देसी गर्ल प्रियांका चोप्राने ‘कॉन्ड नास्ट ट्रॅव्हलर’च्या मासिकामध्ये केलेल्या फोटोशूटमुळे सध्या वादळ निर्माण झाले आहे. मासिकातील फोटोमध्ये  परिधान केलेल्या टी-शर्टवरील शब्दांमुळे प्रियांकावर सध्या जोरदार टीका होत आहे. प्रियांकावर होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर मासिकाने प्रियांकाची पाठराखण केली आहे. विशेष उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन प्रियांकाला हा टी-शर्ट परिधान करण्यास सांगितले होते. असे स्पष्टीकरण मासिकाने दिले. कॉन्ड नास्ट ट्रॅव्हलरच्या माध्यमातून आम्ही सीमा तोडून जग जवळ आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत मासिकाने  प्रियांकाचा बचाव केला. टी-शर्टवर लिहलेल्या शब्दातून आम्हाला निर्वासितांचे दु:ख आणि यातना दाखवून द्यायच्या आहेत. असेही  मासिकाने म्हटले आहे.
मासिकात छापून आलेल्या फोटोमध्ये प्रियांकाने पांढऱ्या रंगाचा टि शर्ट परिधान केल्याचे दिसते. या टी-शर्टवर लिहलेल्या रेफ्यूजी, इमिग्रेशन, आउटसाइडर, ट्रॅव्हलर या चार शब्दांमुळे प्रियांकार टीकेचा भडीमार झाला होता. या चार शब्दांमधील पहिल्या तीन शब्दांना लाल रंगाने खोडले असून ‘ट्रॅव्हलर’ या शब्दाला तसेच ठेवण्यात आले होते . या चार शब्दांचा अर्थ लावला तर पहिला शब्द निर्वासित, दुसरा शब्द अप्रवासी आणि तिसरा शब्द बाहेरुन आलेला असा होतो. तर ट्रॅव्हलर हा शब्द  प्रवासी अशी ओळख निर्माण करतो.
या चार शब्दांचा नेटीझन्स आपापल्या परिने अर्थ लावत असून प्रियांकाला यातून काय संदेश द्यायचा आहे, याबद्दल विचारणा करत आहेत. निर्वासितांना, अप्रवाशांना आणि बाहेरुन आलेल्यांवर बंदी घालण्याचा संदेश प्रियांकाला द्यायचा आहे का? अशा प्रतिक्रिया ट्विटरवर उमटल्या होत्या.  मासिकाने नेटीझन्सनी लावलेल्या अर्थाचे खंडन केले असून आम्हाला कोणताही चुकीचा संदेश द्यायचा नव्हता असे स्पष्ट केले.