढवत केलेली मात असा कितीतरी मोठा मसाला चित्रपटांसाठी मिळत असल्याने साहजिकच चित्रपटकर्मीसाठी हे विषय महत्त्वाचे ठरतात. १९७५ साली आलेला अमिताभ-शशी कपूर जोडीचा ‘दीवार’ किंवा ७८ साली आलेला ‘डॉन’ हेसुद्धा माफियापटच आहे. फक्त त्याला कौटुंबिक नातेसंबंध, भावभावनांची जोड दिलेली असल्याने त्यांचं स्वरूप हे कौटुंबिक माफियापट असं राहिलं आहे. त्यानंतरच्या काळात जसं हॉलीवूडमध्ये मार्टिन स्कॉर्सेसला ‘गॉडफादर’ बनवणं महत्त्वाचं वाटलं. त्याचं कारण तो माफिया असला तरी तो पहिले एक सर्वसामान्य माणूस आहे. पण तो त्याच्या बुद्धीच्या जोरावर डावपेच खेळत आपलं साम्राज्य बनवतो, त्याची हुशारी, डाव-प्रतिडाव हे विचार करण्यासारखे आहेत. तिथेही शिकागो आणि अमेरिकेत गँगवॉरचं प्राबल्य वाढल्यामुळे चित्रपटांमधून त्याचं प्रतिबिंब उमटत राहिलं, असं राणे सांगतात. मात्र तिथे ‘गॉडफादर’चं उदात्तीकरण होत नाही. आपल्याकडे ते होतं कारण त्या व्यक्तिरेखा मोठमोठय़ा ‘स्टार’ कलाकारांकडून केल्या जातात. अमिताभ, शाहरुख, सलमान अशी मंडळी जेव्हा या भूमिका करतात तेव्हा नक्कीच त्यांची प्रतिमा प्रत्यक्षाहून उत्कट होत जाते, असं प्रतिपादन राणे करतात.

माफियांची रुपेरी पडद्यावरची ही मोठी प्रतिमाच पोलिसांसाठी आणि पर्यायाने समाजासाठी डोकेदुखी झाली आहे, असं मत निवृत्त साहाय्यक पोलीस आयुक्त प्रफुल्ल भोसले यांनी व्यक्त केलं. ‘अँग्री यंग मॅन’ ही आपल्याकडच्या हिरोंची प्रतिमा तरुणांवर एवढी गारूड करून गेली, की त्याचा परिणाम स्वरूप अनेक तरुण या गँगकडे ओढले गेले आणि आयुष्यभर तुरुंगात खितपत पडले, असं ते म्हणतात. ‘अग्नीपथ’सारख्या चित्रपटांपासून हे वेड वाढतच गेलं. सुरुवातीला मुंबईत गँगवॉरचं प्रमाण जास्त होतं. त्यामुळे अनेकांच्या आयुष्याची यात वाताहत झाली. गुंडांचा संघर्ष मोठा करून दाखवणारे हे चित्रपट त्याचवेळी पोलीस ज्या शौर्याने आणि प्रामाणिकपणाने गुंडांशी लढतात, त्याचं चित्रण करण्याचं सोयिस्करपणे विसरतात, असा दावा त्यांनी केला. कित्येकदा पोलीस आणि माफियांच्या सत्यकथांना नको तो मुलामा लावून त्यात नाटय़ आणण्याचा प्रयत्न केला जातो. व्यावसायिकतेचाच विचार करून वास्तवाची मोडतोड केली जाते. जे अयोग्य असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. त्यामुळे मग वडाळ्यात १९८६ साली पोलिसांनी केलेलं मन्या सुर्वेचं पहिलं एन्काऊंटर चित्रपटाचा विषय ठरतं. माया डोळस आणि त्याच्या साथीदारांना जाळ्यात अडकवून पोलिसांनी केलेली कारवाई ‘शूटआऊट अ‍ॅट लोखंडवाला’मधून लोकांसमोर येते. या चित्रपटासाठी ज्या ठिकाणी ही चकमक झाली त्या वास्तव ठिकाणांवर चित्रीकरण करण्यात आलं. त्यावेळी त्या कारवाईत सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांचीही मदत घेण्यात आली. मात्र अखेर पडद्यावर जेव्हा ती कथा येते तेव्हा त्यातले अनेक संदर्भ हे सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली बदललेले असतात, असं अधिकारी सांगतात. माया डोळस मोठा नव्हता पण तो या चित्रपटामुळे लोकांच्या लक्षात राहतो.

चित्रपटांमध्ये ‘स्टार’ कलाकारांनी या व्यक्तिरेखा पुढे नेलेल्या असल्याने बॉक्सऑफिसवरही हे चित्रपट कायम यशस्वी ठरले असल्याचं मत ट्रेड विश्लेषक गिरीश वानखेडे यांनी व्यक्त केलं. ‘दयावान’ हा तेव्हाचा हिट चित्रपट होता. आताही ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ हा हाजी मस्तान आणि दाऊद इब्राहीम यांच्या अंडरवर्ल्ड प्रवासाची कथा रंगवणारा चित्रपट अजय देवगण, इम्रान हाश्मीसारख्या कलाकारांमुळे बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरला होता. व्यवस्थेविरुद्ध लोकांनी घेतलेली भूमिका, मग ती बरी-वाईट काहीही असेल, त्यांनी ती कशी निभावली हे पाहण्यात भारतीय प्रेक्षकांना रस आहे. आणि शाहरुख खानसारखा कसलेला अभिनेता जेव्हा इतक्या विश्वासाने, स्टाईलने ही भूमिका करतो तेव्हा अर्थातच प्रेक्षकांसाठी ते हिरो असतात. इथे दिग्दर्शक म्हणून राहुल ढोलकियासारखा माणूस आहे जो असे विषय आव्हान म्हणून खेळवतो. त्यामुळे त्याचा प्रभाव अधिक पडतो, असे वानखेडे यांनी सांगितले. माफियांच्या कथेतला ‘अ‍ॅक्शन’ जॉनर, त्यांच्याबद्दलची अनभिज्ञता आणि त्यातूनच ते विश्व जाणून घेण्याचे कुतूहल यातून कळीकाळापासून या चित्रपटांची निर्मिती होत राहिली आहे. जनमानसांना हे चित्रपट आपल्याकडे आकर्षित करत राहिले आहेत. त्यामुळे ‘रईस’नंतरही अरुण गवळींवरचा ‘डॅडी’, दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्यावरचा चित्रपट असे विषय येतच राहतील. मात्र हे चित्रपट करत असताना दोन्ही बाजूंना तितक्याच समानपद्धतीने न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका वाय. सी. पवार यांनी घेतली. त्याला मोठमोठय़ा अभिनेत्यांच्या ग्लॅमरचं वलय न देता अधिक संयततेने या विषयांची मांडणी अशा चित्रपटांना वेगळे परिमाण देऊन जाईल, अशी आशा अशोक राणे यांनी व्यक्त केली.

‘गॉडफादर’ हा चित्रपट कुठेही उदात्तीकरण करत नाही, किंबहुना हॉलीवूडपटांमध्ये हे उदात्तीकरण दिसून येत नाही. तिथे ते अ‍ॅक्शनपट म्हणूनच मर्यादित राहतात. आपल्याकडे या व्यक्तिरेखांसाठी ‘स्टार’ चेहऱ्याची निवड होते. मग त्या कलाकारासाठी म्हणून ती व्यक्तिरेखा प्रत्यक्षात आहे त्यापेक्षा मोठी केली जाते. शिवाय, प्रत्येक कलाकार आपापल्या पद्धतीने संवादफेकीने, लुकमधून, स्टाईलने त्यात नाटय़मयता आणत त्या व्यक्तिरेखांवर स्वार होतात. दिग्दर्शकही त्यांना ते स्वातंत्र्य देतो. त्यामुळे मग चित्रपट गोष्टीतील वास्तवाचा धागा सोडतात. अत्यंत साधी-सरळ गोष्ट प्रचंड नाटय़मय होते.

       अशोक राणे, चित्रपट समीक्षक

माझ्या आत्मचरित्रावरून चित्रपट काढण्यासाठी अनेक नामांकित प्रॉडक्शन हाऊसेसनी संपर्क केला. पण ते करत असतानाही सततच्या चर्चेतून हे लक्षात येतं की गुंडांना आपल्या हिमतीच्या-बुद्धीच्या बळावर नेस्तनाबूत करणाऱ्या पोलिसांच्या कथेबद्दल त्यांना फार रस नसतो. त्यांना पोलीस आणि गुंड यांच्यातील तथाकथित संघर्ष जास्त महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे एखाद्या माफियावर चित्रपट काढायचा असेल तर तो सहजपणे तयार होतो, मात्र पोलिसांच्या आयुष्यावर चित्रपट काढण्यासाठी कोणीही पुढे येत नाही हा दुर्दैवी विरोधाभास आहे. त्याला आम्ही लोकांमध्ये जे खपतं तेच विकतो, असा मुलामा चित्रपटकर्मीकडून दिला जातो. फिल्मलाइनची ही मानसिकता विचित्र आहे.

   वाय. सी. पवार, निवृत्त पोलीस अधिकारी